पाकिस्तानी हल्ल्यांची कार्यपद्धती अभ्यासून, ‘शत्रुपक्षास हवे ते समाधान मिळू देणे म्हणजे मुत्सद्दीपणाहे भारताने ओळखायलाच हवे..

पाकिस्तानी कुरापतींवर आपला प्रतिसाद हा पूर्णपणे प्रतिक्रियावादीच राहिलेला आहे. पाकिस्तान विरोधातील अपारंपरिक युद्धाचा प्रयत्न म्हणून भारताने आपल्या शत्रुराष्ट्राचे पाणी तोडण्यात काहीही गैर नाही. ब्रह्मा चेलानी यांच्यासारख्या मुत्सद्दय़ाने हे करणे कसे शक्य आहे हे आतापर्यंत अनेकदा दाखवून दिलेले आहे.

प्रत्येक युद्धासाठी युद्धभूमीची गरज असतेच असे नव्हे. पाकिस्तानला उमगलेल्या या शहाणपणाचा स्पर्श आपल्याला इतक्या वर्षांनीदेखील झालेला नाही, हे उरी येथील घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले. आपले शहाणपणाचे धडे येथेच संपत नाहीत. स्वत:चे कमीतकमी नुकसान करून शत्रुपक्षास जास्तीतजास्त नामोहरम कसे करावे ही आपल्याला न कळलेली आणि पाकिस्तानला पूर्ण समजलेली आणखी एक बाब. तीदेखील उरी घटनेने परत जगासमोर आणली. परंतु पंचाईत ही की उरी घटनेनंतरही हे शहाणपण आपल्याला उमगले आहे किंवा काय हा प्रश्न पडावा. याचे कारण या संदर्भात सरकार आणि संबंधितांकडून व्यक्त केल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया. वास्तविक सरकार संबंधितांकडून संतुलित विचारांची आणि किमान शहाणपणाची अपेक्षा नाही. त्यामागील कारण म्हणजे यातील बरेचसे एक तर भक्त तरी आहेत किंवा अनुयायी. या दोन्ही अथवा या दोन्हींतील एक जरी भूमिका एकदा का पत्करली की सारासारविवेकास रजा द्यावी लागते. ती दिली की पाकिस्तानचे दात घशात घालणे, धडा शिकवणे, जशास तसे उत्तर देणे आदी मनाला येईल त्या अपेक्षा व्यक्त करता येतात. त्या पूर्ण होण्याची सुतराम शक्यता नाही हेदेखील अशांना समजू शकत नाही. तेव्हा संबंधितांना यातून वगळलेले बरे. म्हणजे राहिले सरकार. प्रश्न येऊन थांबतो तो या टप्प्यावर.

शत्रुपक्षास हवे ते समाधान मिळू न देणे म्हणजे मुत्सद्दीपणा ही साधी व्याख्या जरी लक्षात घेतली तरी आपल्या सरकारातील प्रत्येक घटक पाकिस्तान सरकारच्या समाधानासाठी किती प्रयत्नशील आहे ते लक्षात येईल. आपल्या देशात काहीही घडो. सरकारातील अनेकांकडे एकच उत्तर असते. ते म्हणजे पाकिस्तान. वास्तविक भारत आणि पाकिस्तान यांची तुलनादेखील होऊ शकत नाही. आर्थिक, तांत्रिक आणि लष्करी अशा तीनही आघाडय़ांवर आपण पाकपेक्षा कैक योजने पुढे आहोत. भारतातील टाटा समूहातील टीसीएससारख्या एकाच कंपनीचा आकार साऱ्या कराची भांडवली बाजारास पुरून वर उरेल इतका आहे. तेव्हा पाकिस्तान जर आपले शत्रुराष्ट्र असेल. आणि ते आहेही. तर इतका लहान शत्रू इतक्या बलाढय़ भारताच्या नाकी नऊ कसे आणू शकतो, हा प्रश्न आपणास पडायला हवा. अगदी अलीकडच्या भूतकाळातील कारगिल ते २६/११ ते पठाणकोट ते उरीमार्गे अनेक छोटेमोठे दहशतवादी हल्ले इतके सारे उद्योग हा टीचभर देश आपल्यासारख्या इतक्या प्रचंड आकाराच्या देशाविरोधात करतो तरी कसे? आणि ते करण्यात त्या देशास यश येत असेल तर आपले काही चुकते किंवा काय याचा विचार आपण करणार की नाही? उरीच्या निमित्ताने पाकिस्तानने पुन्हा एकदा आपल्याला या प्रश्नांना भिडण्याची संधी दिली आहे. ती कशी ते आधी समजावून घ्यायला हवे.

पाकिस्तान आपल्या विरोधात इतके सारे उपद्व्याप करू शकतो याचे एकमेव कारण म्हणजे तो पारंपरिक युद्धविचारातून भारताकडे पाहात नाही. अत्यंत कमी खर्चाची, अत्यंत कमी भांडवली गुंतवणूक असलेली अपारंपरिक पद्धत पाकिस्तानने भारताविरोधात अवलंबलेली आहे. एक निश्चित युद्धभूमी नाही, एक निश्चित युद्धपद्धत नाही आणि एक निश्चित शस्त्र नाही. प्रत्येक ठिकाणी हे तीनही घटक नवे. हे पाकिस्तानी धुरिणांच्या दृष्टीने कौतुकास्पद असले तरी आपल्यासाठी नाही. याचे कारण यावर आपला प्रतिसाद हा पूर्णपणे प्रतिक्रियावादीच राहिलेला आहे. म्हणजे त्यांनी काही तरी केल्यानंतर आपण काही तरी उत्तर देणार. परत यातही पंचाईत अशी की पाकिस्तान अपारंपरिक मार्ग अनुसरत असताना आपला प्रतिसाद मात्र पूर्णपणे पारंपरिकच राहिलेला आहे. म्हणजे दात घशात घालण्याची भाषा आणि ती प्रत्यक्षात अमलात आणता येत नसल्याची हतबलता. इतक्या सर्व वर्षांत पाकिस्तानी अपारंपरिक युद्धपद्धतीचा प्रतिकारही अपारंपरिक पद्धतीनेच व्हायला हवा, पाक कमीतकमी खर्चात आपणावर खोलवर घाव घालू शकत असेल तर आपण त्याहीपेक्षात कमी खर्चात त्यास प्रत्युत्तर द्यायला हवे आणि मुख्य म्हणजे हे सर्व करावयाचे तर युद्धभूमीचीदेखील गरज नाही, हे आपण लक्षातही घेतलेले नाही. ही नवी युद्धभूमी जशी आर्थिक असू शकते तशीच नैसर्गिक साधनसंपत्तीचीही असू शकते.

असा एक साधा घटक म्हणजे पाणी. ज्या जम्मू काश्मिरात पाकिस्तान रोजच्या रोज आपणास ठेचत असते त्याच जम्मू काश्मिरातील महत्त्वाच्या नद्यांचे पाणी पाकिस्तानची तहान भागवत असते. चिनाब, झेलम, सिंधू, बियास, रावी आणि सतलज या जम्मू काश्मिरातील प्रमुख नद्या. या सहा नद्यांतील चिनाब, झेलम आणि सिंधू या प्रमुख नद्या तर उर्वरित तीन या नद्यांच्या उपनद्या. १९६० साली झालेल्या भारत आणि पाकिस्तान यांतील आंतरराष्ट्रीय करारानुसार या सहा नद्यांपैकी प्रमुख तीन नद्यांचे जवळपास सर्व पाणी आपल्या देशातून पाकिस्तानात विनासायास सोडले जाते. या सहा नद्यांतील जेमतेम २० टक्के पाणीसाठा भारताच्या वाटय़ास येतो तर उरलेले सर्व पाणी पाकिस्तानी भूमी सुजल सुफल करण्यासाठी वाहून दिले जाते. आदर्श व्यवस्थेत ही भूतदया योग्य ठरेलही. परंतु भारत आणि पाक संबंध ही आदर्श व्यवस्था राहिलेली नाही. त्यामागे केवळ सध्याचा हिंसाचार हेच एकमेव कारण नाही. तर सिमला कराराचा अनादर हेदेखील महत्त्वाचे कारण आहे. बांगलादेश युद्धाच्या पाश्र्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात १९७२ साली सिमला करार झाला. त्या करारात उभय देशांनी एकमेकांच्या सीमारेषांचा आदर करण्यावर शिक्कामोर्तब केले गेले. उभय देशांकडून प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन केले जाणार नाही, असेही कलम या करारात आहे. परंतु पाकिस्तानने सातत्याने या करारास हरताळ फासलेला आहे. इतका की तो करार अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडावा. परंतु त्या देशाची लबाडी ही की स्वत: सिमला कराराची पायमल्ली करूनही तो देश आंतरराष्ट्रीय पाणी कराराची अंमलबजावणी मात्र भारताकडून होईल यासाठी आग्रही असतो. अशा वेळी या कराराच्या अंमलबजावणीकडे भारतानेही दुर्लक्ष करण्यात काहीही चूक नाही. करार हे उभयपक्षी असतात. म्हणजे ते करारांतील घटकांना बंधनकारक असतात. त्यातील एकाने तो मोडायचा आणि दुसऱ्याने पाळायचा असे चालू शकत नाही. तेव्हा पाकिस्तान विरोधातील अपारंपरिक युद्धाचा प्रयत्न म्हणून भारताने आपल्या शत्रुराष्ट्राचे पाणी तोडण्यात काहीही गैर म्हणता येणार नाही. विशेषत: हे शत्रुराष्ट्र आपल्या जिवावर उठलेले आहे याची जर आपणास खात्री असेल तर हा मार्ग हाताळून पाहायला हवा. ब्रह्मा चेलानी यांच्यासारख्या मुत्सद्दय़ाने हे करणे कसे शक्य आहे हे आतापर्यंत अनेकदा दाखवून दिलेले आहे. परंतु सरकारांच्या डोक्यात- यात विद्यमान सरकारही आले- अद्याप प्रकाश पडलेला नाही.

यात आश्चर्य नाही. कारण तसे करण्यात शौर्य मिरवता येत नाही. युद्ध म्हणजे शड्डू ठोकणे, भीमगर्जना करणे, शंखनाद असाच आपला समज. शिवाय अशा मार्गानी आपला राष्ट्रवाद आणि देशप्रेम मिरवता येते. मुत्सद्देगिरीच्या मार्गात प्रसिद्धी नसते. परंतु इतकी शोभा झाल्यानंतर तरी या सरकारने आता प्रसिद्धीचा नाद आणि सोस सोडावा. राज्यकर्त्यांच्या प्रसिद्धीपेक्षा उरीनंतर देशाची जी काही उरलीसुरली राहिली आहे ती जपणे अधिक महत्त्वाचे आहे.