17 August 2017

News Flash

वैज्ञानिक सत्यनारायण

देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांत कार्यरत सरकारी संस्थांमधील मान्यवरांसमवेत पंतप्रधानांनी चर्चा करणे ही बाब

लोकसत्ता टीम | Updated: July 21, 2017 4:01 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी.

देशातील विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रांत कार्यरत सरकारी संस्थांमधील मान्यवरांसमवेत पंतप्रधानांनी चर्चा करणे ही बाब अत्यंत स्वागतार्हच आहे. पण..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रमुख सरकारी विज्ञान संस्थाप्रमुखांच्या बैठकीत आपली नाराजी व्यक्त केली. या विज्ञान संस्थांकडून हवी तशी अपेक्षापूर्ती होत नसल्याचे मोदी यांनी या बैठकीत बोलून दाखवले. ही बैठक जवळपास ९० मिनिटे चालली आणि वैज्ञानिकांनी देशासाठी काय काय करावयास हवे हे पंतप्रधानांनी त्यांना या बैठकीत सांगितले. या देशातील जनतेशी, जनतेच्या समस्या आणि अडचणींशी तुमची बांधिलकी आहे आणि त्यामुळे जनतेला ग्रासणाऱ्या समस्या कमी कशा होतील हे पाहणे तुमचे कर्तव्य आहे, असे मोदी यांचे म्हणणे. ते खरेच आहे. अनेक अर्थानी ही घटना महत्त्वाची. याचे कारण पंतप्रधानपदावरील व्यक्तीने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित व्यवस्थाप्रमुखांशी संवाद साधण्याचा म्हणून एक परिणाम होत असतो. तसेच या बैठकीत काय बोलले जाते याचेही एक वेगळे महत्त्व असते. तेव्हा सर्वप्रथम अशी काही बैठक पंतप्रधानांनी बोलाविली आणि तीत जे काही ते बोलले याबद्दल त्यांचे अभिनंदनच करावयास हवे. भारत पुराणकाळात अणुतंत्रज्ञान वा नॅनो टेक किंवा अवकाशविज्ञान किंवा स्कंधपेशी म्हणजे स्टेमसेल संशोधनात अत्यंत आघाडीवर होता, हे पंतप्रधान मोदी यांनी या बैठकीत सांगितले नाही. तसेच अवयव प्रत्यारोपणासारख्या गुंतागुंतीच्या वैद्यक शस्त्रक्रिया भारतात फार म्हणजे फार फार पूर्वी होत होत्या आणि गणेशाची मूर्ती हा त्याचा पुरावा आहे हेदेखील पंतप्रधानांनी या वेळी वैज्ञानिकांच्या निदर्शनास आणले नाही. हे असे काही न बोलल्याबद्दलही पंतप्रधान अभिनंदनास पात्र ठरतात. विज्ञानाबाबत काय बोलले जाते याइतकेच काय बोलले जात नाही, हेदेखील महत्त्वाचे असते. तेव्हा अशा तऱ्हेने ही बैठक सर्वार्थाने अभिनंदनीय असल्याने तिची दखल घेणे क्रमप्राप्त ठरते. पहिला मुद्दा पंतप्रधानांच्या नाराजीबाबतचा. वैज्ञानिकांनी अधिक काही करावयास हवे हे पंतप्रधानांचे मत. त्यावर कोणाचेही दुमत असणार नाही. परंतु या संदर्भात प्रश्न असा की हे अधिक काही करण्यात आपले वैज्ञानिक कमी पडत असतील तर ते का? त्यामागे तीन प्रमुख कारणे दिसतात.

एक म्हणजे वातावरण. विज्ञानाचा संबंध वृत्तापेक्षा वृत्तीशी अधिक असतो. ही वैज्ञानिक वृत्ती सत्ताबदलासारखी त्वरित होत नाही अथवा तिच्यातील दोष मोदी ज्याप्रमाणे काश्मीर समस्या सोडविणार होते त्याप्रमाणे चुटकीसरशीही दूर करता येत नाहीत. पिढय़ान्पिढय़ांच्या संगोपनानंतर विज्ञान वृत्ती समाजात रुजते. त्यासाठी मुळात प्रश्न विचारण्याच्या संस्कृतीस उत्तेजन द्यावे लागते. प्रश्न विचारणारा समाज असेल तरच विज्ञान अशा समाजात रुजू लागते. हे प्रश्न विचारण्याची संस्कृती हाच विज्ञानाचा पाया. वास्तविक न्यूटन याच्या आधीही सफरचंदे झाडावरून पडतच होती. पण म्हणून गुरुत्वाकर्षणाचा सिद्धान्त त्याच्या आधी मांडला गेला नाही. याचे कारण सफरचंदाच्या पडण्यामागील ‘का’ या प्रश्नाने न्यूटनला पछाडले. तेव्हा प्रश्न विचारण्यास उत्तेजन देणे ही विज्ञानाधिष्ठित समाजनिर्मितीची सुरुवात असते. खेरीज, या प्रश्नपृच्छक संस्कृतीमुळे विज्ञानात कनिष्ठ आणि श्रेष्ठ असे काही राहत नाही. म्हणजेच कनिष्ठातील कनिष्ठदेखील श्रेष्ठतमाच्या सिद्धान्तास आव्हान देऊ शकतो. तरीही विज्ञानाधिष्ठित समाजात ज्येष्ठांचा अपमान होतो म्हणून गळे काढले जात नाहीत. याचे असंख्य दाखले पदोपदी आढळतील. अलीकडच्या काळातील वैज्ञानिक प्रगतीचा आधार असलेला सापेक्षतावादाचा सिद्धान्त ज्याने मांडला तो आधुनिक विज्ञानेश्वर अल्बर्ट आइन्स्टाइन आयुष्याच्या अखेपर्यंत या संदर्भात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मांडलेल्या प्रश्नांनाही उत्तरे देत होता. ही कालची पोरे मला काय विचारणार, असे त्याने कधीही म्हटले नाही. तसेच वैज्ञानिक वृत्ती म्हणजे कार्यकारणभाव तपासण्याची तयारी. म्हणजेच ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ ही मानसिकता. विज्ञानाची संपूर्ण प्रगती ही या मानसिकतेने झाली आहे. यातील लक्षात घ्यायलाच हवी अशी बाब म्हणजे वैज्ञानिक वृत्ती जोपासली गेली तर तिचा अंमल फक्त विज्ञान क्षेत्रापुरताच मर्यादित ठेवता येत नाही. ती जगण्याच्या सर्व अंगांना स्पर्श करते. तसे झाल्यास निश्चलनीकरणाने काय साधले? किती काळा पैसा दूर झाला? येथपासून ते गोमातेच्या पवित्रीकरणापर्यंत वाटेल त्या प्रश्नास तोंड द्यायची तयारी आणि मोकळेपणा असावा लागतो. तो आपल्या व्यवस्थेत आहे काय, हा या संदर्भातील प्रश्न. त्याचे प्रामाणिक उत्तर नाही असेच असेल.

दुसरा मुद्दा निधीचा. केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांत पुतळे आणि तत्सम कारणांसाठी जेवढय़ा निधीची तरतूद आहे तितकी महत्त्वाच्या आयआयटी आदी संस्थांसाठी नाही. यातून आपले प्राधान्यक्रम दिसून येतात. गेल्या काही दिवसांत आम्ही विज्ञान संस्थांच्या ढासळत्या अर्थसंकल्पी तरतुदींविषयी वृत्तान्त प्रसिद्ध केले. ते पुरेसे बोलके ठरावेत. चलनवाढ आणि गरजा वाढत असताना मोदी सरकारकडून विज्ञानविषयक संस्थांच्या अर्थसंकल्पात लक्षणीय कपात करण्यात आली आहे. काही संस्थांसाठी ती २० ते ३० टक्के इतकी असेल. तेव्हा अशा वातावरणात विज्ञान संस्था आपले विहित कार्य कसे करू शकणार? दुसरा मुद्दा म्हणजे या आखडत्या हातामुळे विज्ञान संस्थांत नोकऱ्या करणाऱ्यांना पुरेसे वेतनही देता येणार नाही. कमी वेतनात आपल्याकडे फक्त राजकारणी काम करतात. त्यामागील कारणांची चर्चा करण्याचे हे स्थळ नाही. परंतु उत्तम वेतनादी सुविधा असल्याखेरीज या संस्थांत नव्याने कोण येईल हा प्रश्न आहे. या घटत्या तरतुदींमुळे गणिताचा अभ्यास करू पाहणाऱ्या जवळपास ३०० विद्यार्थ्यांना आपले संशोधन सोडावे लागणार आहे. वास्तविक याइतकी हृदयद्रावक बातमी नाही. इतक्या प्रचंड देशाच्या तिजोरीत गणिताच्या अभ्यासासाठी पुरेसा निधी नसेल तर त्याचे भवितव्य काय? अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष आणि उठता बसता ज्यांचे नामस्मरण करणे भाजप नेत्यांना आवडते अशा एपीजे अब्दुल कलाम यांनी त्याही वेळी देशातील गणिताच्या अभ्यास स्थितीविषयी जाहीर चिंता व्यक्त केली होती. गणिताभ्यासास उत्तेजन नाही आणि विद्यार्थ्यांना गणितापेक्षा बाजारपेठस्नेही अभियांत्रिकी वा संगणक विज्ञानात रस याबद्दल कलाम यांनी खेद आणि नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर या स्थितीत काय आणि किती बदल झाला? आम्ही सत्तेवर आल्यास शिक्षणाची तरतूद ३.७५ टक्क्यांवरून वाढवून सहा टक्के इतकी करू, असे आश्वासन मोदी यांच्या भाजपच्या जाहीरनाम्यात आहे. या सरकारचे तीन अर्थसंकल्प झाले. पण शिक्षण तरतुदीत घसघशीत वाढ झालेली नाही.

तिसरा मुद्दा छद्मविज्ञानाचा. वरील दोन कारणांमुळे त्यास उत्तेजन मिळते. करकरीत विज्ञानाला भिडण्याची हिंमत नाही आणि ती नसल्यामुळे निधीही नाही. अशा वातावरणात छद्मविज्ञान फोफावते. तसे झाले की अन्य कोणा पशूतील एकास मातेचा दर्जा मिळतो आणि गढूळ नदीतून वाहणारे गचाळ पाणी अमृत म्हणवून घेते. अशा वातावरणातच भाकड दंतकथा अभ्यासक्रमाचा भाग बनतात आणि बुद्धिवैभवाऐवजी हृदयास हात घालणारी भावनिक क्षमता हे साध्य ठरते. अशा वातावरणातच मग कोणालाही शास्त्रज्ञ म्हटले जाते आणि एकही शोध पदरी नसणारे ज्येष्ठ आपले फुकाचे शास्त्रज्ञपद मिरवीत पंचगव्याच्या संशोधन समितीतही जाऊन बसतात. तेव्हा वैज्ञानिकांनी काय करायला हवे हे सांगतानाच पंतप्रधानांनी त्यांच्या सरकारने काय करायला हवे हेदेखील सांगितले असते तर ते अधिक विज्ञानवादी ठरले असते. विज्ञानप्रसाराची सुरुवात ही वास्तवाच्या परखड चिकित्सेने होते. ती न झाल्याने पंतप्रधान-वैज्ञानिक संवाद हा विज्ञानाच्या नावे          ‘ घातलेला’ सत्यनारायण ठरतो.

First Published on July 21, 2017 3:55 am

Web Title: pm narendra modi meets top scientific officials of government of india
 1. V
  Vachak
  Jul 26, 2017 at 8:13 pm
  योग्य अग्रलेख. भारतात विज्ञान अधिकाधिक रुजणे अत्यंत आवश्यक आहे. आजपावेतो नेत्यांनी भारतीय लोकांना अज्ञानात, अंधारात ठेवले आहे. गल्लोगल्ली सायन्स काँग्रेस निघणे आवश्यक आहे जेणेकरून तळागाळापर्यंत विज्ञान पाझरू शकेल. innovations hubs तयार झाले पाहिजेत ज्यामुळे समाजाचे प्रश्न सुटणे सोपे जाईल.
  Reply
 2. H
  Hemant Kadre
  Jul 23, 2017 at 4:23 pm
  गाईला गोमाता का म्हणायचे असा छद्मी प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे. या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत. loksatta वर प्रकाशित बातमी या मुद्यावर प्रकाश टाकणारी आहे. त्यातील काही भाग असा... "गायीच्या मदतीने आता एचआयव्ही म्हणजेच एड्सविरोधी लस बनवता येईल. अमेरिकन जर्नल ‘नेचर’ मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार गायीतील अँटिबॉडी म्हणजेच रोग प्रतिकारक क्षमतेने एचआयव्हीचा परिणाम ४२ दिवसांत २० टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो."
  Reply
 3. N
  Nilesh Deshmukh
  Jul 22, 2017 at 12:03 pm
  Halli loksattachya pratikriyaat nastiktavaadi, dhongi purogaami, brigedi, aani ekaach braamhaanana zodpnaachya kutil bichara he lol aahet .... Pan neet lakshaat theva ... Congress sampanaar secularism sampanaar ... Karan Bhartiya janata yala 70 varssh delay Hoti....
  Reply
 4. K
  Kamalakaant Chitnis
  Jul 22, 2017 at 11:10 am
  उत्तम विषयावर लिहिल्याबद्दल अभिनंदन. गांधींच्या गोतावळ्याने ढोंगवाद जपला आता गांधींची जागा गाईने घेतली आहे! ढोंगवाद चालूच आहे! जागोजागच्या देवळाणारा पडलेला बळींचा व फुले नारळ यांचा वेढा आणि रास उद्विग्न करणारी आहे. या गोष्टींना जोजवून मोदींनी निवडणूक जिंकल्या पण स्वच्छता व विज्ञान दृष्टी अडगळीतच पडली आहेत . खुनी व रिकामटेकड्या गोसेवकांना अगदी गाईंच्या मूत्राचा गोसंगोपनाचे वैज्ञानिक धडे गिरवण्यास उत्तेजन दिले तरी शांतता व स्थैर्य नांदेल व विकासासाठी आवश्यक ती उसंत मिळेल! मग भले निष्ककर्ष काहीही निघो! वैज्ञानिकांना उत्तम साधने उत्तेजन प्रयोगशाळा परदेशी तज्ञाचे मार्गदर्शन व वेगवेगळ्या विषयांवरील पुस्तके यांना अनुदाने द्यावीत. शाळेपासून रोजगारास आवश्यक ते कसब मुलांना शिकवून निव्वळ पुस्तकी किडे बबवणारे विषय बाद करावे व नवीन शिक्षणपद्धती आणली तरी उत्तम पायाभरणी होईल व वैज्ञानिकांच्या शेपट्या पिरगाळण्याची आवश्यक संपेल!
  Reply
 5. S
  Sudhir
  Jul 22, 2017 at 6:20 am
  अतिशय उत्तम लेख. भारतात विज्ञान हा विषय चांगली नोकरी मिळवण्यासाठी शिकतात. अमेरिकेत विज्ञान प्रश्न सोडवण्यासाठी शिकतात.
  Reply
 6. S
  Shishir
  Jul 21, 2017 at 11:44 pm
  Very निकें आर्टिकल. इ hope scientists मस्ट have expressed their concerns बूट यौ have conveniently न mentioned खास हेरे विथ थे सोले purpose तो टार्गेट Modi इन ऑर्डर तो garner ट्रॅप्स.
  Reply
 7. S
  sachin k
  Jul 21, 2017 at 7:00 pm
  संपादकांनी लिहिलेला हा लेख अप्रतिमच असाच आहे.पण अमित भाऊंची प्रतिक्रिया विशेष जी सगळ्या भक्तांनी वाचावी डोके ताळ्यावर येईल त्यांचं .उगाच हि माता,ती माता करून करून समाजाला वैचारिक मागास बनवून या लोक्कानी उल्लू बनवून आपल्या झोळ्या भरल्या.या कृषिप्रधान देशात बैल दिवसभर राबतो त्याला फक्त एक दिवस ते म्हणजेच पोळा या सना दिवशी आराम मिळतो.खरे तर तो आपल्याला आदरणीय वाटावा.जो श्रम करतो त्याची किंमत या समाजाने कधीही केलेली नाही आणि ढोंगी साधू रक्षा लावून काजू बदाम खाऊन गोरे गोमटे होतात.नाहीतर कुंभमेळे करीत नद्या,शहरे घाण करतात.मंदिरे,पुतळे ,कुंभमेळे यांना देणग्या देणे म्हणजे अंधश्रद्धा समाजात अजून पक्की करून ठेवणे याउलट विज्ञान-मेळावे झाले तर त्यातून काही वैज्ञानिक उगवतील. हीच गोष्ट मुसलमानां सुद्धा लागून पडते.आदरणीय अब्दुल कलाम जर मदरशात धार्मिक शिक्षण घेत बसले असते तर ते मौलाना झाले असते.म्हणजेच मुसलमानानी धार्मिक शिक्षण ना घेता,समाजास,देशास उपयोगी पडेल असे शिक्षण घेतले तर नक्कीच एखादा अब्दुल कलाम आपल्याला मिळेल अर्थात ज्ञानाला जात धर्म नसते पण जात-धर्मामुळे ज्ञान दूषित,खुंटीत होत
  Reply
 8. R
  Rajesh
  Jul 21, 2017 at 6:23 pm
  ज्यांना साधी तर्काची गोष्ट समजत नाही असे लोक कधी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारणार ........ वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारण्यासाठी स्वमतांद्धता , अति अहंकार , कट्टरता , झापडबंद विचार , मनाचा संकुचितपणा हे सर्व सोडावे लागते.... वैज्ञानिक दृष्टीकोन अंगिकारण्यासाठी open minded ...खुल्या मनाचे, वास्तववादी असावे लागते....मनातील काम क्रोध द्वेष काढून मन शांत करावे लागते....कोठे हि आपले डोके गहाण ना ठेवता सत्य काय आहे हे जाणून घ्यायची आस असावी लागते ......सत्याशी एकनिष्ठ राहण्याची तयारी असावी लागते .......नाहीतर निव्वळ भावनिक होऊन... बोलबच्चनगिरी करून काहीही उपयोग नाही..
  Reply
 9. प्रसाद
  Jul 21, 2017 at 2:36 pm
  विज्ञानाने झापडबंद विचार सोडून स्वतःलाही प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर' अशी मानसिकता विज्ञान दाखवते खरे पण म्हणजेच ‘बाप दाखवता न येणे’ म्हणजे ‘तो मृतच असेल’ असे विज्ञान गृहीतच धरते ना? कुठलाही अतिरेक हा वाईटच असतो. पुराणातील सर्व गोष्टींमध्ये विज्ञान असेलच असे अजिबात नाही. पण आधुनिक शोधांशी इतके साधर्म्य असणाऱ्या निदान कल्पनातरी पूर्वजांनी केल्या होत्या हे तरी मान्य का करू नये? कृत्रिम पाऊस, अनेकांचे 'अंश' घेऊन विशिष्ट उद्दिष्टाने जन्माला घातलेली व्यक्ती, दूर लढल्या जाणाऱ्या युद्धाचे धावते समालोचन, या केवळ कल्पना होत्या असे मानले तरी अशी अचाट कल्पनाशक्ती शोधांची जननी असते इतके तरी मोठेपणाने मान्य करावे. परंतु तसे होताना दिसत नाही. पौराणिक म्हणजे अवैज्ञानिकच असा झापडबंद विचारच वैज्ञानिक करताना दिसतात.
  Reply
 10. संदेश केसरकर
  Jul 21, 2017 at 2:34 pm
  विषय चांगला होता पण तो भरकटला. पंतप्रधानांनी विज्ञानांत लक्ष घालणे हे नक्कीच अभिनंदनीय आहे. त्यावरच भाष्य करणे पुरेसे होते. वैज्ञानिक कसे तयार होतात वैगैरे हा वेगळा मुद्दा आहे आणि ते पंतप्रधानांचे काम नाही. वैज्ञानिक हे काही समाजाच्या फॅक्टरीत तयार करता येत नाहीत त्यांची जातकुळीच वेगळी असते. न्यूटन एडिसन ह्यांना विद्याभासात प्रगती नाही म्हणून शाळेतून बाहेर काढले होते. आईस्टाईन ह्यांना "Slow Learner " म्हणून शेरा दिला होता. स्टीवन हॉकिन्सच्या "TIME" ह्या प्रोजेक्ट मधील पहिल्या चार धड्यांचे परीक्षकांनी हसे केले होते. अलीकडचे बिल गेट्स ह्यांनी पण आपले ग्रॅज्युएशन व्यावसायिक झाल्या नंतर पूर केले. लद्दाख सारख्या अतिशय कठीण परिस्थितीच्या जीवन पद्धतीत सोनम वंचूक सारखे वैज्ञानिक तयार होतात. त्यामुळे वैज्ञानिक तयार करावे लागतात हे चुकीचे आहे. सर्व समाजात कमी जास्त प्रमाणात वैज्ञानिक जन्मतात आणि सर्व प्रकारच्या कठीण परिस्थितीवर मात करून आपले उद्दिष्ट्य साध्य करतात. ा वाटत इथे वैज्ञानिक व डॉक्टर इंजिनियर ह्यांची गफलत झाललेली आहे. (शब्दांची मर्यादा संपल्याने इथेच थांबत आहे)
  Reply
 11. P
  paresh
  Jul 21, 2017 at 2:26 pm
  विषय चांगला आहे पण मांडणी एकांगी आहे. वैज्ञानिकांकडूनच्या भारतीय समाजासाठीं अपेक्षा म्हणजे घनकचरा, सांडपाणी विलेव्हांट, टिकाऊ चांगले रस्ते, सौर ऊर्जा, स्वस्त घर बांधकाम, शेतीपाण्यासाटी साठवण आणि optimum वापर असे अनेक विषय आहेत. आणि हे खाजगी संशोधनातून होऊ शकते. खाजगी उद्योगांनी त्यात पैसे गुंतवून पेटंट घेऊ शकतात, बँकांनी स्वस्त कर्जे देऊ शकतात. मोदी सरकार आणि भक्त अजूनr पूर्वीच्या सरकारच्या मागे लपत आहेत. तीन वर्षे स्स्वताचा रोड मॅप प्रकाशित आणि त्याच्या अंबालबजावणीसाठी सुरवात करण्यासाठी पुरी आहेत.कमकुवत विरोधी पक्षमुळे १९१९ सोपे आहे.पण त्यामुळे नाकर्ते राहणे हे दुर्दैव.
  Reply
 12. S
  Santosh
  Jul 21, 2017 at 2:02 pm
  लोकसत्ताचे संपादकीय वाचनीय असतात. सुरवातीचा लेख वाचून मोदींच कौतुक करतायत बघून मनात शंकेची पाल चुकचुकली आणि शंका खरी ठरली.संपादक महाशयांना मोदींची कावीळ झाली आहे का असे वाटते. गेली पन्नास वर्ष कॉग्रेसने देशात विज्ञानवाद वाढावा म्हणून काय काय केलं त्याचा पण हिशोब मांडावा. साधं अंधश्रद्धा निर्मूलन विधेयक १५ वर्ष सलग सत्तेत असून मंजूर करून घेता आलं नाही, कारण तशी मानसिकताच नव्हती. कॉग्रेस ने मुद्दाम हुन लोकांना अंधश्रद्धेच्या मार्गाला लावलं आहे, जेणेकरून लोकांना प्रश्न पडणार नाहीत आणि आपली सत्ता सुरक्शित राहील. मोदीनि निदान घाण साफ करायला सुरवात केली आहे. ा वाटतं लोकसत्ता सारख्या वर्तमान पत्राने त्यांना साथ द्य्यावी,
  Reply
 13. G
  Ganeshprasad Deshpande
  Jul 21, 2017 at 1:55 pm
  संपादकांनी पंतप्रधांनांना दूषणे देण्यासाठी मोदी स्रनाम वापरले असले तरी त्यांच्या मुद्द्याचा विचार करता दे दुर्लक्षणीय आहे. मूळचा मुद्दा हा आहे की आपल्याकडे विज्ञानवादी वातावरण नाही. तो खराच आहे आणि त्याला शासनापासून मीडियापर्यंत सर्वच जण जबाबदार आहेत. भावना दुखावतात म्हणून पोटगी नाकारणारा कायदा करणारे पंतप्रधान आणि त्याच कारणासाठी आपलाच परखड अग्रलेख मागे घेणारे संपादक यात लहान-मोठे कसे ठरवायचे? आणि तरीही बाकी कोणाहीपेक्षा सरकारची जबाबदारी अधिक मोठी असायला पाहिजे हे मान्यच करावे लागेल. पण नेहरू ते मोदी या सर्व पंतप्रधानांनी आपल्या लोकांना शहाणे करण्यापेक्षा त्यांचे अहंकार कुरवाळणे हेच पत्करले आहे. अखेर लोकशाहीत पंतप्रधानांपासून संपादकांपर्यंत सर्वजण समाजातूनच उगवतात आणि एकूण समाजाचा बौद्धिक-वैचारिक दर्जा हीच त्यांचीही मर्यादा असते. दोष संपूर्ण समाजाचा आहे.
  Reply
 14. V
  varad
  Jul 21, 2017 at 1:26 pm
  लोकसत्ताच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देणारे घाऊक विचारवंत तयार झाले आहेत असे दिसतेय..!! म्हणजे तेच तेच लोक , प्रत्येक वेळी तेच ते पक्षीय वळण म्हणजे काँग्रेस vs भाजप..!! याला काही अंशी संपादक सुद्धा जबाबदार आहेत म्हणा ..!! जगात विविध कारणासाठी म्हणजे ब्राष्टाचार असो व वैज्ञानिक प्रगती भारताचं बरोबरीने किंवा मागे पुढे इतरही देशांचे नाव येत असते मग तिथे काय बाजप व काँग्रेस चे शाखा काम करत असते का ?? जे काही आहे ते आपल्या देशाचे nature आहे रु पार्टी त्याला फक्त थोडे फार वळण लावू शकते बस ...!!!
  Reply
 15. V
  varad
  Jul 21, 2017 at 1:20 pm
  राहिली गोष्ट भारतीय समाजातील मान्यतेची , या मान्यता विज्ञानासाठी मारक आहेत असे काही नाही कारण प्रत्येक समाजात त्या असतातच ..!! भारताबद्दल बोलायचे झाले तर आपल्या पूर्वजांनी या प्रत्येक गोष्टीवर विचार केलाय , आपल्या परीने उत्तरे दिली आहेत हे हे नसे थोडके..!! आता मात्र त्यावर समाधान ना मानता पुढे संशोधन झाले पाहिजे..!!
  Reply
 16. S
  Salim
  Jul 21, 2017 at 1:18 pm
  उद्याचा लेख:- रिलायन्स ने फोन फुकट दिला आहे तर त्यावरती भारतीय पंतप्रधान कसे जबाबदार आहेत आणि नोटबंदीमुळे हे काहीतरी भयंकर घडत आहे... अजून काहीतरी ओढून ताणून असेलच किंवा कुठेरात्री लाइट गेले तर ते नोटबंदी मुळे गेले असा काहीतरी... किंवा तस काहीतरी.... चालू द्या.. आमची तर अग्रलेख वाचून खूप करमणूक होत आहे... :-)
  Reply
 17. H
  Hemant Joshi
  Jul 21, 2017 at 1:16 pm
  समाजात सर्व प्रकारचे लोक असतात आणि ते आपापले काम करत असतात. आपापल्या क्षेत्रात काम करत असताना त्यांच्याकडून त्या क्षेत्रातले चांगले किंवा अधिक चांगले काम करण्याची अपेक्षा केली जाते जे की अजिबात चूक नाही. परंतु ह्याचा अर्थ असा नाही की ह्या व्यक्ती त्यांच्या वैय्यक्तिक आयुष्याच्या धारणा पाळू शकत नाहीत. म्हणूनच इ .श्रीधरन ह्यांच्या मेट्रो संबंधीच्या कार्याची मीमांसा करताना ते रोज देवाची पूजा करतात ह्याची निरर्थक चर्चा करावयाची नसते. त्याच अंगाने मोदींच्या राजकीय किंवा वैय्यक्तिक,धार्मिक आचरणाची चर्चा वैज्ञानिकांच्या परिषदेत संदर्भहीन ठरते. पुतळे आणि तत्सम कारणांसाठीच निधी संस्थंपेक्षा जास्त हे तर तद्दन खोटे विधान वाटते. हल्ली किंबहुना बऱ्याच काळापासून कुबेरांना असलेल्या मोदी ज्वराचा इलाज मिळावा हीच मनापासूनची इच्छा. अन्यथा त्यांचे विचार सुद्धा कुमार केतकरांसारखे एकांगी वाटण्याची शक्यता जास्त.
  Reply
 18. V
  varad
  Jul 21, 2017 at 1:09 pm
  " दुसरा मुद्दा निधीचा. केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांत पुतळे आणि तत्सम कारणांसाठी जेवढय़ा निधीची तरतूद आहे तितकी महत्त्वाच्या आयआयटी आदी संस्थांसाठी नाही. " आपल्याच देशात काही भव्यदिव्य निर्माण होत असेल कि असे विघ्संतोषी लोक कुचकल्या करणार ...!! आता तर यांना कोणी भाव सुद्धा देत नाही म्हणा पण हे आपले नेमून दिलेले काम यथाशक्ती पर पडणार..!! इतरांना आयफेल टॉवर, statue ऑफ लिबर्टी याचे कौतुक सांगणार मात्र आपल्या देशात "जाती " च्या चष्म्यातून विरोध करणार..!!
  Reply
 19. V
  varad
  Jul 21, 2017 at 1:02 pm
  " दुसरा मुद्दा निधीचा. केंद्र सरकारच्या गेल्या काही वर्षांतील अर्थसंकल्पांत पुतळे आणि तत्सम कारणांसाठी जेवढय़ा निधीची तरतूद आहे तितकी महत्त्वाच्या आयआयटी आदी संस्थांसाठी नाही. " उद्या संपादक शेती व संरक्षण खाते व आयआयटी या खात्यांवरील निधी ची तुलना करतील !! अश्याने पोट आणि आपले रक्षण होणार आहे का ? आणि बर आयआयटी हे पंडित नेहरू यांची देणं पण तेही पस्तावतील अशी आताची परिस्थिती , कारण आयआयटी तील सगळे झाडून परदेशी कंपन्या आणि पर देश यांची सेवा करणारे ..!! ज्या प्रमाणे वृत्तपत्रासाठी सवलतीत जागा , कागद पत्रकारांसाठी अगदी घरे सुद्धा मिळतात पण काही वृत्तपत्रे समाजद्रोही आणि बुद्धिभेद करणारे लेखन करतात . मग अश्या काही वृत्तपत्रे याची सवलत गरिबी हटाव सारख्या तत्सम योजनांसाठी वापरावी असे कानी सुचत ????
  Reply
 20. विनोद
  Jul 21, 2017 at 12:59 pm
  गायीच्या वासराला दाेन घाेट दूध पाजून त्याला समाेर बांधायचे आणी गायीचे दुध काढायचे.. तथाकथीत गाेसेवकांनी अशावेळी कधी गायीच्या आणी वासराच्या डाेळ्यांत पाहिले आहे काय ? मी पाहिले आहे.. आणी माणूसपणाची लाज वाटली त्यावेळेस.. गाईला दैवत्व देऊन संस्कृतीच्या नावाखाली यथेच्छ पिळवणूक करताना लाज कशी नाही वाटत कद्रे ?
  Reply
 21. U
  Ulhas
  Jul 21, 2017 at 12:51 pm
  तिन्ही मुद्दे लागू आहेत. पहिला आणि तिसरा तर अगदी चोख लागू आहे. एकप्रकारचा मठ्ठपणा सर्वत्र वाढीस लागला आहे हे नीट पाहिले तर लक्षात येऊ शकेल. काहीतरी अडप -झडप करून कामे करायची, विषयाचे मर्म जाणून न घेता काम करायचे/बोलायचे/इमेल लिहायच्या, येनकेनप्रकाराने 'पैशे भेटले' की झाले इतकीच महत्वाकांक्षा उरली आहे असे अनेक ठिकाणी जाणवते. शैक्षणिक आणि समाजशास्त्राच्या तज्ज्ञांनी ह्यावर संशोधन करून मार्ग दाखवायला पुष्कळच वाव आहे.
  Reply
 22. Load More Comments