गुजरातमधील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या राहुल गांधी यांच्या मोटारीवर दगडफेक करणे हे पळपुटेपणाचे म्हटले पाहिजे. त्याहूनही अधिक गंभीर म्हणजे हा हल्ला राहुल यांच्यावरील राग काढण्यासाठी केला गेल्याचे भाजपच्या प्रवक्त्यांचे वक्तव्य. देशातील विरोधक संपुष्टात आणणे म्हणजे जर लोकशाही असेल, तर ती किती काळ टिकेल, याचाही विचार आता सत्ताधाऱ्यांनी करायला हवा. गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरसिंग वाघेला यांनी पक्षातून सोडचिठ्ठी दिल्याने पक्ष आधीच अडचणीत आला आहे.  काँग्रेसच्या राजवटीत भाजपच्या कार्यकर्त्यांना अशाच प्रकारे वागणूक मिळत होती, त्याची परतफेड आता होत आहे, असे सांगणे हेही इतरांहून वेगळा म्हणवून घेणाऱ्या भाजपला शोभणारे नाही. देशात फक्त एकच पक्ष असायला हवा, अशी मनीषा बाळगत भाजपने जवळजवळ सर्व राज्ये काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतही भाजपला विरोधकांकडून २० मतांचा फायदा झाला होता. हे सारे जोवर लोकशाही प्रक्रियेनुसार होत आहे, तोवर कुणाचाच आक्षेप असण्याचे कारण नाही. मात्र, सत्तेच्या जोरावर दगडफेकही करणे, म्हणजे लोकशाहीलाच पायदळी तुडवण्यासारखे आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांचे म्हणणे असे, की राहुल यांच्या राजकारणावर गुजरातमधील जनता आधीच चिडलेली आहे. हा राग त्यांनी दगडफेकीतून व्यक्त केला, ती करणाऱ्यांना गुंड म्हणणे अन्यायकारक आहे, पात्रा यांचे हे म्हणणे काहीच वर्षांपूर्वी अगदी याच्या विरुद्ध होते. देशातील सत्ताधाऱ्यांना विरोधी पक्षाला संपवण्यासाठी मतपेटीचा मार्ग खुला असताना, धाकदपटशा करून विरोधकांना नामोहरम करण्याने भाजपची ताकद वाढण्याची शक्यता कशी काय वाढू शकते, हे गौडबंगालच आहे. ज्या गुजरातमध्ये महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गावरून जाण्याचे आवाहन केले आणि त्यासाठी सत्याग्रहासारखे हत्यार सामान्यांच्या हाती दिले, त्याच गुजरातमध्ये हिंसात्मक मार्गाने एखाद्या नेत्याला पळवून लावणे, हीच खरी लोकशाहीची शोकांतिका म्हटली पाहिजे. राहुल गांधी यांच्या मोटारीवर दगडफेक केल्याप्रकरणी ज्या अनिल राठोड याला अटक करण्यात आली आहे, तो भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या दोन दशकांत नेत्यांना काळे झेंडे दाखवणे, रस्ता अडवण्याचा प्रयत्न करणे, हा निषेधाचा सर्वसंमत मार्ग समजला जाई. काळी फीत लावून राग व्यक्त करण्याची पद्धत नंतरच्या काळात मागे पडली आणि तिची जागा मोटारी अडवण्याने घेतली. नेत्यांना गावबंदी करणे, त्यांच्या सभा उधळून लावणे, आगी लावणे, दगडफेक करणे या प्रकारांना समाजमान्यताही मिळू लागली. गुजरातमध्ये जे घडले, ते या शिष्टसंमत प्रकारात मोडते, असे भाजपचे म्हणणे आहे. मुळात राहुल गांधी यांनी गेल्या तीन वर्षांच्या काळात असे काय केले, की त्यांना दगड फेकून मारण्याएवढा राग कुणालाही यावा? गुजरातमध्ये काँग्रेस नावाचा पक्ष औषधालाही जिवंत राहू नये, अशी व्यवस्था भाजपने तर केलीच, पण काँग्रेसनेही त्यास साथ दिली. अशा वेळी राहुल गांधी यांना घाबरवून भाजपला आणखी काय मिळणार आहे? राग कशाचा आला, हे जसे भाजपला सांगता येत नाही, तसेच दगडफेकीचा विरोधही करता येत नाही. विरोधक संपवण्यासाठी हिंस्र मार्ग वापरणे, हे लोकशाहीचे अध:पतन आहे, हे भाजपला समजावून सांगायची वेळ आली आहे. आज दगडफेक, उद्या हल्ला, असे घडण्यापूर्वीच पक्षाच्या नेतृत्वाने अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी स्पष्ट भूमिका घेणे लोकशाहीसाठी तरी आवश्यकच आहे.