तुर्कस्तानमध्ये शनिवारी सकाळी झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणीही घेतलेली नाही. या हल्ल्यात किमान ९५ नागरिक मृत्युमुखी पडले. सुमारे अडीचशे जण जखमी झाले. हे सगळे जण शांतता मोर्चासाठी एकत्र जमले होते. तुर्कस्तानात वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेले तय्यिप एर्दोगन यांचे सरकार आणि कुर्द बंडखोरांची पीकेके ही दहशतवादी संघटना यांच्यात सध्या युद्ध पेटले आहे. तो िहसाचार थांबवा, अशी त्यांची मागणी होती. तिला बॉम्बस्फोटाने उत्तर मिळाले. देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला. अशा हल्ल्यांच्या सुरुवातीलाच कोणी त्यांचे श्रेय घेतले नाही की मग सुरू होतो अटकळी आणि अंदाजांचा बाजार. त्यात ज्यांच्या हाती भक्कम प्रचार माध्यमे असतात त्यांचेच अंदाज खरे मानले जातात. त्यांचे जे शत्रू असतात तेच अशा िहसाचारासाठी जबाबदार ठरविले जातात. येत्या काही दिवसांत ते दिसेलच. या हल्ल्यामागे कोणाचाही हात असला तरी एक गोष्ट खरी, की तुर्कस्तानातील वातावरण पाहता असा हल्ला अटळच होता. गतवर्षी ऑगस्टमध्ये ५२ टक्के मतांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकलेल्या एर्दोगन यांच्या न्याय आणि विकास पक्षाने (एकेपी) जो धार्मिक राष्ट्रवादाचा मध्यमवर्गीय वणवा पेटविला आहे त्याच्यामुळे देशाची वैचारिक फाळणी झाली आहे. सुन्नी मुस्लीम विरुद्ध कुर्द, बहुसंख्याकांचा राष्ट्रवाद विरुद्ध अल्पसंख्याकांची अस्मिता, धार्मिक कट्टरतावाद विरुद्ध डावा उदारमतवाद असा तो संघर्ष आहे. त्या निवडणुकीनंतर देश म्हणजे एर्दोगन असेच एक वातावरण होते. परंतु त्याला धक्का दिला जूनमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीने. त्यात एचडीपी या डाव्या पक्षाने १० टक्के मते मिळवून एर्दोगन यांच्या पक्षाच्या संसदेतील बहुमताला धक्का दिला. या पक्षात बहुसंख्य कुर्द आहेत. परंतु त्यांना इतरांनीही मते दिल्याचे त्या निवडणुकीतून स्पष्ट झाले. एर्दोगन एके एर्दोगन या समीकरणाला त्यामुळे तडा गेला. हे एर्दोगन समर्थकांच्या सहनशीलतेपलीकडील होते. याच दरम्यान कुर्दामधील अतिरेक्यांनाही एचडीपीच्या विजयाने चेव चढला. त्यांच्यातील अनेक दहशतवाद्यांचे सगेसोयरे आता संसदेत होते. त्यामुळे प्राप्त झालेल्या बळातून त्यांनी तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील कुर्द बहुसंख्य भागात दहशतवादी कारवाया सुरू केल्या. त्याविरोधात एर्दोगन यांनी लष्कर उतरवले. कुर्द बंडखोरांच्या इराकमधील छावण्यांवर हल्ले चढवले. त्यात शेकडो मारले गेले. ही यादवी थांबावी, यातून शांततेने मार्ग निघावा यासाठी एचडीपीचे नेते प्रयत्नशील होते. शनिवारचा मेळावा हा त्याच शांतता प्रयत्नांचा भाग होता. पण एर्दोगन समर्थकांच्या म्हणण्यानुसार एचडीपी म्हणजे कुर्द बंडखोरांचा मुखवटा आहे. त्यांच्या लेखी एर्दोगन यांच्यावर टीका करणारा प्रत्येक जण देशद्रोही आणि धर्मशत्रू आहे. अशा प्रत्येक आवाजाला – मग ते विचारी जनांचे असोत की माध्यमांतून उठणारे असोत – गाडण्याचे प्रयत्न तेथे सुरू आहेत. ‘हुरियत’ हे तेथील एक बडे वृत्तपत्र. त्यातून एर्दोगन यांच्या विरोधातील बातम्या येतात म्हणून गेल्याच महिन्यात तथाकथित राष्ट्रवाद्यांनी त्याच्या कार्यालयावर हल्ला केला. या अशा पाश्र्वभूमीवर अंकारातील आग पेटली आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तुर्कस्तानमधील या खदखदत्या वातावरणाच्या बरोबरीनेच बाजूच्या सीरिया, इराकमधील आयसिस विरुद्ध कुर्द बंडखोर यांच्यात सुरू असलेला संघर्ष पाहता केमाल अतातुर्काच्या सेक्युलर तुर्कस्तानचा भविष्यकाळ हा फॅसिस्ट हुकूमशाहीचाच आहे हे सांगण्यास कोणा राजकीय पंडिताची आवश्यकता नाही.