१९ एप्रिल १९७५ ते ५ जून २०१७. आर्यभट्ट ते जीसॅट-१९. अवघ्या ४२ वर्षांचा हा प्रवास. खरे तर ४८ वर्षांचा. पं. जवाहरलाल नेहरू आणि थोर वैज्ञानिक विक्रम साराभाई यांनी मिळून आकाशाला गवसणी घालण्याचे एक स्वप्न पाहिले होते. त्याची मुहूर्तमेढ रोवली होती १९६९ मध्ये. त्या वर्षी इंडियन अंतराळ संशोधन संस्थेची-इस्रोची- स्थापना झाली. अजून भारतातील अनेक भागांत साधे रस्ते नव्हते. वीज, पाणी नव्हते. टीव्ही यायचा होता. साध्या दूरध्वनी यंत्रासाठी भलीथोरली प्रतीक्षा यादी होती. पण वातावरणात आशा होती. विकासाची ओढ होती. त्यामुळे भरपूर टीका सोसूनही आपण अंतराळ संशोधन सुरू केले. त्यातून साकारला आपला पहिला उपग्रह. ३६० किलो वजनाचा. तो आपण तयार केला खरा. पण अंतरिक्षात पाठवायचा कसा? त्यासाठी तेव्हा रशियाची मदत घ्यावी लागली होती. आणि आज आपले स्वत:चे उपग्रह प्रक्षेपक आहेत. अन्य देशांचे उपग्रहही आपण पाठवतो. माहिती-तंत्रज्ञान क्रांतीचे ध्वजधारक आहोत आज आपण. जग मुठीत आलेय या माहितीक्रांतीने. पण माहितीच्या या युगात अनेकांना हे माहीतच नसते, की दुनिया मुठीत आणा असे म्हणणारे फक्त जाहिरातींचे घोषवाक्यच देत असतात. ते मुठीत आणणारे कोणी वेगळेच असतात. इस्रोच्या नऊ कम्युनिकेशन उपग्रहांमुळे आपल्या हातातील मोबाइल फोनला आज किंमत आहे. हे करताना अडथळे कमी आले नाहीत. अणुस्फोट चाचणीनंतर अमेरिकेने भारतावर र्निबध लादले. क्रायोजेनिक तंत्रज्ञान- जे प्रक्षेपकांसाठी महत्त्वाचे – ते देण्यास कोणी तयार होईना. मोठे आव्हान होते ते. पण भारतीय वैज्ञानिकांनी ते पेलले. २०१४ मध्ये संपूर्ण स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन असलेल्या जीएसएलव्ही-डी ५ प्रक्षेपकाद्वारे आपण जीसॅट-१४ उपग्रह अवकाशात पाठविला. चांद्रयान, मंगळयान हे तर दोन मानाचे तुरे. सोमवारी त्या इतिहासातील आणखी एक सुवर्णपान लिहिले गेले. तब्बल तीन हजार १३६ किलो वजनाचा उपग्रह आपण अंतराळात पाठविला. एवढा जड उपग्रह पाठवायचा तर प्रक्षेपकयानही त्याच क्षमतेचे हवे. इस्रोने ते तयार केले. येथेच भारतात. त्याचे नाव जीएसएलव्ही मार्क थ्री. साधे यश नाही हे. दोन-तीन वर्षांत साध्य व्हावे इतकेही सोपे नाही ते. त्यामागे अनेक वर्षांची मेहनत आणि संशोधन असते. ते आहे म्हणूनच आज आपण उपग्रह प्रक्षेपकधारक ११ देशांच्या यादीत आहोत आणि आता जीएसएलव्ही मार्क-थ्रीच्या उड्डाणानंतर जड उपग्रह पाठवू शकणाऱ्या रशिया, अमेरिका, चीन, जपान आणि युरोपियन युनियन यांच्या पंक्तीत बसण्याचा मानही आपण मिळविला आहे. या यशाबद्दल इस्रोचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे; परंतु त्या यशाचा काही वाटा तरी आपल्या राजकीय व्यवस्थेच्या पदरात टाकावा लागेल. वैज्ञानिक, अभ्यासक, विचारवंत अभ्यास करतील, संशोधन करतील, नवे काही घडवतील, परंतु त्यासाठी त्यांना वाव देणे, त्याकरिता अवकाश निर्माण करणे, तशा सोयी, तशा संस्था तयार करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनास महत्त्व देणे हे राजकीय व्यवस्थेचे काम. पूर्वदिव्यावर आज आपण रम्य वर्तमानकाळ भोगतो आहोत. पण हे किती काळ चालणार? शास्त्रीय संशोधन आणि वैज्ञानिक दृष्टिकोन तर सोडाच, आज वैज्ञानिक संस्थाही अंग चोरून उभ्या असल्याच्या दिसतात. आणि विज्ञान काँग्रेसमध्ये कुडमुडय़ांची विमाने उडतात. तेव्हा हे लक्षात घ्यायला हवे, की इस्रोच्या यशाने डोळे दिपून जातील. दीपवूनही सोडले जातील. त्याने बाजूचा काळोख मात्र नाहीसा होणार नाही. त्यासाठी कष्टच करावे लागतील. तेही वैचारिक.