वातावरण तापत आहे. कारण निवडणुका जवळ येत आहेत. हे बदलते वातावरण पक्षांना पोषक असते. वातावरण जेवढे तापेल, तेवढा त्याचा फायदा काही पक्षांना मिळतो. काही पक्ष मात्र, तापत्या वातावरणात होरपळून निघतात. मग ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडतात, आणि आपापल्या वातानुकूलित दालनात बसून राष्ट्रभक्ती वगैरेसारख्या विधायक कामात स्वत:ला गुतंवून घेतात. मग या बदलाचा किंचितही त्रास न होता,  वातानुकूलित दालनातून तापलेल्या वातावरणाची मजा घेता येते. आणखी काही दिवसांनी वातावरण आणखी तापेल. त्याचे उलटसुलट परिणाम राजकीय पक्षांवर होतीलच. पण राजकारणाची हवा तापली म्हणून पक्ष्यांवर मात्र त्याचे परिणाम विपरीत व्हावेत, हे विचित्रच आहे. तापलेल्या वातावरणात पक्ष टिकाव धरू शकत असले, तरी पक्षी तग धरू शकत नाहीत. म्हणूनच, राणीच्या बागेत पेंग्विन पक्षी आणण्यास वन्यजीव अभ्यासकांनी तेव्हा विरोध केला होता. पण केवळ हट्टापायी दक्षिण कोरियाच्या कोएक्स अ‍ॅक्वेरियम या थीमपार्कमधून आणलेल्या आठ पेंग्विन पक्ष्यांपैकी एका मादीने मुंबईकरांना दर्शन न देताच अखेर रविवारी मान टाकली. हे तापलेले वातावरण पक्षांसाठी चांगले असले, तरी आपल्यासारख्या थंड हवेत रमणाऱ्या पक्ष्यांना मानवणारे नाही, हे या पक्ष्याला जाणवले असावे. पण केवळ बालिश हट्टापायी  आणून कोंडलेल्या या पक्ष्यांना जगण्याची केविलवाणी शर्थ करावी लागणार आहे. त्या झगडय़ात तग धरता आली नाही, तर अखेर तापलेल्या वातावरणापुढे मान तुकवून जगाचा निरोपही घ्यावा लागणार आहे. केवळ काहीतरी करून दाखविल्याचे समाधान कुणाला तरी मिळावे, यासाठी आपले हक्काचे अधिवासाचे जग सोडून तप्त हवामानातील कोंडवाडय़ात उरलेले आयुष्य घालविण्याची वेळ आपल्यावर येणे ही मानवाने आपल्यावर लादलेली विनाकारण शिक्षा आहे, याची जाणीवही त्या बिचाऱ्या पक्ष्यांना नसेल. केवळ राजकारण आणि कुणाच्या तरी हट्टापायी अश्राप पक्ष्यांच्या जिवाशी खेळण्याच्या मानसिकतेचा मुद्दा त्या दुर्देवी पेंग्विनच्या मरणाशी निगडित आहे. मुंबईकरांना पैसे मोजून पेंग्विनसारखा, म्हैसूरच्या प्रख्यात प्राणिसंग्रहालयाखेरीज भारतात कुठेच न आढळणारा पक्षी पाहता यावा आणि हा पक्षी दाखविण्याचे श्रेय आपल्याला मिळवता यावे, एवढय़ा हट्टापायी या पेंग्विन पक्ष्यांना तीन महिन्यांपूर्वी मुंबईच्या राणीच्या बागेत आणण्यात आले. गेल्या तीन महिन्यांत त्यांना बाहेरच्या नव्या, अनोळखी जगाचे दर्शनही घेता आले नाही. आपणास कशासाठी येथे आणले आहे, याचाही त्या बिचाऱ्या मुक्या पक्ष्यांना थांगपत्ता नसावा. आणखी काही दिवसांनी आपल्या जलक्रीडा न्याहाळण्यासाठी मुंबईकर मुलाबाळांसह राणीच्या बागेत येतील आणि मरगळलेल्या या बागेला पुन्हा सुगीचे दिवस येऊन राणीच्या बागेच्या तिजोरीत पैसा खुळखुळू लागेल, त्याचे श्रेय घेत कुणीतरी पुन्हा सत्तेच्या सिंहासनावर बसेल, या भविष्याच्या खेळाचा त्यांना सुगावाही नसेल. एका मादीचा मृत्यू ओढवल्यानंतर आता उरलेल्या सात पेंग्विन पक्ष्यांवरील जबाबदारी वाढली आहे. आता त्यांना या हवेशी जुळवून घ्यावेच लागेल. तसे जमत नसेल, तर त्यांनी ते जुळवून घ्यावे यासाठी त्यांच्या जीवनशैलीवर नवे प्रयोग करावे लागतील, आणि थंड हवेत जगणाऱ्या पेंग्विन पक्ष्यांना बदललेल्या हवेशी जुळवून घ्यावे लागेल. ते पक्षी असले तरी हवामानाचा अंदाज घेत त्यानुसार स्वतला बदलणाऱ्या पक्षांप्रमाणे त्यांना वागावेच लागेल. पक्ष आणि पक्षी यांच्यातील फरकाचा फटका त्यांना बसला, तरी तो सोसावाच लागेल. ते काही येथील भूमिपुत्र नव्हेत..