दहशतवादी हल्ल्यांनंतर देशातील अंतर्गत सुरक्षा कडक करण्यात आल्याचा दावा सर्व शासकीय यंत्रणांकडून केला जातो, पण गेल्या महिनाभरातील दोन घटनांमुळे साऱ्यांचेच डोळे उघडले असतील. गेल्या महिन्यात भोपाळच्या कारागृहातून ‘सिमी’ या संघटनेचे आठ दहशतवादी सुरक्षारक्षकांना गुंगारा देऊन  पसार झाले, पण काही तासांतच पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांचा खातमा करण्यात आला. यावरून बरीच उलटसुलट चर्चा सुरू असतानाच पंजाबमधील पतियाळा जिल्ह्य़ातील नाभा कारागृहावर रविवारी सकाळी  दहशतवाद्यांनी हल्ला चढविला आणि हरिमदरसिंग मिंटो या ‘खलिस्तानी लिबरेशन फोर्स’च्या प्रमुखासह अन्य पाच कैद्यांना बरोबर घेऊन पलायन केले. यावरून कडक सुरक्षा असणारी देशातील कारागृहेही आता सुरक्षित राहिलेली नाहीत हेच सिद्ध होते. पंजाबमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार असून, राजकीय वातावरण पेटायला लागले आहे. पंजाब कायम अशांत राहावा, असा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. आधी पठाणकोट हवाई दलाच्या केंद्रावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यापाठोपाठ नाभा कारागृहावरील हल्ला. नियोजनबद्ध कटकारस्थाने करून हे हल्ले केले जातात.  पंजाबच्या राजकारणाला धार्मिक आणि प्रादेशिक अस्मितेची किनार आहे. पंजाबच्या एकूण लोकसंख्येपैकी ५५ ते ६० टक्क्यांच्या आसपास शीख समाज आहे. पंजाबची सारी सूत्रे आपल्या हाती राहावी हा समाजाचा आग्रह असतो. यामुळेच पंजाबमध्ये हातपाय पसरलेल्या आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांची कितीही महत्त्वाकांक्षा असली तरी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून स्वत:चे नाव जाहीर करता आलेले नाही. शीख समाजाला भडकावण्याचे प्रयत्न आतापर्यंत अनेकदा झाले. सत्ताधारी अकाली दल प्रादेशिक अस्मितेच्या मुद्दय़ाला कायम फोडणी देत राजकारण करीत आले आहे.  पंजाबमध्ये अमली पदार्थाचा व्यापार हा सध्या गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सत्ताधारी अकाली दलाचे नेतेच अमली पदार्थाच्या व्यापाराला उत्तेजन देतात, असा आरोप केजरीवाल आणि काँग्रेसकडून केला जातो. खलिस्तान चळवळ पंजाबमध्ये जोरात असताना अकाली दलाच्या नेत्यांवर संशयाची सुई होती. आताही प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पेटविण्याकरिता सत्ताधारी अकाली दलाकडून नरमाईची भूमिका घेतली जात असल्याची टीका केली जातो. प्रादेशिक अस्मितेबरोबरच पंजाबच्या राजकारणात बाबाबुवांना बरेच महत्त्व आहे. त्यातूनच सच्चा डेरा सौदाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंगसारख्या बाबांना बरे दिवस येणार आहेत. कारण बाबांच्या आदेशावर एकगठ्ठा मतदान होते. लागोपाठ दहा वर्षे सत्तेत असलेल्या अकाली दल-भाजप युतीच्या सरकारबद्दल जनतेत तीव्र असंतोष आहे. यातूनच धार्मिक मुद्दय़ावर ध्रुवीकरण करण्याचा अकाली दलाचा प्रयत्न सुरू झाला आहे. नाभा कारागृहातून पलायन केलेला मिंटो हा दहशतवादी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेच्या इशाऱ्यावर काम करतो. निवडणुकीच्या तोंडावर दहशतवादी कारवायांसाठी पाकिस्तान मिंटोचा वापर करण्याची शक्यता आहे. शीख समाजाला भडकावून पुन्हा एकदा खलिस्तानचे भूत निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आपल्या स्वार्थाकरिता राजकीय मंडळीही त्याला खतपाणी घालण्याची शक्यता आहे. नाभाची घटना हा धोक्याचा इशारा आहे.