आपण ज्यास हॉलंड म्हणून ओळखतो, त्या नेदरलॅण्ड्समध्ये यंदा काही पहिल्यांदाच सार्वत्रिक निवडणूक झालेली नाही. पश्चिम युरोपातील हा देश उदारमतवादी देश. अतिरेकी राष्ट्रवादाला वंशश्रेष्ठत्वाची जोड मिळाली की काय होते हे जवळून पाहिलेला. दुसऱ्या महायुद्धात शेजारच्या नाझी जर्मनीने केलेला विध्वंस अनुभवलेला आणि म्हणूनच लोकशाही उदारमतवादी परंपरांवर गाढ विश्वास असलेला असा हा देश. तेथे आपल्यासारखीच बहुपक्षीय पद्धती आहे. दोन दिवसांपूर्वी तेथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तब्बल २८ पक्ष निवडणूक रिंगणात होते. या बहुपक्षीय पद्धतीचे सर्व गुणदोष तेथेही दिसतात. समविचारी पक्षांच्या आघाडय़ा होतात, फुटतात. त्यात वेगळे असे काहीही नाही. तरीही तेथील यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीकडे सर्व जगाचे, खास करून युरोपीय महासंघातील तमाम देशांचे लक्ष लागून राहिले होते. याचे कारण होते त्या देशात झालेला अतिरेकी उजव्या विचारसरणीच्या पक्षाचा उदय. त्याचे नाव स्वातंत्र्य पक्ष. गेर्ट विल्डर्स हे त्याचे नेते. वय ५४. केसांचा रंग आणि ठेवण काहीशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखीच. त्यांना म्हणतातही हॉलंडचे ट्रम्प. हे अर्थातच केवळ दिसण्यामुळे नाही, तर विचारसरणीमुळे, धोरणांमुळे. ते स्वत:ला उजवे उदारमतवादी म्हणवून घेत असले, तरी त्यांची मुस्लीम आणि स्थलांतरित यांच्याबाबतची मते पाहिली तर आपल्याकडचे तमाम गिरिराज आणि तोगडिया हे मवाळपंथी वाटू लागतील. असा नेता या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता आणि तोच नेदरलॅण्ड्सचा पुढचा पंतप्रधान बनणार अशी हवा होती. नव वित्तभांडवली जागतिकीकरणाच्या सुमारे तीन दशकांच्या इतिहासात त्याला ठाम विरोध करीत होती ती डावी मंडळी. आज तो विरोध कायम आहे, पण विरोधकांची जागा घेतली आहे ती (निदान पाश्चात्त्य देशांत तरी) अतिरेकी उजव्यांनी. हे आता भूमिपुत्रवादी म्हणून पुढे येत आहेत. पॉप्युलिझम – झुंडप्रियता – ही त्याची राजकीय विचारसरणी. ट्रम्प हे अशा झुंडवाद्यांचे शिरोमणी. ब्रिटनमधील ब्रेग्झिटचा विजय हा त्याचाच परिणाम होता. फ्रान्स, जर्मनी, इटली आदी देशांतील लोकांनाही तोच विचार गोड वाटू लागला आहे. नेदरलॅण्ड्समध्ये ही झुंडप्रियता सत्तास्थानी पोहोचली तर सगळेच संपले, अशी भावना अनेक सुजाण नागरिकांच्या मनात होती; पण ते भय सध्या तरी फोल ठरले आहे. मनात केवळ सनसनाटी द्वेषभावना निर्माण करणाऱ्या, आपले गंड कुरवाळणाऱ्या भाषणांनी आणि घोषणाबाजीने आपण वाहावत जाणारे नाही हे डच जनतेने या निवडणुकीत दाखवून दिले आहे. तेथील विद्यमान पंतप्रधान मार्क रुट्ट हेही तसे उजव्यांतलेच; परंतु विल्डर्स यांच्याहून खूपच डावे. त्यांच्या उदारमतवादी पक्षालाच मतदारांनी आपले म्हटले असल्याचे दिसत आहे. तेथील १५० जागांच्या संसदेत पूर्ण बहुमतासाठी लागणारा ७६ हा आकडा कोणालाच गाठता येणार नाही हे स्पष्टच होते. त्यामुळे तेथे येणार ते आघाडीचेच सरकार. हे सर्व वरवर अर्थातच अत्यंत दिलासादायक असे वाटत आहे; परंतु ते तसे नाही. विल्डर्स यांच्या पक्षाहाती सत्तेच्या चाव्या देण्यास सध्या मतदार तयार नाहीत, याचा अर्थ यापुढेही तसेच घडेल असे नाही. मुळात एका उदारमतवादी देशात विल्डर्स यांच्यासारखा नेता जन्मास येणे ही बाबच विचित्र आहे. एखाद्या रोगाच्या साथीसारखा हा विचित्रपणा सर्वत्र पसरत चालला आहे. राजकीय वा आर्थिक व्यवस्थांप्रति लोकांच्या मनात निर्माण झालेल्या असंतोषातून हे घडत आहे. रोगनिदान म्हणून हे ठीक. त्यावरील इलाजाचे काय, हा खरा प्रश्न आहे.