सुसंस्कृत आणि विवेकी जग सुन्न झाले आहे. संताप, भय, संभ्रम अशा विविध भावनांनी त्याला घेरले आहे. नेमके काय करावे हे त्याला सुचेनासे झाले आहे. ही हतबलतेची अवस्था अत्यंत त्रासदायक असते. आज केवळ लंडन वा ब्रिटनच नव्हे, तर सगळेच जग ते सारे अनुभवत आहे. ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी लंडनमधील हल्ल्यानंतर ‘झाले ते बस्स झाले’ अशी प्रतिक्रिया दिली. त्यातून त्यांना सांगायचे आहे की आता आमची सहनशीलता संपली आहे. पण म्हणजे काय? यापुढे करणार काय? मुस्लीम दहशतवादाचा प्रश्न सोडविण्याचा प्रभावी उपाय म्हणून पाश्चात्त्य राष्ट्रे बंदुका, बॉम्ब, रणगाडे आणि ड्रोन विमाने यांकडे पाहात होती. इराक, अफगाणिस्तान, सीरिया, लिबिया.. हल्ले केले या देशांवर. पुढे काय झाले? आता तर दहशतवादी हल्ल्यांची रणनीतीच बदलली आहे. ते मानवी बॉम्ब, त्या एके-47 रायफली ही आता तिसऱ्या जगासाठीची हत्यारे बनली आहेत. विकसित देशांमधील हल्ल्यांच्या पद्धती बदलल्या आहेत. एखादा माथेफिरू अतिरेकी उठतो. आपले वाहन बाहेर काढतो. स्वयंपाकघरातला सुरा खिशात घालतो आणि कुठेही गर्दीत लोकांच्या अंगावर गाडी घालतो. माणसांना भोसकत सुटतो. दहशतवाद्यांचे अड्डे, त्यांच्या टोळ्या यांवर लक्ष ठेवता येते. दहशतवाद-निधीचा माग काढता येतो. त्यासाठी अनेक देशांनी अत्यंत आधुनिक यंत्रणा उभ्या केल्या आहेत. पण या एकेकटय़ा अतिरेक्यांचे काय करणार? त्यांच्या मनात काय चालले आहे हे कसे ओळखणार? हे लोन वुल्फ – एकल दहशतवादी हल्ले. त्यांचा मुकाबला करायचा तर आपणांस ‘पोलीस राज्य’च उभारावे लागेल. पण मग या आणि त्या दहशतीमध्ये फरक तो काय राहिला, हा पाश्चात्त्य समाजापुढचा आजचा मोठा प्रश्न आहे. विकीलिक्सने एनएसए, सीआयए या अमेरिकी गुप्तचर संघटनांच्या कार्यपद्धतीबाबतचे गौप्यस्फोट केल्यानंतर तो समाज किती हादरून गेला होता, हे आपण पाहिलेच आहे. पण गुप्तचर संघटनांनी तसे काही केले नाही, तर मग हे एकल दहशतवादी हल्ले कसे रोखायचे हाही प्रश्नच आहे. हे हल्ले म्हणजे अतिरेकी इस्लामची अपत्ये. तो अतिरेक कसा रोखायचा? अतिरेकाचा मुकाबला अतिरेकाने तर करता येत नाही. अतिरेकाच्या बाबतीत, आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे, असे निदान सुसंस्कृत समाजात तरी नसते. थेरेसा मे यांनीही परवा हेच बोलून दाखवले. त्या म्हणाल्या, दहशतवादातून जन्मतो तो दहशतवादच. पण तरीही अशा हल्ल्यांनंतर हा विरोधी अतिरेकी विचार वर येतोच. डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यानंतर तातडीने काय केले, तर लंडनचे महापौर सादिक खान यांच्यावर हल्ला. किमान ७ जण ठार झाले, ४८ जण जखमी झाले आणि हे महापौर काय म्हणतात तर ‘घाबरण्याचे कारण नाही.’ हे ट्रम्प यांचे ट्वीट. खरे तर या दहशतवादाची निर्भर्त्सना करून खान यांनी लंडनकरांना, पर्यटकांना धीर देताना म्हटले होते की, तुम्हाला आता रस्त्यावर मोठा सशस्त्र पोलीस बंदोबस्त दिसेल. पण त्याने घाबरून जाऊ नका. ट्रम्प यांनी या विधानाची मोडतोड केली. ती त्यांचा अतिरेकी विचार पसरविण्यासाठी. अशा प्रचारातून फक्त द्वेषभावना वाढते. त्या द्वेषाचे उत्तर द्वेषातूनच येते. हे सतानी वर्तुळ. त्यात आपल्याला ओढण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होत असल्याचे सुसंस्कृत, विवेकी जग पाहात आहे. मोठय़ा धीराने ते हल्ल्याच्या ठिकाणी पुष्पांजली वाहात आहे. मँचेस्टर हल्ल्यातील बळींना आदरांजली म्हणून अमेरिकी गायिका अरियाना ग्रांदेने तेथेच ‘वन लव्ह मँचेस्टर’ हा कार्यक्रम केला. हजारो नागरिकांनी त्यात भाग घेतला. पण पुढे काय? त्याचे उत्तर देण्यास आजची राजकीय व्यवस्था सक्षम आहे का? हा त्यांच्याही समोरचा प्रश्न आहे.