प्रा. मधुकर तथा मामा तोरडमल वयाच्या ८४ व्या वर्षी गेले. एका अर्थी कृतार्थ आणि अखेपर्यंत क्रियाशील आयुष्य ते जगले. आपल्याच मस्तीत जगणे म्हणजे काय, हे त्यांच्याकडे पाहून कळे. त्यांचे शेवटचे काही दिवस आजारपणात गेले तरी त्यांचे करारी, ताठ व्यक्तिमत्त्व आणि तल्लख बुद्धी त्या अवस्थेतही कायम होती. स्वतच्या शर्तीवर जगणे म्हणजे काय, हे मामांकडून कुणीही शिकावे. सत्तर-ऐंशीच्या दशकांत महाराष्ट्र राज्य प्रादेशिक नाटय़ स्पर्धेला एक ग्लॅमर होते. राज्याच्या निरनिराळय़ा प्रांतांतील रंगकर्मी आपला कस, प्रतिभा आणि हुन्नर जोखण्यासाठी या स्पर्धेत हिरिरीने उतरत. मुंबई-पुण्यापलीकडचे अनेक सर्जनशील, कल्पक आणि प्रतिभावंत रंगकर्मी त्या स्पर्धेतून मराठी रंगभूमीला मिळाले. त्यातील प्रा. मधुकर तोरडमल हे एक. अहमदनगरमध्ये प्राध्यापकी करीत असताना तोरडमलांनी राज्य नाटय़ स्पर्धेत एकापेक्षा एक अनवट नाटके सादर केली. ‘भोवरा’, ‘एक होता म्हातारा’, ‘सैनिक नावाचा माणूस’, ‘काळे बेट लाल बत्ती’.. या नाटकांद्वारे तोरडमलांनी जाणकार नाटय़रसिक तसेच मुंबईतील जाणत्या रंगकर्मीचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. त्यातही ‘काळे बेट, लाल बत्ती’ने तर त्यांना मुंबईतील व्यावसायिक रंगभूमीची दारे खुली झाली. प्रभाकर पणशीकर, मोहन वाघ, रामकृष्ण नायक या तालेवार नाटय़निर्मात्यांनी प्रा. तोरडमलांमधील विचक्षण लेखक, कल्पक दिग्दर्शक आणि बहुरंगी अभिनेता ओळखला आणि त्यांना व्यावसायिक नाटय़सृष्टीत खेचनू आणले (आणखी एक गंमत अशी की, राज्य नाटय़ स्पर्धेत तेव्हा कोणतीही नाटके- जुनी / नवी .. सादर करता येत असल्यामुळे प्रा. तोरडमलांची गाजलेली नाटके एकाच वेळी अनेक हौशी संस्था सादर करीत असत, इतकी त्यांच्या नाटकांची जबरदस्त मोहिनी होती). त्यानंतर मामांनी ‘नाटय़संपदा’, ‘नाटय़मंदार’, ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’, ‘चंद्रलेखा’ या नाटय़ संस्थांमधून अनेक नाटके सादर केली. लेखक, अभिनेता आणि दिग्दर्शक असा ‘थ्री इन वन’ रंगकर्मी मिळत असल्याने त्यांना आपल्या संस्थेत आणण्यासाठी निर्मात्यांमध्ये रस्सीखेच चाले.

एव्हाना प्रा. मधुकर तोरडमल हे मुख्य नाटय़धारेतील बिनीचे शिलेदार म्हणून प्रस्थापित झाले होते. पुढे त्यांनी अनेक चित्रपटांतून केलेल्या भूमिकाही दखलपात्र ठरल्या. ते मूळचे इंग्रजीचे प्राध्यापक असल्याने आणि जागतिक वाङ्मयाचे त्यांचे वाचन उत्तम असल्याने व्यावसायिक रंगभूमीला काहीएक आकार देण्यात आणि तिला शिस्त लावण्यात तोरडमल यांच्यासारख्या रंगकर्मीचे निश्चितच योगदान होते व आहे. त्यांनी स्वतला कुठल्याही साच्यात अडकवून घेतले नाही. गंभीर, हलकीफुलकी, रहस्यमय, विनोदी अशा सगळय़ा प्रकारची नाटके त्यांनी लीलया हाताळली. ‘गुड बाय डॉक्टर’ हे नाटक त्यातील रंगभूषेमुळे आणि तोरडमलांच्या हाताळणीमुळे तसेच अभिनयाने गाजले. वसंत कानेटकरांनी शेक्सपिअरच्या तीन गाजलेल्या शोकात्मिकांवर लिहिलेले ‘गगनभेदी’ हे नाटक दिग्दर्शनासाठी तोरडमलांकडे आले तेव्हा त्यांना ते मुळीच आवडले नव्हते. स्वत मामांचा शेक्सपिअरचा अभ्यास तगडा असल्याने त्यांना त्यातील दोष जाणवले होते. त्यांनी निर्माते मोहन वाघ यांना तसे स्पष्टपणे सांगितले आणि दिग्दर्शनास नकार दिला. परंतु मोहन वाघांनी ‘गगनभेदी’च्या लंडनमधील शुभारंभाच्या प्रयोगाची तारीख आधीच निश्चित केलेली असल्याने त्यांनी तोरडमलांना ‘काहीही करून तुम्ही नाटक दिग्दर्शित करा’ अशी गळ घातली. तोरडमल हे तेव्हा ‘चंद्रलेखा’चा अविभाज्य भाग असल्याने त्यांनी आपला निर्माता मित्र अडचणीत येऊ नये म्हणून शेवटी माघार घेतली. प्रा. तोरडमलांना विनोदाचे अंग होते, हे ‘तरुण तुर्क, म्हातारे अर्क’, ‘म्हातारे अर्क आणि बाईत गर्क’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी सिद्ध केले. ‘तरुण तुर्क..’चे तब्बल पाच हजार प्रयोग झाले. मात्र, ‘रसिकरंजन’ संस्थेची स्थापना करून त्याद्वारे निर्माता होण्याची त्यांची मनीषा फारशी सफल झाली नाही. अ. भा. मराठी नाटय़ परिषदेचे पदाधिकारी गावोगावी नाटय़ संमेलने घेऊन फक्त पाहुण्यांसारखे त्यात मिरवतात, याची मामांना चीड होती. म्हणूनच अहमदनगरात झालेल्या नाटय़ संमेलनामध्ये त्यांनी नाटय़ परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना ‘भोजनभाऊ’ संबोधून एकच खळबळ उडवून दिली होती. संमेलन उधळले जाते की काय, अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. नाटय़ परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष मच्छिंद्र कांबळी संमेलनाकडे पाठ फिरवून निघाले होते. अखेर सुशीलकुमार शिंदे यांनी कौशल्याने परिस्थिती हाताळून हे संमेलन कसेबसे पार पाडले. मात्र त्या वेळी तोरडमल आपल्या उद्गारांवर ठाम राहिले होते; याचीच परिणती पुढे नाटय़ परिषदेत सत्तांतर होण्यात झाली आणि मोहन जोशी आणि मंडळी नाटय़ परिषदेत आरूढ झाली. परंतु प्रा. तोरडमल, दामू केंकरे आणि सदाशिव अमरापूरकर यांनी ज्या तत्त्वांसाठी हे सत्तांतर घडवून आणले, त्यालाच नंतर मोहन जोशी आणि मंडळीने काळे फासले. ‘पहिले पाढे पंचावन्न’ हे परिषदेचे धोरण अद्यापही सुरूच आहे. ‘भोजनभाऊ’ बदलले, इतकेच. असो.

यथावकाश, नाटय़ आणि चित्रपटसृष्टीतील वावर कमी झाल्यावर मामांनी अन्य लेखनाकडे मोर्चा वळविला. त्यांचे ‘तिसरी घंटा’ हे आत्मपर पुस्तक आणि ‘उत्तरमामायण’ हे अनुभवकथन रसिकांच्या पसंतीस उतरले. ‘रंगरूपदर्शन’ हे रंगभूमीचा विचार मांडणारे त्यांचे पुस्तक त्यांच्यातल्या नाटय़ाभ्यासकाची साक्ष देणारे आहे. त्यांनी अलीकडच्या काळात मोठा लेखनप्रकल्प हाती घेतला तो अगाथा ख्रिस्ती हिच्या कादंबऱ्यांच्या अनुवादाचा! ‘पद्मगंधा प्रकाशना’च्या समग्र अगाथा ख्रिस्ती प्रकल्पापैकी २७ कादंबऱ्यांचे अनुवाद मामांनी केले. त्यांचे इंग्रजी भाषेवरील दांडगे प्रभुत्व आणि पाश्चात्त्य वाङ्मयातून घडलेला विविध भाषारूपांचा अभ्यास येथे कामी आला. ‘समाजस्वास्थ्य’कार र. धों. कर्वे यांनी इंग्रजीत लिहिलेल्या लेखसंग्रहाचे ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ हे भाषांतरही असेच महत्त्वपूर्ण! निवृत्तिपश्चात वेळ कसा घालवावा, हा इतरांना पडणारा बिकट प्रश्न मामांना कधीच पडला नाही. मावळतीच्या सावल्या घनगर्द होत असताना मामा कधीच स्वस्थ बसलेले दिसले नाहीत. अनुवाद, लेखनात ते सतत गुंतलेले असत. समवयस्कांना गोळा करून स्मरणरंजनात मग्न होण्यात त्यांना काडीमात्र रस नव्हता. क्वचित एखाद्या जवळच्या सुहृदाला घरी बोलावून ते त्याच्याशी गप्पा मारत. पण ते तितपतच! आपल्या बहराच्या काळातील आयुष्याचा क्रम जसा त्यांनी ठरवला होता, तशी उतारवयातील चाकोरीही त्यांनीच ठरविली आणि तिचा काटेकोर अंमलही केला.. दोन्ही स्वान्तसुखाय!