कोणतीही कृती करण्याआधी आपण त्याचा विचार करतो. तो कित्येकदा इतका क्षणार्धात असतो की आपण विचार करतो आहोत, हे ही आपल्याला जाणवत नाही आणि कृती होऊन बसते. पण आपण जाणीवपूर्वक या विचारांना, मनातल्या स्वगतांना ऐकायला शिकलो तर..

संध्याकाळची वेळ होती. मस्त वारा सुटला होता. म्हणून केतकी आणि तिची मैत्रीण सोनाली बाल्कनीत गप्पा मारत बसल्या होत्या. केतकीचा मुलगा आदित्य त्याच्या खोलीत खेळत होता. अचानक आदित्यच्या खोलीत काही तरी जोरात पडल्याचा आवाज आला. केतकी पटकन चिडली आणि आदित्यला जोरात हाका मारू लागली. अगं, किती चिडतेस? असं म्हणत सोनालीनं तिला शांत केलं आणि म्हटलं, ‘‘तू आता अचानक एवढी रागावलीस, चिडलीस, कशासाठी? कारण आदित्यच्या खोलीत काही तरी पडलं त्याने तुझ्या मनात काही तरी विचार आले. बरोबर? काय बोलत होतीस तू स्वत:शी?’’
केतकीला काही कळेचना. काहीही प्रश्न विचारते ही. सोनालीने परत विचारलं की, जेव्हा तुला राग येतो किंवा अगदी चिंता वाटते तेव्हा तू स्वत:शी काय बोलतेस? केतकी म्हणाली, अगं असं काही तरी होतं मग चिंता वाटते किंवा राग येतो. त्याआधी मनात काय बोलणार? हे सगळं मनात बोलणं, स्वगत वगैरे नाटक सिनेमात असतात. तेवढय़ात आदित्य खोलीतून बाहेर आला आणि केतकीला म्हणाला, ‘‘अगं आई, वाऱ्यामुळे खिडकीत ठेवलेलं खेळणं जोरात खाली पडलं. त्याचा आवाज झाला.’’ केतकी म्हणाली, ‘‘ठीक आहे. जा आत जाऊन खेळ.’’
सोनाली हसून म्हणाली, ‘‘तुझ्या मनात असं तर नव्हतं ना, की आदित्यनेच पाडलं असेल काही तरी. वेंधळा आहे नुसता.’’ केतकी त्यावर एक क्षणाचा विलंब न लावता म्हणाली, ‘‘अगं आहेच तो वेंधळा. आणि हो म्हणून मनात आधी तेच आलं. त्यानेच काही तरी उपद्व्याप केले असणार. पण आता नाही झालं तसं म्हणा.’’
सोनाली गप्पा मारून निघूनही गेली, पण तिचा विचार केतकीच्या मनात घुटमळत राहिला. आदित्य काही तरी उपद्व्याप करतो, मगच मी चिडते. किंवा काही तरी झाल्यावरच मी चिडते. कोणतीही घटना घडली की आपण त्यावर जी कृती करतो त्यामागे आपला कोणता विचार असतो?
केतकीच कशाला, सगळ्यांची हीच स्थिती असते. आपल्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे आपल्याला कळतच नाही. ‘मन वढाय वढाय’ असं बहिणाबाईंनी म्हटलं आहे. किंवा ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ असं म्हटलं जातं. याचाच अर्थ आपलं मन आपल्याच ताब्यात नाही. आपणच आपले शत्रू असतो? दिवसभरात आपल्या मनात जवळजवळ ५० ते ६० हजार विचार येत असतात, हे आपल्याला कळतही नाही. मनुष्याचा मेंदू प्रगल्भ आहे, त्यामुळे तो विचार करू शकतो. अनुभवणे, पाहणे आदी गोष्टींनी विचाराला चालना मिळते. हे विचार म्हणजेच स्वत:शी बोललेली वाक्यं असतात, पर्यायाने आपले विचार हे आपली स्वगतेच आहेत.
केतकीनेही आता मनात डोकावून बघण्याचा चंगच बांधला. जसं की, ऑफिसमधून घरी जाताना विचार चालू असतात, घरी जाताना भाजी घ्यायला हवी. निवडायची भाजी नको, त्यापेक्षा चिरलेलीच घ्यावी. कारण उद्याच्या प्रेझेन्टेशनची तयारी करायची आहे. घरातूनही लवकर निघायचं आहे. आदित्यचाही अभ्यास बघायला हवा, परीक्षा जवळ आली आहे. मकरंद पुढच्या आठवडय़ात टूरला जाणार. बँकेची कामं करायला हवीत. केतकीच्या लक्षात आलं की, खरोखरच आपण आपल्याशी सतत बोलत असतो. या एक-दोन मिनिटांत मी किती वेगवेगळ्या गोष्टींचा विचार केला.
तिच्या लक्षात आणखी एक गोष्ट आली ती म्हणजे ती संपूर्ण वेळ स्वत:शी मराठीत बोलत होती. पण प्रेझेन्टेशनमध्ये काय काय मुद्दे असायला हवेत याचा विचार करत होती ते मात्र इंग्रजीत होतं. तिच्या मनात हाही विचार आला की, आपल्या मनात हे २४ तास विचार असतात, तर झोपेतील विचार स्वप्नं असायला पाहिजेत आणि तिला हसू आलं. तिच्या आणखी एक गोष्ट लक्षात आली की, आपण टीव्हीवर मालिका, सामने बघतानासुद्धा मनात बोलत असतो. या मालिकांमधील बायका घरात एवढे जरी-काठाचे कपडे, दागिने कसे काय बुवा घालतात? झोपेतून उठल्यावरही त्यांचे केस विस्कटत नाहीत, लिपस्टिक जात नाही. क्रिकेट बघताना मनात म्हणतो, काय सुरेख खेळतो हा तेंडुलकर. माझा आदित्यही खूप छान खेळतो क्रिकेट. त्याला चांगलं ट्रेनिंग मिळायला हवं..
आता तर तिला स्वगतं ऐकायची सवय लागली..
आपण स्वगतातून संभाषणाकडे जातो. तिला आपल्याच स्वगताचे काही प्रकार जाणवले. पहिल्या संभाषण प्रकारात न बोलताही समोरच्याला कळतं. जसं की, केतकीला सगळे सांगायचे, अगं, तू बोलायची गरजच नाही. तुला राग आलाय की आनंद झालाय हे आम्हाला तुझ्याकडे बघून लागेचच कळतं. म्हणजेच तिचं स्वगत जसंच्या तसं तिच्या देहबोलीतून कळायचं. हे झालं तिचं मूक संभाषण. आपल्या संभाषणाचे दोन प्रकार आहेत. एक आपण बोलतो ते आणि दुसरं मूक संभाषण. आपण समोरच्याशी जो संवाद करतो त्यातील ७० टक्के संवाद मूक संभाषणाद्वारे करतो आणि फक्त ३० टक्के प्रत्यक्ष बोलतो. आपण बघतो की तान्ह्य़ा बाळाची भाषा विकसित झालेली नसते, पण तेही मूक संभाषणाद्वारे बरंच काही सांगतं. त्याला भूक लागली आहे हे जर सांगायचं असेल तर ते चुळबुळ करायला सुरुवात करतं, मुठी चोखायला लागतं, तोंडाचा आवाज करतं, इकडे-तिकडे बघतं, एवढं करूनही आईने लक्ष दिलं नाही तर मग भोंगा पसरतं.
दुसऱ्या स्वगत आणि संभाषणाचा प्रकार म्हणजे जे मनात आहे तेच आपण समोरच्याबरोबर बोलतो. केतकीला वाटतं, आपल्या लेकानं चांगलं पौष्टिक अन्न खाल्लं तर तो सशक्त होईल. आजारी पडणार नाही. आणि तसंच ती आदित्यला सांगते, तू बर्गर वगैरे खाण्यापेक्षा घरची भाजी-पोळी, भात-आमटी खात जा. तब्येतीला चांगलं असतं. तुझा स्टॅमिना वाढेल. तुझी खेळातील प्रगती वाढेल.
तिसऱ्या प्रकारात स्वगत एक असतं, पण संभाषणातील वाक्यं मात्र दुसरी असतात. केतकीने केलेली आजची फणसाची भाजी मकरंदला आवडली नाही आणि त्याला तिला दुखवायचंही नसेल तर तो तिला सांगेल, गेल्यावेळची तुझी फणसाची भाजी खूपच छान झाली होती. पण यातलाच दुसरा प्रकार मात्र याच्या अगदी विरुद्ध आहे. यात उपहास असतो. या प्रकारात मकरंद केतकीला म्हणेल (उपहासाने) ‘वा! काय पण भाजी झाली आहे.’ पहिल्या प्रकारात केतकी दुखावली जाणार नाही, पण दुसऱ्या प्रकारात मात्र ती दुखावली जाईल.
चौथा जो प्रकार आहे त्यात पोटात एक आणि ओठावर एक असा प्रकार असतो. याचं उदाहरण म्हणजे ‘बेटा’ या चित्रपटात नायकाच्या सावत्र आईच्या मनात त्याच्याविषयी कधीच चांगले विचार नसतात. पण ती त्याच्याशी इतकी प्रेमाने बोलते आणि वागते की नायकाला आपली आई बोलेल ते खरंच वाटतं.
ही स्वगतं आपल्या भावनांची मुळं आहेत. स्वगत बदलल्यावर भावनापण बदलतात. समजा, केतकीचे शेजारणीबरोबर मतभेद झाले. केतकीचं स्वगत तिच्याशी बोलताना, ही बया भांडकुदळच आहे, असं जर असेल तर तिनं कोणतंही वाक्य उच्चारलं तरी ते विसंवादाकडेच नेईल. पण तशी ती असली तरी मला तिने पूर्वी अडचणीत असताना मदत केली होती, हे मनात असेल तर केतकीला तिचा राग येईल, पण स्वगतात फरक पडल्याने रागाची तीव्रता कमी होईल. केतकीला होणारा त्रास कमी होईल. आणि समजा, अगदी ती शेजारीण मदत करणारी नाही, भांडकुदळच आहे. पण केतकीचं स्वगत जर असं असेल की तिच्या वागण्या-बोलण्यावर माझं नियंत्रण कसं असेल? तिच्या बोलण्याचा आत्ता मला त्रास होत आहे, पण मी शांत राहिले तर तीपण लवकर शांत होईल आणि मग तिच्याशी बोलून बघेन. कदाचित तिला माझं म्हणणं पटेल. याही स्वगताने केतकीला होणारा त्रास, त्रागा कमी होण्यास मदत होईल. केतकीची स्वत:ची असलेली ‘कम्फर्ट लेव्हल’ वाढेल. तिची स्वत:शी छान दोस्ती होईल. ती स्वत:ला मदत करू शकेल.
याचाच अर्थ असा की, बाहेरच्या घटनांनी आपण विचलित होतो. पण त्याआधी आपण आपल्या स्वत:च्या विचारांनी विचलित होतो. कारण आपण आपल्याशी सतत बोलत असतो. एकाच वेळी आपली अनेक स्वगते चालू असतात. विचलित झालेलो असताना त्यांची गतीपण जास्त असते. कधी कधी आपण तीच तीच दुष्ट स्वगते मनात घोळवतो आणि दु:खाला आमंत्रण देतो.
जीभ आणि लेखणी यांना धारदार शस्त्र म्हटलं आहे. आपल्या मनातले विचार देहबोलीतून, शब्दरूपाने तोंडातून अथवा लेखणीतून बाहेर पडतात. म्हणजेच आपले विचार, स्वगत हे कधी कधी शस्त्राचही रूप घेतात. पण याच विचारांना, स्वगताला आपण वळण लावलं तर आपलं जीवन सुंदर होऊ शकतं. म्हणून केतकीप्रमाणेच आपणही आता आपल्या स्वगतावर लक्ष ठेवू या.
madhavigokhale66@gmail.com

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या