जागतिक स्तरावर भारताची सर्वोत्तम कामगिरी

देशातील नागरी हवाईउड्डाण क्षेत्रात गेल्या वर्षी १८ टक्क्यांची वाढ नोंदली आहे. जागतिक स्तरावर भारताने नागरी हवाईउड्डाण क्षेत्रात घेतलेली झेप सर्वोत्तम गणली गेली आहे.

सार्वजनिक सेवांच्या प्रदानात सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून त्यासाठी विशेष मेहनत घेत असल्याचे प्रतिपादन या खात्याचे नवे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी नुकतेच केले. व्यवसायातील सर्व कार्यामध्ये दर्जाविषयक मानकांचा अंगीकार व्हावा, याकरिता प्रोत्साहन देणारी सरकारी संस्था ‘क्वालिटी काऊंसिल ऑफ इंडिया’तर्फे ‘नॅशनल क्वालिटी कॉन्क्लेव्ह’च्या ११व्या आवृत्तीचे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते.

‘१२५ कोटी नागरिकांसाठी दर्जात्मक सुधारणा’ संकल्पनेवर आधारित या परिषदेत सिन्हा यांनी म्हटले की, देशातील काही काही विमानतळे जगात सर्वोत्तम आहेत आणि हवाई नागरी महासंचालनालय व इतर नियामक संस्थांच्या माध्यमातून सरकार प्रवासीस्नेही उपाययोजना हाती घेत प्रवाशांच्या हक्कांना सर्वोच्च प्राधान्य देणार आहे.

भारताने २०१६ च्या ऑगस्टमध्येही या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना २४ टक्के प्रवासी वाढ नोंदविली आहे. या कालावधीत ८३ लाख प्रवाशांची वाहतूक देशातील हवाई सेवेने केल्याचे नागरी हवाई महासंचालनालयाने स्पष्ट केले आहे.

क्षेत्रीय हवाई जोड योजना नव्या वर्षांत कार्यान्वित

छोटय़ा शहरांना हवाई सेवेद्वारे जोडणाऱ्या क्षेत्राय हवाई जोड योजनेला जानेवारी २०१७ पासून सुरुवात होईल, अशी घोषणा केंद्रीय नागरी हवाई उड्डाणमंत्री अशोक गजपती राजू यांनी मंगळवारी केली. क्षेत्रीय हवाई जोडअंतर्गत पहिले विमान जानेवारीच्या सुरुवातीच्या उड्डाण घेईल, असेही ते म्हणाले. याबाबत महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, झारखंड राज्यांबरोबर करार करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.