हवाई प्रवासी वाहतुकीत दर कमी करण्याबाबत स्पर्धा निर्माण झाल्यानंतर कंपन्यांकडून आता अनोखी कल्पना राबविली जात आहे. ‘झीरो बॅगेज फेअर’ अंतर्गत  प्रवाशांना अधिक तिकिट दरशुल्क सवलत तर अन्य प्रवाशांना त्यांच्या सामानावर अतिरिक्त दर आकारण्याची तयारी सुरू आहे.
याबाबतचा प्रस्ताव नागरी हवाई महासंचलनालयाकडे सादर करण्यात आला आहे. यासाठी स्पाईसजेट, इंडिगो व एअरएशिया यांनी पुढाकार घेतला आहे. या तिन्ही कंपन्या कमी दरातील हवाई सेवा प्रवास सुविधा उपलब्ध करतात. या प्रस्तावानुसार १५ किलोपर्यंतचे वजन वाहून नेणाऱ्या बॅगसाठी व त्याचे ‘चेक इन’ न करणाऱ्या (म्हणजे सामान आपल्याबरोबर नेण्यासाठी) प्रवाशांना त्यांच्या प्रवासी तिकिटांवर काही प्रमाणात सवलत दिली जाणार आहे. याउलट १५ किलो वजनापेक्षा अधिक व ‘चेक इन’ (म्हणजे स्वत:बरोबर न नेता थेट विमानात नेऊन ठेवण्यासाठी) बॅगसाठी काही अतिरिक्त शुल्क आकारण्याची तयारी सुरू आहे. कंपन्यांच्या या अनोख्या सवलतीच्या प्रस्तावाबाबत विचार सुरू असून त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे महासंचलनालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले. या योजनेबाबत संबंधित कंपन्यांना अधिक विचारणा करण्यात येणार असल्याचेही हा अधिकारी म्हणाला.