आशियाई अर्थसत्ता चीनमध्येही अलिबाबाच्या गुहांना तोटा नाही, पण तेथील अलिबाबा ग्रुप होल्डिंग्ज पीटीई लि. या नावाच्या ई-व्यापार क्षेत्रातील जागतिक कंपनीकडून विक्रमाचा एक नवीन मानदंड स्थापित होऊ घातला आहे. मूळची चिनी कंपनी असली तरी तिने तिच्या समभागांची प्रारंभिक भागविक्री (आयपीओ) अमेरिकेत प्रस्तावित केली आहे. शिवाय यातून उभारले जाणारे भांडवल या आधीच्या सर्व भागविक्रीचे विक्रम मोडीत काढणारे ठरेल, असे कयास आहेत.
येत्या १९ सप्टेंबरपासून विक्री सुरू होणे अपेक्षित असलेल्या अलिबाबाच्या समभागांचा प्रत्येकी ६० ते ६६ अमेरिकी डॉलर असा बोली लावण्यासाठी किंमत पट्टा निश्चित केला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी भागविक्री म्हणून २०१२ सालातील फेसबुकच्या भागविक्रीकडे पाहिले जाते. फेसबुकने भागविक्रीच्या माध्यमातून १६ अब्ज डॉलर उभे केले, तर अलिबाबाबद्दल आताशी दिसणारी उत्सुकता पाहता ही कंपनी त्याहून दीडपट म्हणजे २४.३ अब्ज डॉलर (साधारण दीड लाख कोटी रुपये) माया गुंतवणूकदारांकडून गोळा करेल, असे म्हटले जात आहे.