छोटय़ा उद्योगांना त्यांच्या उत्पादनाच्या विक्रीचे मार्ग अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने अॅमेझॉनने ‘तत्काळ’ ही सुविधा सुरू केली आहे. मुंबईतील हजारो लघू आणि मध्यम उद्योजकांना अवघ्या ६० मिनिटांत त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेचा मार्ग खुला करण्यास यातून मदत मिळणार आहे.
‘अॅमेझॉन तत्काळ’ हा फिरता उपक्रम असून याद्वारे नोंदणी कल्पना, उत्पादन-सेवांची यादी तसेच मूलभूत विक्री यंत्रणा आदी सुविधांचा लाभ उत्पादकांना दिला जाणार आहे. या सुविधेमुळे हजारो इच्छुक विक्रेत्यांना यांची उत्पादने ऑनलाइन विकण्याची संधी आणि अनुभव घेता येणार आहे. मुंबईतील छोटे मोठे उद्योजक, कारागीर, विक्रेत्यांना कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, कलाकुसरीच्या वस्तू, पुस्तके आदी उत्पादने केवळ ६० मिनिटांच्या आत सोपस्कार पूर्ण करून विकता येणार आहेत.
‘अॅमेझॉन डॉट इन’वर असलेल्या विक्रेत्यांनी गेल्या वर्षी तब्बल २५० टक्क्यांची वृद्धी अनुभवली आहे. तर अॅमेझॉन तत्काळ हा उपक्रम देशभरातील हजारो लघु आणि मध्यम उद्योजकांना जलद आणि सुलभपणे विकण्याची अनुभूती देईल, असा विश्वास अॅमेझॉन इंडियाचे संचालक आणि व्यवस्थापक गोपाल पिलई यांनी व्यक्त केला. अॅमेझॉनने अलीकडेच विक्रेत्यांसाठी स्वतंत्र भागीदारीच्या माध्यमातून माफक व्याज दरात पाच लाखांपासून दोन कोटीपर्यंतची सुरक्षित व असुरक्षित कर्जे देण्यासही सुरू केले आहे.