मुंबईतील २५० किराणा विक्रेत्यांशी संधान
ऑनलाइन वाण-सामान विक्रीतील देशातील सर्वात मोठे संकेतस्थळ असलेल्या आस्कमी ग्रोसरीने चालू वर्षांच्या अखेपर्यंत देशातील ८०हून अधिक शहरातील २००० हून अधिक किराणा विक्रेत्यांना आपल्या व्यवसाय ढाच्यात सामावून घेण्यात लक्ष्य निर्धारित केले आहे. नुकत्याच मुंबईत प्रवेश केलेल्या या कंपनीने या परिसरातील २५० विक्रेत्यांबरोबर सामंजस्याचे नियोजन आखले आहे.
सध्या देशातील ३८ शहरांतून १००० विक्रेत्यांसह सुरू असलेल्या आस्कमी ग्रोसरीची नव्या विस्तारांतून एकूण उलाढाल मार्च २०१७ अखेर २,००० कोटी रुपयांच्या घरात जाईल, असा विश्वास आस्कमी ग्रोसरीचे सह-संस्थापक अंकित जैन यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. मुंबईतील आपल्या सेवा जाळ्यात, पितांबरी, अपोलो फार्मसी, इट-मी (उमा फूड प्रॉडक्ट्स), नॅशनल चिक्की यासारख्या १० स्थानिक नाममुद्रांना त्यांच्या उपस्थितीत सामावून घेण्यात आले. ब्रॅण्डेड उत्पादने ते कोणतीही ब्रॅण्ड नसलेले तेल, धान्य, कडधान्य, डाळी, शीतपेये, बालकांची निगेची उत्पादने अशी जवळपास (एकूण ४०,०००) नजीकच्या किराणा दुकानांत उपलब्ध वस्तू ऑनलाइन मागणी नोंदविणाऱ्या ग्राहकांना घरपोच पोहचत्या करण्याचा आपला हा सेवा व्यवसाय वेगाने वृद्धी करीत असल्याचे जैन यांनी सांगितले.
जैन यांनी आस्कमी ग्रोसरीचा ऑनलाइन व्यवसाय तीन वर्षांपूर्वी नवी दिल्लीतून सुरू केला. एका अधिकृत पाहणीनुसार, हे सेवा क्षेत्र भारतात वार्षिक ६२ टक्के या उमद्या दराने प्रगती करीत आहे. पुढील चार वर्षांत ऑनलाइन वाणसामान विक्रीच्या बाजारपेठेतील उलाढाल भारतात दसपटीने वाढून १ लाख कोटींपल्याड जाणे अपेक्षित आहे. तरीही तिचा एकूण किराणा विक्री बाजारपेठेतील हिस्सा हा जेमतेम ३ टक्के इतकाच असेल. त्यामुळे या क्षेत्रात वाढीला आणि स्पर्धेलाही आणखी बराच मोठा वाव आहे, असे प्रतिपादन जैन यांनी अन्य स्पर्धकांकडून मिळत असलेल्या आव्हानांबाबत मत व्यक्त करताना केले.