तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

गेल्या पंधरा दिवसाची निफ्टीची विश्रांती ही कंटाळवाण्या, रटाळ स्वरूपाची.. ‘ना धड वर, ना खाली’ अशा स्वरूपाची आहे. या कंटाळवाण्या विश्रांतीचं स्वरूप आज आपण समजून घेऊया.

घसरण (करेक्शन) ही दोन स्वरूपात मोडते.

१. कालानुरूप / कालबद्ध स्वरूपाची (टाईम वाईज)

२. किमतीनुरूप घसरण (प्राईस वाईज)

कालानुरूप घसरणीत किमतीत जास्त चढ-उतार न होता दिवसामागून दिवस उलटत जातात. महिनाभर भाव तसाच पडून राहिला आहे, असे आपण बोलू लागतो. या स्थितीला कालबद्ध स्वरूपाची घसरण संबोधतात. जी आपल्या डोळ्याला जाणवत नाही. (सध्या निर्देशांकावर कालानुरूप घसरण चालू आहे. गेल्या पंधरा दिवसात निफ्टी २०० अंशांमध्ये फिरत आहे.)

किमतीनुरूप घसरणीत अल्पावधीत कोसळलेले भाव डोळ्याला दिसतात. काळजीने घालमेल व भीतीतून थरकाप आणि पर्यायाने आíथक फटकाही बसतो.

पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची वाटचाल :

शुक्रवारचा बंद भाव  : सेन्सेक्स-२९,३६५.३० निफ्टी- ९,११९.४०

अजूनही निर्देशांकांनी – सेन्सेक्सने २९,१००चा आणि निफ्टीने ९,०००चा स्तर टिकवला आहे व येणाऱ्या दिवसात हे स्तर टिकवण्यात निर्देशांक यशस्वी ठरले तर ते ३०,००७/ ९,२७४ च्या ऐतिहासिक उच्चांकाला गवसणी घालेल व या उच्चांकावर निर्देशांक टिकल्यास ३१,०००/९,५००-९,६००चा नवीन उच्चांक असेल.

अन्यथा निर्देशांक ३०,००७/ ९,३०० चा स्तर ओलांडण्यात अपयशी ठरला आणि निर्देशांकांनी २९,२४०/ ९,०७५ च्या पातळीला नकारात्मक खालचा छेद दिल्यास, निर्देशांकांचे खालचे प्रथम उद्दिष्ट २९,०००/ ८,९००-९,००० आणि नंतर २८,३००/ ८,८०० पर्यंत निर्देशांक खाली येऊ शकेल.

सोने : गेल्या आठवडय़ात भाकीत केल्याप्रमाणे सोन्याने २९,०००चा स्तर टिकवून आपले प्रथम वरचे उद्दिष्ट गाठून ते २९,६५०च्या समीप पोहोचले आणि नंतर संक्षिप्त अशी घसरण सुरू झाली. सद्य:स्थितीत सोन्याची कलनिर्धारण पातळी ही २९,३०० असून ३०० रुपयांचा आखूड पट्टा निर्माण झाला आहे. २९,३००च्या वर २९,६०० अन्यथा हा स्तर टिकवण्यात अपयश आल्यास सोने २९,००० पर्यंत खाली येऊ शकते.  (सोन्याचे भाव एमसीएक्सवरील व्यवहाराचे आहेत.)