तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

गेल्या आठवडय़ात या स्तंभात एक महत्त्वाचे वाक्य होते- ‘‘सेन्सेक्ससाठी ३०,३५० आणि निफ्टीसाठी ९,४५० या महत्त्वाच्या ‘कलनिर्धारण पातळ्या’ असतील. या स्तरावर निर्देशांक टिकल्यास त्यांचे प्रथम वरचे उद्दिष्ट अनुक्रमे ३०,७००/९,५५० आणि दुसरे उद्दिष्ट ३१,०००/९,६५० असे असेल.’’ या आठवडय़ात निर्देशांकांनी स्थितप्रज्ञता झटकून टाकत, आपले प्रथम वरचे उद्दिष्ट ३१,००० / ९,५५० गाठलेले आपल्याला दिसले.

पुढील आठवडा कसा?

  • शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स- ३१,०२८.२१
  • निफ्टी – ९,५९५.१०

येणाऱ्या दिवसात निर्देशांकाला ३०,२५०/ ९,३५० या पातळ्याचा भरभक्कम आधार आहे व बाजारातील तेजीची उमेद, उत्साह टिकून राहाण्यासाठी सेन्सेक्ससाठी ३०,३५० आणि निफ्टीसाठी ९,४५० या जुन्याच कलनिर्धारण पातळ्या असतील. निर्देशांक सातत्याने हा स्तर टिकविण्यात यशस्वी ठरल्यास निर्देशांकाचे प्रथम वरचे उद्दिष्ट ३१,००० / ९,६५० आणि नंतर ३१,२५० ते ३१,५०० / ९,७५० ते ९,८०० चा नवीन उच्चांक दृष्टिपथात येईल.

सोन्यातील कल

  • गेल्या वेळेच्या लेखातील ‘सोने विरुद्ध सेन्सेक्स द्वंद्व’ या परिच्छेदात सोन्याच्या भावाला रु. २८,५०० ही महत्त्वाची कलनिर्धारण पातळी असा उल्लेख आला होता व हा स्तर टिकविण्यात सोन्याचा भाव यशस्वी ठरल्यास रु. २८,९०० हे प्रथम वरचे उद्दिष्ट असेल असे सूचित केले होते ते गुरुवार १८ मे रोजी साध्य झाले.

सद्य:स्थितीत सोन्याचा मार्गक्रमण पट्टा हा २८,५०० ते २९,००० असेल.( सोन्याचे भाव एमसीएक्सवरील व्यवहाराचे आहेत.)