सलग तिसऱ्या दिवशी  भांडवली बाजार निर्देशांकांचा वर्षांच्या उच्चांकी पातळ्यांवरी दौड कायम राहिल्याचे बुधवारी आढळून आले. १०९.१६ अंश वाढीसह सेन्सेक्स २८,४५२.१७ अशा गेल्या १३ महिन्यांच्या वरच्या टप्प्यावर पोहोचला.

दिवसभर तेजी राखणाऱ्या मुंबई निर्देशांकाचा प्रवास बुधवारी २८,५३२.२५ ते २८,३६३.१० या पातळ्यांदरम्यान राहिला. बुधवारच्या सत्रात ८,८०० चा स्तर दाखविणाऱ्या निफ्टीने दिवसअखेर ४१.८५ अंश वाढ नोंदवत ८,७८६.२० ने सत्राचा शेवट केला. व्यवहारात ८,८१९.२० पर्यंत वाढ नोंदविणाऱ्या निफ्टीनेही गत १६ महिन्यांतील नवीन उच्चांक गाठला.

गेल्या दोन दिवसांतील सेन्सेक्सची वाढ ५६०.७६ अंशांची आहे. तर  मुंबई निर्देशांकाचा बंद स्तर हा २२ जुलै २०१५ नंतरचा सर्वोच्च ठरला आहे. बुधवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराचे एकूण बाजारमूल्य अभूतपूर्व असे १११ लाख कोटी रुपये असे  नोंदले गेले.

आंतरराष्ट्रीय बाजारात संमिश्र वातावरण राहूनही स्थानिक गुंतवणूकदारांनी खरेदीचे धोरण अनुसरल्यामुळे सेन्सेक्सने १३ तर निफ्टीने १६ महिन्यांचा उच्चांक बुधवारी नोंदविल्याचे बीएनपी पारिबा म्युच्युअल फंडाचे निधी व्यवस्थापक (समभाग) श्रेयस देवलकर यांनी सांगितले.

ऑगस्टमधील विक्रीचे आकडे स्पष्ट होऊ लागल्यानंतर वाहन क्षेत्रातील हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्ससारख्या कंपन्यांच्या समभागांना मागणी नोंदली गेली. त्याचबरोबर बँक क्षेत्रातील एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, स्टेट बँक यांचेही मूल्य वाढले. सेन्सेक्समधील ११ समभागांना मागणी होती. त्यातही लार्सन अँड टुब्रो, एशियन पेंट्स, आयटीसी, पॉवर ग्रिड, विप्रो हे २.७१ टक्क्यांपर्यंत आघाडीवर होते.

बांधकाम क्षेत्रातील समभागांची २० टक्क्यांची झेप घेतली. क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये १.४० टक्के वाढीसह भांडवली वस्तू सर्वात आघाडीवर राहिला. ग्राहकोपयोगी वस्तू, बँक निर्देशांकांनीही तेजी नोंदविली. मुंबई शेअर बाजारातील मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांमध्ये अनुक्रमे ०.३७ व ०.१८ टक्के वाढ नोंदली गेली.

सलग महिने निर्देशांकांचा सकारात्मक प्रवास

बुधवारी सायंकाळी जाहीर होणाऱ्या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाही सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) दराच्या आकडय़ापूर्वी बाजारातील गुंतवणूकदारांचा खरेदीचा जोर राहिला. परिणामी सलग सहाव्या महिन्यात प्रमुख निर्देशांकांचा वाढ नोंदविणारा सकारात्मक प्रवास राहिला आहे. ऑगस्टमध्ये सेन्सेक्सने ४०१.३१ अंश भर टाकली आहे. नोव्हेंबर २०१४ नंतर प्रथमच सलगपणे सहा महिने निर्देशांक वाढत आला आहेत. चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत सेन्सेक्स ३,११०.३१ अंशांनी वाढला आहे.

डिसेंबपर्यंत सेन्सेक्सचा २८,८००चा कळस : सिटीग्रुप

फेडरल रिझव्‍‌र्हने व्याजदर वाढ केली तरी त्याची स्थानिक बाजाराला चिंता नाही, असे नमूद करत सिटीग्रुपने डिसेंबर २०१६ पर्यंत सेन्सेक्स २८,८०० चा स्तर अनुभवेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. फेड डिसेंबरमध्येच व्याजदरात वाढ करेल, असे ठोस कयास करीत या वित्तसंस्थेने भारतीय अर्थव्यवस्थेच्या भक्कम बलस्थान सेन्सेक्सला वरच्या टप्प्यावर घेऊन जाईल, असे म्हटले आहे. भारतातील भांडवली बाजाराचा प्रवास उत्तम सुरू असून डॉलरच्या तुलनेतील रुपयाचा स्तरही फार चिंताजनक नाही, अशी पुस्तीही जोडली आहे.