बडी नाममुद्रा.. बडी भागविक्री!

तरुणांच्या गप्पाटप्पांचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘सीसीडी’ अर्थात ‘कॅफे कॉफी डे’ दालन शृंखलेची मुख्य प्रवर्तक कॉफी डे एन्टरप्राईजेस येत्या आठवडय़ात भांडवली बाजारात उतरत असून कंपनी यामार्फत गेल्या तीन वर्षांतील सर्वात मोठी निधी उभारणीचा इतिहास रचणार आहे.

कॉफी डे एन्टरप्राईजेसद्वारे कॅफे कॉफी डे ही पेय दालनांची शंृखला चालविली जाते. कंपनीचे विविध १४ देशांमध्ये अस्तित्व आहे तर भारतात १,५०० दालने आहेत. तब्बल तीन वर्षांतील सर्वात मोठी निधी उभारणी ठरणाऱ्या या मोहिमेची घोषणा कंपनीने बुधवारी मुंबईत केली.

कंपनी १४ ऑक्टोबर रोजी बाजारात धडकत असून प्रारंभिक खुल्या भागविक्रीद्वारे १,१५० कोटी रुपयांची निधी उभारणी केली जाणार आहे. यासाठी कंपनीने प्रत्येकी १० दर्शनी मूल्याच्या समभागाचा किंमत पट्टा ३१६ ते ३२८ रुपये असा निश्चित केला आहे. यानंतर कंपनीची सूचिबद्धता मुंबई तसेच राष्ट्रीय शेअर बाजारात होईल.

भागविक्रीसाठी कंपनीचे समभाग १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान उपलब्ध असतील. याकरिता कोटक इन्व्हेस्टमेंट बँक, सिटी ग्रुप, मॉर्गन स्टॅनले, अ‍ॅक्सिस कॅपिटल, एडेलवाईस आणि येस अशी नामांकित निधी सल्लागारांची फळी सज्ज आहे. पात्र कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने १५ लाख समभाग राखून ठेवले आहेत. समभागांच्या बोलीकरिता किमान ४५ समभागांची अट आहे.

कॅफे कॉफी डे ही नाममुद्रा टाटा समूहाची या क्षेत्रातील भागीदारी असलेल्या स्टारबक्सबरोबर स्पर्धा करते. निधी उभारणीतील काही रक्कम कर्जाचा भार हलका करण्यासाठी व उर्वरित व्यवसाय विस्ताराकरिता उपयोगात आणली जाईल, असे कंपनीचे अध्यक्ष व्ही. जी. सिद्धार्थ यांनी या वेळी स्पष्ट केले आहे.

कंपनीत सर्वाधिक ५४.७८ टक्के हिस्सा असलेल्या सिद्धार्थ यांनी कंपनी प्रति वर्ष १३५ दालने सुरू करणार असल्याचा मनोदयही व्यक्त केला आहे. दोन वर्षांपूर्वी १८९ कोटी रुपयांचा नफा कमाविणाऱ्या या कंपनीत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील पूर्वाश्रमीचे अग्रणी नंदन निलेकणी तसेच प्रसिद्ध बाजार गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांचीही गुंतवणूक आहे.

बडे ब्रॅण्ड्स रांगेत..

कॉफी डे एन्टरप्राईजेसपाठोपाठ इन्फिबिम ही ई-कॉमर्स गटातील पहिली कंपनीही बाजारात उतरत आहे. शिवाय नागरी हवाई सेवेतील इंटरग्लोब एव्हिएशनही (इंडिगो विमान प्रवासी नाममुद्रा) प्रारंभिक खुल्या भागविक्रीकरिता सज्ज आहे. एकटय़ा २०१४ मध्ये सहा कंपन्यांच्या भागविक्री प्रक्रियेद्वारे १,५२८ कोटी रुपये उभारले गेले होते.