विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीबाबत सरकारच्या निर्णयाला सर्वप्रथम सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या युरोपच्या अक्सा कंपनीला भारतातील भारती समूहातील दोन विमा कंपनीत हिस्सा वाढविण्यास भारतीय स्पर्धा आयोगाने अखेर मंजुरी दिली आहे. यानुसार अक्सा समूह भारतीबरोबरच्या जीवन तसेच सर्वसाधारण विमा कंपनीतील आपला हिस्सा २६ टक्क्यांवरून ४९ टक्क्यांपर्यंत नेईल.
सुनील भारती प्रवर्तित भारती समूहाच्या भारती अक्सा लाइफ इन्शुरन्स व भारती अक्सा जनरल इन्शुरन्स या कंपन्या आहेत. यामध्ये विदेशी गुंतवणूक वाढविण्यास आता परवानगी मिळाली आहे. यापूर्वी अशी नाहरकत विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने दिली आहे.
पॅरिसस्थित अक्सा कंपनी आता १,२९० कोटी रुपयांची गुंतवणूक त्यासाठी करील. पैकी सर्वाधिक ८५८.६० कोटी रुपये जीवन विमा तर निम्मे, ४३१.४० कोटी रुपये सर्वसाधारण विमा कंपनीत येतील.
मार्चमध्ये केंद्र सरकारने विदेशी गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर अक्सा-भारती समूहाने पहिल्यांदा प्रतिसाद दिला होता.
दरम्यान, जपानी कंपनीबरोबर भागीदारी असलेल्या एडेलविस टोकियो लाइफ इन्शुरन्स कंपनीने ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणूक मर्यादावाढीसाठी विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाकडे गुरुवारी अर्ज सादर केला. टोकियो कंपनीचा सध्या एडेलविसमध्ये २६ टक्क्यांपर्यंत हिस्सा आहे. भारतात २०११ पासून वित्त सेवा क्षेत्रात असलेल्या कंपनीच्या ४९ प्रमुख शहरांमध्ये ५९ शाखा आहेत.
कोटक महिंद्रला मात्र नकार
मुंबई:  देशातील चौथ्या क्रमांकाची खासगी बँक कोटक महिंद्रमध्ये थेट विदेशी गुंतवणूक वाढविण्यास विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळानेही नकार दिला आहे. बँकेतील विदेशी गुंतवणूकदारांचे प्रमाण ५५ टक्क्यांपर्यंत नेण्यास यापूर्वी कोटक महिंद्रला केंद्रीय मंत्रिमंडळानेही लाल कंदील दाखविला होता. याबाबत आपल्याला अद्याप वित्त सेवा विभागाकडून काहीही सांगण्यात आले नसल्याचे मंडळाचे अध्यक्ष व वित्त सचिव राजीव मेहरिषी यांनी सांगितले. कोटक महिंद्रमध्ये आयएनजी वैश्यचे विलीनीकरण झाल्यानंतर विदेशी गुंतवणुकीचे प्रमाण ४८.५५ टक्क्यांपर्यंत गेले आहे.