तुलनेत सॅमसंग, नोकिया या बाजारहिश्श्यात अग्रणी ब्रॅण्ड्स मोठय़ा फरकाने मागे पडतील, अशी देशाच्या स्मार्टफोनमध्ये चिनी कंपन्यांच्या नवनव्या मोबाइल हँडसेट्सच्या जोरदार मुसंडीचे २०१४ हे साल ठरले.
शिओमी, ओप्पो, वन प्लस, विवो (अगदी अखेरच्या डिसेंबर महिन्यातच) हे नवे चिनी खेळाडू भारतीय मोबाइल प्रांगणात  मायक्रोसॉफ्ट, स्पाइस, लावा, कार्बन यांच्याशी स्पर्धेसाठी दाखल झाले.
देशात वाढत्या स्मार्टफोन वापरामुळे कंपन्यांनीही त्यांचे मोबाइल हॅण्डसेट्सच्या किमती किमान स्तरावर आणल्या. अगदी ५,००० रुपयांतही भारतात विदेशी बनावटीचा स्मार्टफोन उपलब्ध होऊ लागला. भारतात या मोबाइल प्रकारात अमेरिकेलाही मागे टाकेल, असे सर्वेक्षण समोर येऊ लागले. ‘आयडीसी’च्या अंदाजानुसार २०१३ मध्ये ४.४० कोटी स्मार्टफोन विकले गेले असतानाच जानेवारी ते सप्टेंबर २०१४ दरम्यान त्यांची संख्या ५.९३ कोटी झाली. डिसेंबरअखेर ही संख्या ८ कोटींच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे. मात्र भारतात अद्यापही फीचर फोनचा हिस्सा अधिक, ७० टक्क्यांपर्यंत आहे.  
मोबाइल क्षेत्रात या वर्षांत ब्लॅकबेरी जवळपास नाहीशीच झाली. स्मार्टफोन श्रेणीत अधिकाधिक मोबाइल सादर करीत स्थिर राहण्याचा प्रयत्न कंपनीकडून झाला. तर नोकिया ही फिनलॅण्डची कंपनी सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीच्या मायक्रोसॉफ्टने ७.२ अब्ज डॉलरने आपल्या ताब्यात घेतली. यानंतर तिचे ल्युमिया हे रूप कायम ठेवत आता तर मायक्रोसॉफ्टने त्यामागे आपलेच नाव देऊ केले आहे. तर गुगलकडून मोटोरोलाने लिनोवा खरेदी केले. अमेरिकी आयफोननेही एसमधील नवनवे रूप सादर करीत आपला बाजार हिस्सा वाढविण्याचा प्रयत्न केला. मोटो जीद्वारे मोटोरोलाही नव्या अवतारात पुन्हा सज्ज झाला.

ई-व्यापाराची अद्भूत झेप!  
दूरसंचार क्षेत्रातील अस्थिर वाटचालीबरोबरच २०१४ ने ई-कॉमर्स क्षेत्रात वेगवान घडामोडी नोंदविल्या. एरवी दिवाळीसारख्या सणांमध्ये ऑनलाइन खरेदीच्या जाहिरातींचा मारा सहन करण्याची सवय झालेल्या भारतीय ग्राहकांपुढे या वर्षांत अधिक पर्याय बिगरमोसमातही उपलब्ध झाले. निधी उभारणीचे व्यवहारही याच क्षेत्रात यंदा सर्वाधिक नोंदविले गेले. २०१४ च्या अखेरीस चीनच्या अलिबाबा डॉट कॉमने तर अमेरिकेच्या अ‍ॅमेझॉनसमोर आव्हान उभे केले. कंपनीने थेट अमेरिकेच्या भांडवली बाजारात प्रवेश करीत जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनण्याचा मानही मिळविला. स्नॅपडिल, फ्लिपकार्ट, क्विकर यांचे अस्तित्व स्पर्धेच्या निमित्ताने या वर्षांत जाणवले. त्यांचे व्यवहार या वर्षांत इतके वाढले की त्याबाबतच्या ग्राहकांच्या तक्रारीही वाढल्या. परिणाम स्वरूप या क्षेत्रासाठीच्या स्वतंत्र कायद्यांची, नियामकाची आवश्यकता सरकार पातळीवरून व्यक्त केली गेली. ई-कॉमर्समधील स्पर्धेत अगदी साखळी शृंखला असलेल्या क्रोमा, टाटा हाऊसिंगसारख्यांनाही सहभागी करून घेतले. परिणामी त्यांच्यासह किराणासारख्या शहरातील छोटय़ा एकेरी दालनांनीही हा पर्याय आत्मसात करण्याचा प्रयत्न २०१४ मध्ये केला.