बिकट अर्थस्थितीपोटी अनेक उड्डाणे गेल्या काही दिवसांमध्ये रद्द करावे लागणाऱ्या स्पाइसजेट या छोटय़ा हवाई प्रवासी सेवा कंपनीने अखेर सरकारला अर्थउभारणीचा आराखडा सादर केला. यानुसार अमेरिकेतील जेपी मॉर्गन स्टॅनले ही वित्तसंस्था २० कोटी डॉलरची गुंतवणूक कंपनीत करण्यास तयार असल्याचे या वेळी स्पाइसजेटमार्फत सांगण्यात आले.
सन समूहातील स्पाइसजेटचे संस्थापक अजय सिंह यांच्यासह जेपीदेखील नव्या गुंतवणुकीत आपला हिस्सा राखेल. कंपनी बिकट अर्थस्थितीत असलेल्या चर्चेपासून स्पाइसजेटमध्ये आतापर्यंत १७ कोटी रुपये गुंतवण्यात आले आहेत.
स्पाइसजेटचे मुख्य चलन अधिकारी संजीव कपूर यांनी शुक्रवारी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक सचिव व्ही. सोमसुंदरम यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या वेळी सिंह हेही उपस्थित होते.
कंपनी सध्या दिवसाला २३० उड्डाणे घेत असून तेल कंपन्यांची कोणतीही रक्कम थकीत नसल्याचे कपूर यांनी या भेटीनंतर प्रसारमाध्यमांना सांगितले. कंपनीच्या ताफ्यात सध्या १८ बोइंग कंपनीची विमाने असल्याचेही ते या वेळी म्हणाले.
या प्रसंगी झालेल्या चर्चेत स्पाइसजेटचे मुख्य प्रवर्तक कलानिधी मारन यांच्याकडील हिस्सा नव्या गुंतवणूकदारांना विकून २० कोटी डॉलर उभे करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आल्याचे कळते.
२४ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या दरम्यान स्पाइसजेटद्वारे तेल कंपन्यांची थकीत रक्कम ९९० कोटी रुपयांवरून १,२३० कोटी रुपये झाल्याची माहिती संसदेत देण्यात आली होती. त्याचबरोबर विमानतळ प्राधिकरणाकडील कंपनीची थकीत रक्कमही या कालावधीत ६२४ कोटी रुपयांवरून ७४२ कोटी रुपये झाली. कंपनीने बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ३०० कोटी रुपयांच्या पुढे आहे.