कोटय़वधी रुपयांच्या कर्जभाराची चिंता वाहणाऱ्या विजय मल्ल्यांच्या आणखी एका कंपनीवरील नियंत्रण कमी होऊ पाहत आहे. मल्ल्या यांच्या यूबी समूहाचा सर्वाधिक हिस्सा असलेल्या मँगलोर केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायजर्समध्ये दीपक फर्टिलायजर्सने भांडवली हिस्सा २५ टक्क्यांपर्यंत नेला आहे. याचबरोबर कंपनीवर वर्चस्व प्राप्त करण्यासाठी कंपनीने आणखी २६ टक्के हिश्शासाठी ‘ओपन ऑफर’ही जाहिर केली आहे. दीपक फर्टिलायजर्सने एससीएम सोईलफर्ट या उपकंपनीद्वारे बुधवारी ६२.५० रुपये दराने बाजारातून १० लाख समभाग खरेदी करत ०.७४ टक्के हिस्सा खरेदी केला. कंपनीने मुंबई शेअर बाजाराला यापूर्वीच ६३ रुपये प्रति समभाग दराने १.७० टक्के हिस्सा वाढीबद्दल कळविले होते. आता उर्वरित हिश्श्यासाठी कंपनी आणखी १० लाख समभाग विकत घेईल. सेबीच्या नियमानुसार, कंपनीवर वर्चस्व स्थापित करण्यासाठी दीपक फर्टिलायजर्सला मँगलोर केमिकल्समध्ये २५ टक्क्यांहून अधिक भागीदारी नेणे आवश्यक आहे. कर्नाटकातील मँगलोर येथे रसायन निर्मिती प्रकल्प असलेल्या व २,८०० कोटी रुपयाचा महसूल नोंदविणाऱ्या मँगलोर केमिकल्सवर ताबा घेण्यासाठी दीपक फर्टिलायजर्स व झुआरी फर्टिलायजर्समध्ये तीव्र स्पर्धा होती. दीपकसह झुआरी फर्टिलायजर्सने गेल्याच वर्षी मँगलोर केमिकल्समध्ये १६.४३ टक्के हिस्सा खरेदी केला होता.