21 October 2017

News Flash

सणांच्या मुहूर्तावर वाहन खरेदीस जोर

गेल्या महिन्याच्या अखेरिस दसरा होता. वाहन खरेदीसाठी हा एक मुहूर्त मानला जातो.

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: October 10, 2017 3:13 AM

सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीत वाढ

सण समारंभाच्या पाश्र्वभूमीवर खरेदीदारांनी वाहन विक्रीला प्रतिसाद दिला आहे. दसरा असलेल्या गेल्या महिन्यात कार विक्री ६.८६ टक्क्य़ांनी तर प्रवासी वाहन विक्री ११.३२ टक्क्य़ांनी वाढली आहे. एकूण वाहन विक्रीतील सप्टेंबरमधील वाढ ही १० टक्के नोंदली गेली आहे.

गेल्या महिन्याच्या अखेरिस दसरा होता. वाहन खरेदीसाठी हा एक मुहूर्त मानला जातो. या महिन्यातच वाहनांच्या किंमती वस्तू व सेवा करावरील वाढत्या अधिभारामुळे वाढल्या होत्या. तरीदेखील खरेदीदारांनी वाहन खरेदीला पसंती दिल्याचे मानले जात आहे.

वाहन उत्पादक कंपन्यांच्या ‘सिआम’ने सोमवारी जाहीर केलेल्या मासिक आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये कार विक्री ६.८६ टक्क्य़ांनी वाढून २,०८,६५६ झाली आहे. तर बहुपयोगी वाहन विक्री तब्बल २६.२१ टक्क्य़ांनी वाढून ८४,३७४ झाली आहे. एकूण प्रवासी वाहन विक्रीतील वाढ गेल्या महिन्यात ११.३२ टक्केहोऊन ती ३,०९.९५५ झाली आहे. तर विविध गटातील मिळून एकूण वाहन विक्री गेल्या महिन्यात १० टक्क्य़ांनी वाढून २४,९०,०३४ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण वाहन विक्री २२,६३,६२० नोंदली गेली होती.

दिवाळी असलेल्या चालू, ऑक्टोबर महिन्यातही वाहन विक्री वाढलेलीच असेल, असा विश्वास ‘सिआम’चे अध्यक्ष अभय फिरोदिया यांनी व्यक्त केला आहे. नोटाबंदी, प्रदुषण चाचणीविषयीच्या मानकांचे स्थित्यंतर, वस्तू व सेवा करप्रणालीची अंमलबजावणी अशा विविध घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर गेल्या महिन्यात वाढलेली वाहन विक्री लक्षणीय म्हणावी लागेल, असे फिरोदिया यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात उल्लेखनीय अशा स्पोर्ट युटिलिटी गटातील वाहनांना मिळालेल्या प्रतिसादाच्या जोरावर एकूणच वाहन विक्री वाढल्याचे दिसत आहे.

यंदा झालेल्या चांगल्या मान्सूनमुळे विशेषत: ग्रामीण भागात दुचाकी वाहन विक्रीत वाढ झाल्याचे निरिक्षण ‘सिआम’चे उप महासंचालक सुगातो सेन यांनी नोंदविले आहे.

गेल्या महिन्यात दुचाकी वाहन विक्री ९.०५ टक्क्य़ांनी वाढून २०,४१,०२४ झाली आहे. दुचाकीमध्ये मोटरसायकल विक्री ६.९८ टक्क्य़ांनी तर स्कूटर विक्री १३.१९ टक्क्य़ांनी वाढली आहे. तर व्यापारी वाहन गटाची कामगिरी यंदा २५.२७ टक्क्य़ांनी झेपावत ७७,१९५ झाली आहे.

First Published on October 10, 2017 3:13 am

Web Title: festivals seasons diwali 2017 vehicle shopping