सोन्याच्या प्रत्यक्ष मागणीला पायबंद म्हणून सरकारने सुरू केलेल्या सार्वभौम सुवर्ण रोख्यांच्या विक्रीच्या पाचव्या फेरीला येत्या १ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. सोन्यातील गुंतवणूकदारांना या पर्यायाकडे मोठय़ा प्रमाणात आकर्षिले जातील, असा अर्थमंत्रालयाला विश्वास आहे.

गेल्या वर्षी ३० ऑक्टोबरला घोषित केलेल्या योजनेची ही पाचवी फेरी आहे. नऊ दिवसांसाठी खुल्या राहणाऱ्या या सुवर्ण रोखे विक्रीसाठी १ सप्टेंबरपासून ९ सप्टेंबपर्यंत गुंतवणूकदार अर्ज करू शकतील. या गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष २३ सप्टेंबर २०१६ रोजी रोखे वितरित केले जातील, असे अर्थमंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. नियुक्त बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, टपाल कार्यालये आणि बीएसई व एनएसई या मान्यताप्राप्त शेअर बाजारांमार्फत सुवर्ण रोख्यांत गुंतवणूक करता येईल.

अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करावे यासाठी किमान गुंतवणुकीची मर्यादा दोन ग्रॅम सोन्याच्या मूल्यावरून एक ग्रॅम अशी खाली आणली गेली आहे. प्रत्येक आर्थिक वर्षांत वैयक्तिक गुंतवणूकदाराला कमाल ५०० ग्रॅम सोन्याच्या मूल्याइतकी गुंतवणूक या रोख्यांमध्ये करता येईल. या गुंतवणुकीवर वार्षिक २.७५ टक्के दराने व्याजाचा परतावा गुंतवणूकदार सहामाही तत्त्वावर मिळवू शकतील. मुदतपूर्तीसमयी तत्कालीन सोन्याच्या मूल्यानुरूप गुंतविलेल्या रोख्यांवर परतावा मिळविता येईल.

पहिल्या तीन फेऱ्यांमधील सुवर्ण रोखे विक्रीतून १,३१८ कोटी रुपये, तर चौथ्या फेरीतील विक्रीतून ९१९ कोटी रुपये असे एकूण २,२३७ कोटी रुपये सरकारने उभे केले आहेत. ही रक्कम ४.९ टन सोन्याच्या किमतीएवढी होते.