‘बंद’पश्चात पहिल्या खरेदी उत्सवाबाबत सराफांमध्ये सकारात्मकता

सोने खरेदीचा महत्त्वाचा मुहूर्त गुढीपाडवा ‘बंद आंदोलना’मुळे हुकल्याने आता सोमवारी आलेल्या अक्षय्यतृतीयेला मोठय़ा खरेदीची अपेक्षा आभूषण विक्रेते करीत आहेत. विशेषत: सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅमसाठी ३० हजार या भावनिकदृष्टय़ा महत्त्वाच्या पातळीच्या आत असणे ग्राहकांसाठी आकर्षक ठरेल, असा त्यांचा कयास आहे.

यंदा अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्ताला बनवून तयार हवे असलेल्या दागिन्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली नोंदणी आणि प्रत्यक्ष सोमवारी (९ मे) होऊ घातलेली खरेदी जमेस धरल्यास, गेल्या वर्षांच्या तुलनेत साधारण ३० टक्के वाढ अपेक्षित आहे, असे पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सौरभ गाडगीळ यांनी उत्साही अंदाज वर्तविला.

इंडिया बुलियन अ‍ॅण्ड ज्वेलर्स असोसिएशन या सराफांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनेचे उपाध्यक्ष असलेले सौरभ गाडगीळ यांच्या मते, तब्बल ४२ दिवसांचा संपूर्ण बंद पाळला गेल्यानंतर आलेला हा महत्त्वाचा सण असून, एकंदर खरेदीसाठी सकारात्मकता दिसून येत आहे. शिवाय अक्षय्यतृतीया यंदा सोमवारी आली असल्याने शनिवार-रविवार या सप्ताहाअखेरच्या दिवसांसह एकूण तीन दिवस खरेदीसाठी ग्राहकांकडून गर्दी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गत वर्षांतील अक्षय्यतृतीयेच्या तुलनेत यंदा सोन्याच्या प्रति १० ग्रॅम किमतीत तीन हजार रुपयांची भर पडली आहे. तरी ३० हजाराचा स्तर कायम राहिल्यास, सोने खरेदीत गेल्या वर्षांच्या तुलनेत १५ ते २० टक्के वाढ यंदा शक्य दिसत आहे, असे अखिल भारतीय रत्न व आभूषण व्यापार महासंघ (जीजेएफ)चे पदाधिकारी आणि नेमिचंद बामवाला अ‍ॅण्ड सन्सचे संचालक बच्छराज बामवाला यांनी सांगितले. जीजेएफचे अध्यक्ष श्रीधर जी. व्ही. यांच्या मते यंदा अक्षय्यतृतीयेला विक्रीत वाढ संभवत नाही, झालीच तरी ती माफक दोन-तीन टक्क्यांपलीकडे नसेल. खरेदीचा उत्सवी मुहूर्त शिवाय लग्नसराईचाही हंगाम सुरू असल्याने यंदा विक्रीत २० ते २५ टक्के वाढीचा सकारात्मक कयास अनमोल ज्वेलर्सचे संस्थापक इशू दातवानी यांनीही व्यक्त केला आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाने शिफारस केलेल्या एक टक्के उत्पादन शुल्काला संघटित विरोध म्हणून सराफांनी बंद आंदोलन केले. परंतु, हे उत्पादन शुल्क कायम राहील, असे अर्थमंत्री जेटली यांनी गुरुवारी लोकसभेत स्पष्ट केले. ५५ दुरुस्त्या स्वीकारून या वित्त विधेयकाला सभागृहाने मंजुरीही दिली. आता किमान गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात वाढलेल्या सोन्यावरील आयात शुल्कातून तरी शिथिलता दिली जाईल, असा दिलासा अपेक्षित असल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेचे व्यवस्थापकीय संचालक सोमसुंदरम पी. आर. यांनी सांगितले. त्यांच्या मते, लग्नसराईसाठी दागिन्यांची खरेदीही अक्षय्यतृतीयेचा मुहूर्त साधूनच केली जाईल. शिवाय गुंतवणुकीच्या दृष्टीने लोकांचा नव्याने बळावलेला कल पाहता, सोने-चांदीची नाणी, चिपा, पदकांच्या खरेदीलाही बहर आलेला दिसेल.

सोने आयातीत वार्षिक १० टक्के घट

नवी दिल्ली : सरलेल्या २०१५-१६ या आर्थिक वर्षांत जवळपास दीड महिना सोने विक्रेत्यांच्या संपात गेल्याने मंदावलेली विक्रीमुळे एकूण सोने आयातही जवळपास १० टक्के घटून ९५० टनावर उतरल्याचे आढळून येते. जगातील सर्वात मोठा सोने खरेदीदार देश असलेल्या भारतात २०१४-१५ या आधीच्या वर्षांत १,०५० टन सोन्याची आयात झाली होती. बँक ऑफ नोव्हा स्कॉटियाने सर्वाधिक १५० टन, त्या खालोखाल सरकारी कंपनी एमएमटीसीने ५० टन सोने आयात सरलेल्या वर्षांत केली. रिद्धी सिद्धी बुलियन, भारतीय स्टेट बँक, पंजाब अ‍ॅण्ड सिंध बँक, तनिष्क आदी अन्य मोठे आयातदार होते. खुद्द एमएमटीसीची आयात ७० टनांवरून ५० टनांवर उतरली.

तथापि कच्चे व खनिज सोन्यावरील आयात शुल्क हे शुद्ध सोन्यावरील १० टक्क्यांच्या तुलनेत ८.५ टक्के असल्याने, सरलेल्या वर्षांत कच्च्या सोन्याच्या आयातीत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळले आहे. सोने शुद्धीकरण कंपन्यांकडून ही खनिज सोन्याची आयात झाली आहे.

सोने आयातीचे प्रमाण (टनांमध्ये)

२०११-१२         १,०७१

२०१२-१३               १,०१५

२०१३-१४                ९००

२०१४-१५               १०५०

२०१५-१६          ९५०