आर्थिक बाबतीत कंपन्यांच्या मोठेपण त्यांचे भांडवली बाजारातील मूल्यांच्या पट्टीद्वारे मोजले जाते. मिस्त्री यांच्या जवळपास चार वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत टाटा समूहातील कंपन्यांचे बाजारमूल्य चार पटीने वाढले आहे. तर २१ वर्षांच्या रतन टाटा यांच्या अध्यक्षपदा दरम्यान ते ५७ पटींनी वाढले आहे.

आर्थिक बाबतीत कंपन्यांचे मोठेपण त्यांच्या बाजारमूल्याच्या मोजपट्टीवर ठरत असते. भांडवली बाजारातील त्यांची सूचिबद्धता आणि समभागांच्या व्यवहारानंतर दिवसअखेर थांबणारे बाजारमूल्य हे त्यासाठीचे निकष आहेत. समूहाचे बाजारमूल्य सध्या ८.५० लाख कोटी रुपये आहे. पैकी निम्म्याहून अधिक हिस्सा – ४.८० लाख कोटी रुपये हा देशातील पहिल्या क्रमांकाची माहिती तंत्रज्ञान कंपनी टीसीएसचा आहे. मुंबईसह राष्ट्रीय शेअर बाजारात तिची नोंदणी ऑगस्ट २००४ मध्ये झाली. तेव्हा समूहातील सर्व सूचिबद्ध कंपन्यांचे मिळून १ लाख कोटी बाजारमूल्य झाले होते. १९९१ मध्ये रतन टाटा यांनी टाटा समूहाची अध्यक्ष म्हणून धुरा घेतली तेव्हा समूह हा अवघ्या ८,००० कोटी रुपयांचा होता. निवृत्त होतेसमयी तो डिसेंबर २०१२ मध्ये ४.६२ लाख कोटी रुपयांचा उद्योग बनला. तर त्यानंतर सायरस यांच्या कालावधी दरम्यान तो आता ८.५ लाख कोटी रुपयांवर गेला आहे.

चार दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या स्वागतासाठी समस्त उद्योगजगत सध्या सज्ज आहे. अशा वेळी सोमवारचा दिवस मावळण्याच्या बेतात असताना टाटा समूहाने घेतलेल्या निर्णयाने सगळ्यांनाच धक्का बसला. टाटा सन्सने सोमवारी बोलाविलेल्या संचालक मंडळ बैठकीनंतर सायरस मिस्त्री यांना समूह अध्यक्षपदावरून दूर करत असल्याचे जाहीर करण्यात आले. भांडवली बाजाराचे व्यवहार संपुष्टात आल्यानंतर ही घोषणा झाल्याने त्याचा समूहातील सूचिबद्ध कंपनी समभागांवर ठळक फरक जाणवला नाही.3

निवड समितीत टाटा सन्सचे तीन सदस्य

टाटा सन्सचे तीन सदस्य मिस्त्री यांचा परिपूर्ण उत्तराधिकारी शोधण्यासाठी टाटा सन्सने पाच सदस्यीय निवड समिती नियुक्त केली आहे. रतन टाटा अध्यक्ष असलेल्या या समितीत वेणू श्रीनिवासन (टीव्हीएस), अमित चंद्रा (बेन कॅपिटल), रोनेन सेन व लॉर्ड कुमार भट्टाचार्य (दोघेही दूतावासातील माजी वरिष्ठ अधिकारी) हे इतर चार सदस्य आहे. भट्टाचार्य वगळता इतर सदस्य तूर्त टाटा सन्सच्या संचालक मंडळावर आहेत. समितीला नवा अध्यक्ष निवडीसाठी फेब्रुवारी २०१७ पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. कंपनीने अन्य पदांवरील व्यक्तींमध्ये मात्र कोणताही बदल केला नाही. टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नऊपैकी सहा सदस्य वगळून अन्य तीन सदस्यांना रतन टाटा अध्यक्ष असलेल्या नव्या निवड समितीत घेण्यात आले आहे.