केंद्रातील विद्यमान सरकारच्या उक्ती आणि कृतीत प्रचंड विरोधाभास असून, सरकारची एकूण धोरणे ग्रामीण स्वावलंबनाला मारक ठरत आहेत, असे नमूद करीत एका न पेलवणाऱ्या सामाजिक असंतुलनाला हे आमंत्रण ठरेल, असा इशारा ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत- कार्यकर्त्यांनी शुक्रवारी येथे बोलताना दिला.  
एकीकडे महात्मा गांधी यांच्या तत्त्वविचारांचे अनुनायी म्हणवून घेणारे पंतप्रधान मोदी हे खादीचाही पुरस्कार करतात, ही स्वागतार्ह बाब असली, तरी तेच दुसरीकडे स्मार्ट सिटी उभारण्याच्या योजनांनाही चालना देतात, हा मोठा विरोधाभासच असल्याचे कर्नाटकातील जनपद सेवा ट्रस्टचे संस्थापक सुरेंद्र कौलगी यांनी सांगितले. रचनात्मक कार्यात अद्वितीय कामगिरीसाठी कौलगी हे यंदाच्या ३७व्या जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. फाऊंडेशनच्या पुरस्काराचे आणखी एक मानकरी आणि कृषी संसाधने, अपारंपरिक ऊर्जा आणि सेंद्रीय शेती या क्षेत्रात कार्यरत सुरुची शिक्षण वसाहत ट्रस्टचे राम कुमार सिंग यांनीही या टीकेला दुजोरा दिला.
बडे शेतकरी आणि जमीनदारांच्या लाभाचे ठरेल, असे शेतीच्या यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन देणारे धोरण हे शेतमालाच्या किमती वाढविणारे आणि शेतीच्या कामात सर्वाधिक सहभाग असलेल्या महिलांना कृषी क्षेत्रातून हद्दपार करणारे आहे, असे सिंग यांनी नमूद केले. कोणत्याही इंधन अथवा विजेचा वापर न करता, शेतीच्या तंत्रात आधुनिकता आणता येईल आणि ती फार खर्चिकही नसेल, अशी अनेक अवजारे त्यांच्या संस्थेने विकसित केली आहेत.
दक्षिण गुजरातमधील अनेक छोटय़ा शेतकऱ्यांकडून त्याचा वापरही होत आहे. अल्प किमतीत ती उपलब्ध असल्याने कोणतेही कर्ज न घेता शेतकरी त्यांचा वापर करू शकतात, पण या अवजारांच्या प्रचार-प्रसारासाठी सरकारकडून ना प्रोत्साहन, ना दखल घेतली गेली आहे, अशी त्यांनी तक्रार केली. खादी व ग्रामोद्योग हे आर्थिक विकेंद्रीकरण आणि ग्रामीण भारताला आत्मनिर्भरता प्रदान करण्यासाठी संकल्पिले गेलेले क्षेत्र यापुढे अस्तित्व टिकवू शकेल, याबद्दलही या मान्यवरांनी शंका व्यक्त केली. जमनालाल बजाज फाऊंडेशनचे २०१४ सालच्या पुरस्कारांचे अन्य दोन गांधीवादी मानकरी आंध्र प्रदेशच्या चेन्नुपाटी विद्या आणि थायलंडचे संती प्राचा धम्मचे संस्थापक सुलक शिवरक्षा हेही यासमयी उपस्थित होते.  केंद्रातील विद्यमान सरकार हे पूर्णपणे अमेरिका आणि पश्चिमी राष्ट्रांच्या समृद्धीने भारावले असून, पाळेमुळांचा विसर पडलेल्या समाजाला कोणतेही भवितव्य नसते, असे सुलक शिवरक्षा यांनी सुनावले. या सर्व पुरस्कारार्थीना नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झालेल्या समारंभात सन्मानित करण्यात आले.