यंदाच्या अर्थसंकल्पातून दुसऱ्या घराच्या गृहकर्जाच्या परतफेडीवर कर वजावटीवर दोन लाख रुपयांपर्यंत मर्यादा आली असली, तरी आजही हा कर वाचविण्याचा उपयुक्त पर्याय आहे, असे अग्रणी गृहवित्त कंपनी डीएचएफएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षिल मेहता यांचे प्रतिपादन आहे..

मुंबई : गृहकर्जामुळे घर घेण्याचे स्वप्न सामान्य माणसाच्या आवाक्यात आले आहे. शिवाय त्यावर कर सवलतीही असल्यामुळे घर खरेदी करण्यासाठी तो सर्वाधिक पसंतीचा पर्याय बनला आहे.

लोक वेगवेगळ्या कारणांमुळे दुसऱ्या घराची खरेदी करतात. काही जण भांडवलवृद्धीसाठी गुंतवणूक म्हणून, तर काही जण सुट्टीत वापरण्यासाठी, तर काही जण ते भाडेतत्त्वावर देऊन उत्पन्न मिळविण्यासाठी व अगदी गुंतवणुकीत वैविध्य असावे म्हणूनही काही जण दुसरे घर घेतात. स्थावर मालमत्तेत केलेल्या गुंतवणुकीचा परतावा जवळपास समभागांइतकाच असतो आणि यामुळे गुंतवणूक म्हणूनही हा पर्याय सर्रास आजमावला जातो.

भारतात बहुतेक गृहकर्जे पहिल्या घराच्या खरेदीसाठी घेतली जातात. गृहकर्ज घेतल्याने प्राप्तिकरातून सवलती मिळतात हे प्रत्येकालाच माहीत आहे; परंतु दुसऱ्या घराच्या कर्जामुळे मिळणाऱ्या फायद्यांविषयी फारसे बोलले जात नाही. त्यामुळे दुसऱ्या घरामुळे मिळू शकणाऱ्या कर सवलतींबाबत प्रामुख्याने माहितीचा अभाव असल्याने लोक त्याची दखलही घेत नाहीत. दुसरे गृहकर्ज ही किचकट गोष्ट वाटू शकते, परंतु योग्य पद्धतीने अंमलबजावणी केल्यास त्यायोगे करात मोठी बचत करता येऊ  शकते.

दुसऱ्या घरासाठी कर्ज घेतल्यानंतर मिळणाऱ्या महत्त्वाच्या फायद्यांवर आधारित पुढीलप्रमाणे प्रश्न विचारले जातात –

  • जर दुसरे घरही स्वत:च्याच वापरासाठी ठेवायचे असेल तर?

– दुसऱ्या घरासाठी गृहकर्ज घेतले असेल, तर कर्जाच्या रकमेवर भरलेल्या व्याजासाठी ती व्यक्ती प्राप्तिकर कलम २४ अंतर्गत वजावटीसाठी पात्र असते. दुसऱ्या घराच्या कर्जावर भरलेल्या व्याजावर सवलतीची कोणतीही कमाल मर्यादा नसते. मात्र, अशा प्रकरणात संबंधित व्यक्ती कलम ८० सीअंतर्गत कोणत्याही सवलतीचा दावा करू शकत नाही, कारण दुसरे घर स्वमालकीची मालमत्ता समजली जाणार नाही. उदा. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्यांदा गृहकर्ज घेतले आहे आणि एक लाख रुपये व्याज म्हणून आणि ५० हजार रुपये मुद्दल म्हणून वर्षभरात रक्कम भरली असेल, तर त्याला एक लाख रुपयांवर प्राप्तिकर सवलतीसाठी दावा करता येऊ  शकतो. मात्र, व्याजावर लागू झालेला प्राप्तिकर वजावटीसाठी यंदाच्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार दोन लाख रुपयांची मर्यादा आली आहे. दोन्ही गृह कर्जे मिळून ही दोन लाख रुपयांची मर्यादा ओलांडता येत नाही.

  • दुसऱ्या घराचे बांधकाम सुरू असल्यास काय?

– एखाद्या व्यक्तीने बांधकाम सुरू असलेल्या घरासाठी दुसरे कर्ज घेतले असले, तर त्याला बांधकामपूर्व कालावधीत भरलेल्या गृहकर्जाच्या एकूण व्याजावर २० टक्के कर सवलत मिळवता येऊ  शकते. ही कर सवलत मिळवण्याचा कालावधी पाच वर्षांचा असतो. उदा. बांधकाम सुरू असलेल्या किंवा बांधकामपूर्व स्थितीतील घरावर घेतलेल्या कर्जावरील भरलेल्या व्याजावरील कमाल कर सवलत १.५ लाख रुपयांची असून संबंधित व्यक्तीला जास्तीत जास्त पाच वर्षांच्या कालावधीत प्रति वर्ष ३० हजार रुपये वजावटीचा दावा करता येतो.

  • स्थानिक प्रशासनाला दिलेल्या कराचा दावाही करता येतो

– एखाद्या व्यक्तीला स्थानिक प्रशासनाला दिलेल्या करावर ते ज्या आर्थिक वर्षांत भरले आहेत, त्यानुसार कर वजावटीचा दावा करता येऊ  शकतो. यात महानगरपालिका/ स्थानिक स्वराज्य संस्था कर किंवा मालमत्ता कराचा समावेश असतो. ही वजावट शुल्कावर आधारित नसून चक्रवाढ पद्धतीने तीवर दावा करता येतो.

  • दुरुस्ती व देखभाल खर्चासाठी वजावट

– मालमत्तेच्या दुरुस्ती व देखभालीवरही कर सवलतीचा दावा करता येऊ  शकतो. खर्च कितीही आलेला असला, तरी त्यासाठी रिबेट निश्चित करण्यात आला असून त्यानुसार करता येतो. हा दर ३० टक्के असून मालमत्तेच्या न्याय्य भाडेशुल्कातून मालमत्ता कर वजा केल्यानंतर लागू केला जातो.