केंद्रीय महसूल सचिव अधिया यांचे स्पष्टीकरण

वस्तू व सेवा करप्रणाली लागू होण्यास काही दिवसांचाच अवधी असताना सरकारने बुधवारी किरकोळ विक्रेत्यांना काही दिलासा दिला. नव्या निर्णयानुसार, किरकोळ विक्रेत्यांना महिन्याला केवळ एकच जीएसटी (वस्तू व सेवा कर) विवरणपत्र भरावे लागेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याद्वारे सध्या असलेली व्यवस्थाच नव्या करप्रणाली अंमलबजावणीनंतर कायम राहणार आहे. मात्र वस्तू व सेवा कर परिषदेच्या करनिश्चितीच्या बैठकीनंतर किरकोळ विक्रेत्यांना एकापेक्षा अधिक विवरणपत्र भरण्याचा निर्णय झाला होता.

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत महसूल सचिव हसमुख अधिया यांनी बुधवारी, किरकोळ विक्रेत्यांना आता महिन्याला केवळ एकच जीएसटी विवरणपत्र भरावे लागेल, असे सांगितले. तसेच ग्राहकांशी थेट संबंध येणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांना दर महिन्याला ‘इन व्हॉइस’ही देण्याची गरज आता राहणार नाही, असेही ते म्हणाले.

जीएसटी विवरणपत्र भरणाऱ्यांपैकी ८० टक्के व्यवसायाची विवरणपत्र प्रक्रिया सुलभ झाली असल्याचा दावाही अधिया यांनी केला. विवरणपत्र भरण्याबाबत व्यावसायिकांनी आता चिंता करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले. ही प्रक्रिया आता अत्यंत पारदर्शक होण्यासह संकेतस्थळावरील मार्गदर्शनामुळे ती अधिक सुलभ होत आहे, असे अधिया म्हणाले.

जीएसटी विवरणपत्राबाबत स्पष्टीकरण देताना अधिया यांनी सांगितले की, वस्तू पुरवठादार जेव्हा त्याचे विक्री ‘इन व्हॉइस’ संकेतस्थळावर दाखल करेल तेव्हा जीएसटी रिटर्न-१ तयार होईल. जीएसटी रिटर्न-१ भरल्यानंतर खरेदीदाराचे जीएसटी रिटर्न-२ भरले जाईल. ही प्रक्रिया पुढील महिन्याच्या १०व्या ते १५व्या दिवशी पार पडेल.

जीएसटी रिटर्न-२ हे कुणालाही भरता येणार नाही. संबंधिताचे यासाठीचे खाते आवश्यक ठरेल आणि त्याची संमती त्यासाठी लागेल. विवरणपत्रातील खरेदीच्या रकान्यात माहिती अपुरी असल्यास जसे – कुणाकडून वस्तू खरेदी केली ते विवरणपत्रात नमूद करण्याचे राहिल्यास ही प्रक्रिया आपोआपच अपूर्ण होईल. त्यासाठी संकेतस्थळामार्फत पुन्हा आठवण करून देऊन संबंधिताला अपूर्ण माहिती भरून प्रक्रिया पूर्ण होईल.