जगभरात जेथे समग्र आरोग्य विमा छत्र व संरक्षणाची पद्धत रुळली असताना, भारतातील आस्थापनांमध्ये आजही कर्मचारी व त्याचे कुटुंबातील निकटवर्तीय यांना केवळ रुग्णालयात दाखल झाल्यावरच विम्याचा लाभ मिळविता येण्याची पद्धत रूढ आहे, अशी टिप्पणी नुकत्याच केल्या गेलेल्या सर्वेक्षणाची आहे.
‘व्हँटेज हेल्थ अँड बेनिफिट्स कन्सिल्टग’ मंगळवारी सर्व उद्योगक्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लागू होणाऱ्या आरोग्य संरक्षणविषयक मानदंडांचा वेध घेणारा सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केला. उच्च तंत्रज्ञान, बँकिंग, वित्तीय सेवा, ई-व्यापार, रिटेल, निर्मिती क्षेत्र, ग्राहकोपयोगी उत्पादने, औषधी उद्योग अशा विविध क्षेत्रांतील भारतीय व बहुराष्ट्रीय अशा १२९ कंपन्यांकडून मिळालेल्या प्रतिसादावर आधारित या अहवालातील निष्कर्ष आहेत. पाहणीमध्ये भारतीय बाजारात सध्या दिसणाऱ्या सहा प्रमुख आरोग्य लाभ योजनांवर भर देण्यात आला आहे. कंपन्यांच्या आरोग्य लाभ योजनेत कर्मचाऱ्यांच्या मातापित्यांच्या सहभागाबाबतही स्थिती चांगली असल्याचे या पाहणीचे निरीक्षण आहे. विकसित देशात वृद्धांसाठी आरोग्य विम्याचे छत्र हे स्वतंत्र सामाजिक सुरक्षा योजनेतून मिळत असते, आपल्याकडे त्याचा अभाव आहे, यावर सर्वेक्षणाने बोट ठेवले. पण सर्वेक्षणात सहभागी ६५ टक्के कंपन्यांच्या आरोग्य लाभ योजनेत कर्मचाऱ्यांच्या माता-पित्यांचा सहभाग दिसून आल्याचे अहवाल सांगते.