आयसीआयसीआय बँक या देशातील दुसऱ्या मोठय़ा बँकेच्या प्रमुख व मानाच्या फोर्ब्ज यादीतील अव्वल चंदा कोचर यांचे वार्षिक वेतन गेल्या आर्थिक वर्षांत तब्बल ६४ टक्क्यांनी वाढले आहे. त्यांना दिवसाला २.१८ लाख पगार तर मूळ वेतनात १५ टक्के वाढ झाली आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचाऱ्यांचे वेतन २०१६-१७ मध्ये १२ टक्क्यांनी वाढले आहे.

आयसीआयसीआय या खासगी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना गेल्या आर्थिक वर्षांत एकूण ७.८५ कोटी रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षांत ही रक्कम ४.७९ कोटी रुपये होती. गेल्या आर्थिक वर्षांत कोचर यांना २.६७ कोटी रुपये मूळ वेतन मिळाले आहे. तर कामगिरी लाभांश म्हणून त्यांना २.२० कोटी रुपये मिळाले आहेत. उत्कृष्ट कामगिरी म्हणून दिल्या जाणाऱ्या लाभांशामुळे कोचर यांचे गेल्या वर्षांत एकूण उत्पन्न कमालीचे वाढले आहे.

युवा पिढीने कमावते होण्यासाठी कौशल्य विकासाची नितांत गरज

आधीचे वित्त वर्ष २०१५-१६ मध्ये खासगी बँकेला फारसे आर्थिक यश न मिळाल्याने कोचर यांना त्या वर्षांत कामगिरी लाभांश मिळाला नव्हता. २०१५-१६ च्या शेवटच्या तिमाहीत बँकेने नफ्यातील ८७ टक्के घसरण नोंदविली होती. कोचर यांचे मूळ वेतन गेल्या आर्थिक वर्षांत १५ टक्क्यांनी वाढले आहे. तुलनेत बँकेतील मध्यम फळीतील कर्मचाऱ्यांच्या वेतनात १२ टक्के वाढ झाली आहे. हा लाभ मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ८२,८४१ आहे. बँकेच्या कार्यकारी संचालकपदावरील व्यक्तींना गेल्या आर्थिक वर्षांत ७.५६ कोटी रुपयांचे वेतन मिळाले आहे. कोचर यांच्यानंतर सर्वात मोठे पद भूषविणारे कार्यकारी संचालक एन. एस. कन्नन यांच्या वेतनात २०१६-१७ मध्ये ६२ टक्के वाढ झाली आहे.