सर्वात मोठी समभागसंलग्न फंड योजना

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाची समभागसंलग्न मुदतमुक्त योजना आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज फंडाची एकूण मालमत्ता ऑक्टोबरअखेर १६,२५२ कोटी रुपयांवर गेली असून, देशातील तो सर्वात मोठा समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंड बनला आहे.

केंद्रात सत्ताबदलाचे वारे घुमू लागल्यानंतर २०१३ सालच्या उत्तरार्धापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी राजवटीत समभागसंलग्न म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ओघ लक्षणीय वाढला असून, ‘आयसीआयसीआय प्रु. बॅलेन्स्ड अ‍ॅडव्हान्टेज’ ही योजना त्याची सर्वात मोठी लाभार्थी ठरली आहे. तीन वर्षांत फंडाची मालमत्ता तब्बल ६४ पटींनी वाढली आहे. मूळ वर्ष २००६ मध्ये सुरुवात करणाऱ्या या फंडाने, २०१० सालात गतिमान गुंतवणूक विभाजनाचे धोरण स्वीकारून कायापालटास सुरुवात केली. डिसेंबर २०१० मध्ये सर्व गुंतवणूकदारांची मिळून असलेली २७७ कोटी रुपये मालमत्ता म्हणूनच ऑक्टोबर २०१६ अखेर १६,२५२ कोटी रुपये अशा सार्वकालिक उच्चांकावर पोहोचली.

२००६ सालातील सुरुवातीपासून या फंडाने वार्षिक सरासरी ११ टक्के दराने गुंतवणूकदारांना परतावा दिला आहे. तर गत तीन वर्षांत वार्षिक १४.७ टक्के असा तिचा परतावा दर आहे. या योजनेचे मनीष गुणवाणी आणि रजत चांडक (समभागसंलग्न गुंतवणुका) तसेच मनीष बांठिया (रोखे गुंतवणुका) हे निधी व्यवस्थापक आहेत. बाजारस्थितीनुरूप समभागसंलग्न आणि रोखे गुंतवणुकांचे प्रमाण कमी-जास्त राखून निधी व्यवस्थापकांनी राखलेले संतुलन फंडाच्या गुंतवणूकदारांच्या आजवर पथ्यावर पडले आहे. ऑक्टोबरअखेर या फंडाची ६०.४ टक्के मालमत्ता ही विविध ७९ समभागांमध्ये विभागली गेली होती. एचडीएफसी बँक, मदरसन सुमी, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि मारुती सुझुकी हे योजनेतून अव्वल गुंतवणूक असलेले समभाग होते. सुमारे ३३ टक्के गुंतवणूक ही रोख्यांमध्ये तर ६.३ टक्के रोकड व रोकडसममूल्य गुंतवणूक होती.

बाजारातील अस्थिरतेला बिथरणाऱ्या व मुद्दल सुरक्षितता हे प्रधान उद्दिष्ट असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही आदर्श योजना असून, आजवर लौकिकाला साजेसा स्थिर व समाधानकारक परतावा योजनेने दिला आहे, असे मत ‘व्हॅल्यू रिसर्च’चे मुख्याधिकारी धीरेंद्र कुमार यांनी या योजनेविषयी नमूद केले.

अंगभूत जोखीम नियंत्रण क्षमता असल्याने नव्याने गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी बॅलेन्स्ड फंड हा सर्वोत्तम पर्याय आणि सद्य:काळात एक आदर्श पर्यायही ठरतो, अशी त्यांनी पुस्ती जोडली. तर या योजनेची गेल्या काही वर्षांतील लक्षणीय वाढ पाहता, पुढील चार-पाच वर्षांत त्याने या फंड वर्गवारीतील एकूण मालमत्तेएवढी झेप घेतल्यास नवलाचे ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी निमेश शाह यांनी व्यक्त केली.