सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय बँकेने तिचा राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) ५ टक्के हिस्सा विकून १,००० कोटी रुपये उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून बँक देशातील सर्वात मोठय़ा भांडवली बाजारातून बाहेर पडत आहे. सप्टेंबर २०१४ अखेर बँकेचे बाजारमंचात २३ लाख समभाग होते. हा बाजाराच्या एकूण भागभांडवलात ५ टक्के हिस्सा आहे. २१,००० कोटी रुपये बाजार मूल्यासह राष्ट्रीय शेअर बाजार हा देशातील सर्वात मोठा भांडवली बाजार आहे. आयडीबीआय बँकेने बाजारातील हिस्सा विक्रीबाबत शुक्रवारीच स्पष्ट केले. त्यासाठी मागणी नोंदविण्याचेही आवाहन केले. त्यासाठी २० जानेवारी २०१५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. बाजार मंचावर बँकेसह भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) (१०५१%), स्टेट बँक (१०.१९%), आयएफसीआय (५.५५%) व आयडीएफसी (५.३३%) हे बडे भागीदार आहेत.