भविष्यातील आर्थिक समृद्धी आणि लोकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यात एक इंधनस्रोत म्हणून नैसर्गिक वायूची महत्त्वाची भूमिका राहणार असून, हा एक सर्वात किफायती आणि शाश्वत पर्यायही असल्याचे ‘इंटरनॅशनल गॅस युनियन (आयजीयू)’ने अलीकडेच नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीस्तरीय गॅस फोरममध्ये प्रकाशित अहवालातून व्यक्त केला आहे. अहवालातील या प्रतिपादनाला नैसर्गिक वायू बाजारपेठेतील स्पर्धकांनीही दुजोरा दिला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमती पुन्हा वर चढू लागल्या असल्या तरी त्याचा नैसर्गिक वायूच्या किमतीवर फारसा परिणाम संभवत नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

एकुणात आंतरराष्ट्रीय स्तरावर नैसर्गिक वायूच्या मागणीपेक्षा पुरवठय़ाची स्थिती वरचढ राहिली असून, किमती स्थिर राहण्याचे हेच कारण असल्याचे गत आठवडय़ात १२ व्या पेट्रोटेक परिषदेत बोलताना आयजीयूचे अध्यक्ष डेव्हिड कॅरोल यांनी स्पष्ट केले. तथापि नव्या ठिकाणाहून सापडत असलेले वायूसाठे आणि वाढलेल्या उत्पादनातून पुरवठा स्थिती आणखीच बळावत जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तेल निर्यातदारांच्या ‘ओपेक’ या संघटनेला समकक्ष जगभरात वायू बाजारपेठेला चालना देणारे ‘आयजीयू’ हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे.

मात्र भविष्यातील इंधन पर्याय म्हणून नैसर्गिक वायूचे महत्त्व वाढून स्वतंत्र बाजारपेठ निर्माण केली जाईल आणि ही बाब खनिज तेलाच्या किमतीच्या निरपेक्ष नैसर्गिक वायूच्या किमतीचा प्रवास निश्चित करणारी ठरेल, असा विश्वास कोरेल यांनी व्यक्त केला. आयजीयूने प्रसिद्ध केलेल्या अहवालातून सरकारला अपेक्षित धोरणात्मक सुधाराच्या शिफारसीही केल्या गेल्या आहेत.

केंद्रीय पेट्रोलियन व नैसर्गिक वायूमंत्री धर्मेद्र प्रधान यांनी वायू क्षेत्राचे भवितव्य उज्ज्वल असून, सध्याच्या ऊर्जा बाजारपेठेबद्दल व्यक्त झालेल्या शक्यता पाहता प्रस्थापित धोरणे आणि व्यवसाय ढाच्याची फेरउजळणी होणे काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.