वर्षभरात बँक खात्यातील १० लाख रुपयांपर्यंतची ठेव त्याचबरोबर क्रेडिट कार्डाचे देयक म्हणून १ लाख वा अधिक रुपयांचा भरणा केला गेला असल्यास त्या खात्यांचा तपशील प्राप्तिकर विभागाला कळविणे बँकांसाठी बंधनकारक राहणार आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने १७ जानेवारीला प्रसृत अध्यादेशात, कर प्रशासनाला सूचित करणे आवश्यक असलेल्या रोखीतील व्यवहारांची सूची बँकांना दिली असून, हा तपशील नियमितपणे कळविला जाईल यासाठी स्वतंत्र ई-व्यासपीठ तयार करण्यासही सांगितले आहे.

नोव्हेंबर २०१६ मधील अध्यादेशाप्रमाणे, ९ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या निश्चलनीकरणाच्या कालावधीत, २.५ लाख रुपयांपेक्षा अधिक एका व्यक्तीकडून एक वा अधिक खात्यांमध्ये मिळून जमा केली गेली असेल, तर त्याचा तपशील बँकांना प्राप्तिकर विभागाला सादर करावाच लागणार आहे. त्यात या नव्या आदेशाची ताजी भर पडली आहे. शिवाय निश्चलनीकरण कालावधीत एका व अधिक चालू खात्यात १२.५० लाख व अधिक रक्कम जमा करणारे खातेदार कोण हेही बँकांना प्राप्तिकर विभागाला कळवावे लागेल.

नव्या आदेशानुसार, गत वर्षभरात क्रेडिट कार्डवरील व्यवहाराचे देयक म्हणून १ लाख रुपयांचा भरणा केला गेला असणाऱ्या खातेदारांचा तपशील कर विभागाकडे जाईल. तसेच वर्षभरात बँक खात्यातून कोणत्याही तऱ्हेने रोख, धनादेश अथवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात १० लाख रुपये व अधिक रकमेची देवघेव झाली असल्यास त्याचा तपशीलही प्राप्तिकर विभागाकडे जाईल.

शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीलाही कोणा गुंतवणूकदाराने आर्थिक वर्षांत १० लाख रुपये व अधिक मूल्याच्या समभागांची खरेदी केली असल्यास त्याचा तपशील प्राप्तिकर विभागाला देणे बंधनकारक असेल. १० लाख रुपयांच्या मर्यादेचा हा नियम ट्रॅव्हलर्स चेकसह विदेशी चलनाची खरेदी, फॉरेक्स कार्डवरील विनिमयाला लागू असेल. मालमत्ता निबंधकांनीही ३० लाख व अधिक मूल्याच्या मालमत्ता खरेदीच्या वर्षभरात झालेल्या नोंदींचा तपशील प्राप्तिकर विभागाला देणे बंधनकारक केले गेले आहे.