औषधनिर्माण क्षेत्रातील आघाडीच्या इंडोको रेमेडिजने महाराष्ट्र व गोवा प्रकल्प विस्ताराची योजना आखली असून यासाठी १२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. कंपनी महाराष्ट्रातील पातळगंगा येथे हरितक्षेत्र एपीआय सुविधा केंद्र उभारणार आहे. त्याचबरोबर गोव्यातील स्टरलाईट ऑप्थॅल्मिक सुविधा केंद्राचाही विस्तार करण्यात येणार आहे.
कंपनीचे अध्यक्ष सुरेश कारे यांनी इंडोकोच्या ६८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांना विस्तार योजनेची माहिती दिली. नव्याने करण्यात येणाऱ्या गुंतवणुकीत गोव्यातच अतिरिक्त जागा प्रकल्प घेण्याचाही समावेश आहे. यासाठीची निधी उभारणी ही अंतर्गत तसेच कर्जरूपात होईल, असेही ते म्हणाले.
दरवर्षी नवी २० औषधे बाजारात आणण्याचे कंपनीचे धोरण याही वर्षांसाठी कायम असून विपणन विभागाची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे; यासाठी ५०० नव्या औषध विक्री प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही कारे यांनी सांगितले.
इंडोको रेमेडिजने मार्च २०१५ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांत २०.३ कोटी रुपयांचा नक्त नफा कमाविला असून २१६ कोटी रुपयांच्या महसुली उत्पन्नाची नोंद केली आहे.