देशातील तिसरी मोठी वेगाने विकास पावत असलेली औषधी कंपनी अल्केम लॅबोरेटरीज लिमिटेडने प्रत्येकी १,०२० रु. ते १,०५० रु. किमतीला येत्या ८ डिसेंबरपासून प्रारंभिक खुल्या भागविक्रीची मंगळवारी घोषणा केली. १० डिसेंबपर्यंत सुरू राहणाऱ्या या भागविक्रीतून १,३५० कोटी रुपयांचे भांडवल उभारले जाणे कंपनीला अपेक्षित आहे.
भारतात १४ तर अमेरिकेत दोन असे एकूण १६ उत्पादन प्रकल्प असलेल्या अल्केम लॅबकडे बाजारात दबदबा असलेल्या तब्बल ७०५ औषधी नाममुद्रांचा ताफा आहे. भागविक्रीतून उभ्या राहणाऱ्या भांडवलाचा जगभरात व्यवसाय विस्तारासाठी विनियोगाचा कंपनीचा मानस आहे. संधी मिळेल त्या वेळी प्रस्थापित कंपन्यांच्या संपादनाचाही प्रयत्न राहील, असे अल्केम लॅबचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक संदीप सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देशातील आघाडीच्या ५० औषधी ब्रॅण्ड्सपैकी पाच अल्केमच्या ताफ्यातील असून, या प्रत्येकाची उलाढाल १०० कोटींहून अधिक आहे. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे विक्री उत्पन्न हे वार्षिक सरासरी १४.२ टक्के दराने वाढत आले, तर एकूण उत्पन्नातील वाढ ही वार्षिक सरासरी २२.३ टक्के अशी दमदार आहे. चालू आर्थिक वर्षांच्या सप्टेंबपर्यंतच्या सहामाहीत कंपनीचा विक्री महसूल आधीच्या तुलनेत ३६.१ टक्क्यांनी वाढून २,५७० कोटींवर गेला आहे, असे सिंग यांनी सांगितले.
मुंबईनजीक तळोजा येथील संशोधन व विकास सुविधेसह कंपनीच्या एकूण चार आर अँड डी केंद्रांत एकूण ४८० शास्त्रज्ञ कार्यरत आहेत. नवीन संशोधन व उत्पादन विकासावर एकूण उत्पन्नाच्या ४.५ टक्के खर्च सरलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने केला आहे. त्यापायीच एकूण ६९ नवीन औषधींना मंजुरीचे अर्ज कंपनीने अमेरिकेत केले आहेत. त्यापैकी २१ औषधींना मंजुरीही मिळविली आहे. कंपनीच्या भारतातील पाच उत्पादन केंद्रांना अमेरिकेच्या औषध प्रशासनाने मान्यता दिली असल्याची त्यांनी माहिती दिली.
कंपनीच्या भागविक्रीचे व्यवस्थापन नोमुरा फायनान्शियल, अ‍ॅक्सिस कॅपिटल, जेपी मॉर्गन आणि एडेल्वाइज फायनान्शियल या संस्था पाहत आहेत.