महाराष्ट्रातील पर्यटकांमध्ये ऑस्ट्रेलियाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच असून भारतातील सर्वात जास्त पर्यटक देणारे राज्य म्हणून ऑस्ट्रेलियासाठी महाराष्ट्र महत्त्वाचे ठरत आहे. जुलै २०१४ ते जून २०१५ वर्षांत ऑस्ट्रेलियाला भेट देणाऱ्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या संख्येत ३२ टक्क्यांची तर त्यांनी ऑस्ट्रेलिया येथे खर्च केलेल्या रकमेत ६२ टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतातून ऑस्ट्रेलियाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांचा तसेच तिथे खर्च होणाऱ्या रकमेत वाढ झाली आहे.

गेल्या वर्षांत भारतातून ऑस्ट्रेलियात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या १९ टक्क्यांनी वाढून २.२० लाखांवर पोहोचली आहे. तर तिथे खर्च केले जाणाऱ्या रकमेचा आकडा ३९ टक्क्यांनी वाढून एक बिलियन ऑस्ट्रेलिया डॉलर्सवर पोहोचला आहे. भारत सध्या ऑस्ट्रेलियामध्ये जाणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत दहावे सर्वात मोठी बाजारपेठ आहे; तसेच ऑस्ट्रेलियातून भारतात येणाऱ्या पर्यटकांबाबत आठवी मोठी बाजारपेठ असल्याचे ऑस्ट्रेलिया पर्यटनाच्या भारतातील व्यवसायाची जबाबदारी पाहणारे व्यवस्थापक निशिकांत काशीकर यांनी सांगितले.
केसरी टुर्सचे व्यवस्थापकीय संचालक शैलेश पाटील यांनी हा कल विस्तृत करताना सांगितले की, आमच्या बहुतेक ग्राहकांच्या पर्यटनाच्या यादीत ऑस्ट्रेलियाला अग्रस्थान आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हनिमूनला जाणारी जोडपे, कुटुंबे अशा सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी वैविध्यपूर्ण पर्यटन अनुभव घेण्याची सोय असल्यामुळे ऑस्ट्रेलियाला वाढती मागणी आहे.
भारतातून ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत सातत्याने भरघोस वाढ झाली आहे. आधीच्या वर्षांत १.२३ लाख पर्यटकांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती. त्यात पुढील वर्षांत १९ टक्क्य़ांची वाढ झाली.