वाहननिर्मितीतील आघाडीचा महिंद्र समूह तयार खाद्य वस्तूनिर्मितीतही उतरला आहे. कंपनीने शुक्रवारी त्याची ‘न्युप्रो’ ही नाममुद्रा विकसित करतानाच मोहरीचे तेल बाजारात आणले.
‘न्युप्रो’च्या माध्यमातून समूहाने तयार खाद्य वस्तूनिर्मिती क्षेत्रात शिरकाव केला आहे. समूहाचा कट्टर स्पर्धक टाटा सन्स तिच्या टाटा केमिकल्समार्फत यापूर्वीच या क्षेत्रात आहे.
महिंद्रच्या खाद्य तेलाची किंमत प्रति लिटर १४४ रुपये आहे. खाद्य तेल बाजारपेठेत वरच्या श्रेणीतील उत्तम तेल म्हणून ‘न्युप्रो’ आपले स्थान मिळवेल, असा विश्वास समूहाचे कार्यकारी संचालक पवन गोयंका यांनी म्हटले आहे. विविध तेल वस्तू समूहामार्फत लवकरच जारी करण्यात येतील, अशी माहिती महिंद्र समूहाच्या आफ्रिका व दक्षिण आशिया विभागातील कृषी व्यवसायाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अशोक शर्मा यांनी दिली. याचबरोबर समूह विविध प्रकारच्या डाळीही भारतीय बाजारपेठेत सादर करण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.