कामगारांच्या अनेक दिवसांच्या आंदोलनापोटी कोटय़वधींचे नुकसान सोसणाऱ्या मारुती सुझुकीने अखेर वेतनवाढीचा करार केला आहे. यानुसार कंपनीतील कर्मचाऱ्यांना सरासरी मासिक १६,८०० रुपये वाढीव मिळणार आहेत.
वाहन विक्रीत देशातील सर्वात मोठय़ा मारुती सुझुकीचे गुरगाव व मानेसर येथे दोन निर्मिती प्रकल्प आहेत. वेतनवाढीच्या तिढय़ावरून काही महिन्यांपूर्वी कामगार व व्यवस्थापन यांच्या दरम्यान हिंसक संघर्ष निर्माण झाला होता.
कंपनीने गुरुवारी कामगार संघटनांबरोबर तीन वर्षांचा करार केला. यानुसार, कामगारांना पहिल्या वर्षांत ५० टक्के तर उर्वरित दोन वर्षांत प्रत्येकी २५ टक्के वेतनवाढ मिळणार आहे. वेतनवाढीच्या कराराची अंमलबजावणी १ एप्रिल २०१५ पासून होणार आहे.
कामगारांना पहिल्या वर्षांत सरासरी मासिक ८,४३० रुपये तर अन्य दोन वर्षांत प्रत्येकी ४,२०० रुपये सरासरी मासिक मिळतील, अशी माहिती मारुती उद्योग कामगार संघटनेचे सरचिटणीस कुलदीप जांगू यांनी दिली. एप्रिलपासून याबाबत व्यवस्थापनाबरोबर चर्चा सुरू होती.
३१ मार्च २०१८ पर्यंतच्या या करारानुसार, कामगारांना प्रति महिना २,००० रुपये वाहतूक भत्ताही देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. जे कामगार कंपनीत येण्यासाठी त्यांचे स्वत:चे वाहन वापरतात त्यांना येत्या सात वर्षांसाठी हा भत्ता देण्याचा निर्णय झाला आहे.