मारुती सुझुकीवर ऐतिहासिक ७५ हजार वाहन-माघारीची पाळी
एस-क्रॉसमधील सदोष ब्रेकनंतर मारुती सुझुकीच्या बलेनो आणि स्विफ्ट डिझायरमधील एअरबॅगमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. कंपनीने वर्षभरापूर्वी सादर केलेल्या ७५,४१९ बलेनो या हॅचबॅक कार माघारी बोलाविल्या आहेत. तर सेदान श्रेणीतील १,९६१ स्विफ्ट डिझायरही परत घेण्यात येणार आहेत. या दोन्ही वाहनांमधील सदोष एअरबॅगमुळे कंपनीवर ही नामुष्की आली आहे. यामार्फत कंपनीला तिच्या स्थापनेतील सर्वात मोठी वाहन माघार घ्यावी लागली आहे.
मारुतीच्या बलेनो तसेच स्विफ्ट डिझायरमध्ये एअरबॅगबरोबरच इंधन जाळीतही त्रुटी आढळली आहे. पैकी पेट्रोल व डिझेल इंधनावर धावणाऱ्या बलेनो या ३ ऑगस्ट २०१५ ते १७ मे २०१६ या दरम्यान तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये निर्यात केलेल्या १७,२३१ बलेनोंचाही समावेश आहे.
सदोष ब्रेकमुळे गेल्या आठवडय़ात कंपनीने तिच्या २०,४२७ एस-क्रॉस कारची मोफत सेवा मोहीम राबविली होती. मारुतीने गेल्या वर्षी अल्टो ८०० व अल्टो के १० ही वाहने तिच्या उजव्या दरवाजातील सदोष कडीमुळे (लॅच) माघारी घेण्याचे पाऊल उचलले होते. डिसेंबर २०१४ ते फेब्रुवारी २०१५ दरम्यान निर्मिती करण्यात आलेली ही दोन्ही वाहने कंपनीच्या ताफ्यातील सर्वात स्वस्त वाहनश्रेणीतील आहेत.
एखाद्या वाहनांमध्ये दोष आढळल्यास ती माघारी घेण्याबाबतची पद्धती भारतीय वाहन उद्योगाने सर्वप्रथम जुलै २०१२ मध्ये अंगीकारली. यामार्फत विविध कंपन्यांनी आतापर्यंत त्यांची १८ लाख वाहने माघारी घेतली आहेत.
मारुती व्यापारी वाहन निर्मितीतही!
केवळ प्रवासी वाहन निर्मिती करून देशाच्या एकूण वाहन उद्योगात वरचष्मा राखणाऱ्या मारुती सुझुकीने हलकी व्यापारी वाहने निर्मितीत पाऊल ठेवण्याचे निश्चित केले आहे. कंपनी सुपर कॅरी या नावाचे हे वाहन भारतात चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीत सादर होईल. दक्षिण आफ्रिका, टांझानिया आदी देशांमध्येही त्याची निर्यात होईल, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय मारुती सुझुकीने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. या गटात सध्या टाटा मोटर्स, महिंद्र, अशोक लेलँड, पिआज्जिओ आदी कंपन्या आहेत.