देशातील प्रवासी वाहन गटातील तिच्या अस्तित्वापासून, गेल्या सलग १३ वर्षांपासून अव्वल स्थानी राहिलेल्या मारुती सुझुकीच्या अल्टोला अखेर कंपनीच्या स्विफ्टने मागे टाकले आहे. भारतातील सर्वाधिक विकली जाणारी हॅचबॅक कार म्हणून अल्टोची जागा आता याच गटातील स्विफ्टने घेतली आहे.

देशात सर्वाधिक वाहन विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने हा विक्रम एप्रिलमध्ये नोंदविला आहे. विक्रीबाबत अव्वल १० प्रवासी वाहन गटात कंपनीच्याच ७ वाहनांचा समावेश असून त्यात स्विफ्ट हॅचबॅकने यंदा अग्रस्थान राखले आहे. अल्टो आता दुसऱ्या स्थानावर राहिली आहे.

एप्रिलमध्ये मारुतीच्या स्विफ्टची २३,८०२ विक्री झाली. तर अल्टोची विक्री २२,५४९ होती. १५ हजाराच्या विक्री घरातील बलेनो आणि व्हॅगन आर या अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानी आहेत. ह्य़ुंदाईच्या तीन वाहनांची पहिल्या १० मध्ये स्थान मिळविले आहे. तिच्या एलाईट आय२०, गँॅड्र आय१० आणि क्रेटाचा यात क्रम राहिला आहे.

१० पैकी अन्य स्थानावर मारुतीच्या व्हिटारा ब्रेझा, स्विफ्ट डिझायर व सेलेरिओ यांनी स्थान मिळविले आहे. अव्वल स्थानी असलेल्या हॅचबॅक स्विफ्टने एप्रिलमध्ये ३५.९७ टक्के वाढ नोंदविली आहे.

chart

तर बलेनोचे गेल्यावेळचे ८ वे स्थान यंदा ३ पर्यंत उंचावले आहे. कंपनीच्या १७,५३० वाहनांची विक्री यंदा झाली. तर आधीच्या चौथ्या स्थानावरून यंदा काहीसे घसरलेल्या व्हॅगन आरची विक्री १६,३४८ झाली आहे.

कॉम्पॅक एसयूव्ही गटातील मारुतीच्या व्हिटारा ब्रेझाची एप्रिलमध्ये १०,६५३ झाली. तिचे आघाडीच्या १० मध्ये यंदा ७ वे स्थान राहिले आहे.

तिची स्पर्धक, ह्य़ुंदाईच्या क्रेटाची एप्रिलमधील विक्री ९,२१३ आहे व तिचे स्थान ८ वे आहे.

स्विफ्ट डिझायर ही सेदान श्रेणीतील कार गेल्या महिन्यात ८,६०६ विकली गेली. तर सेलेरिओची विक्री गेल्या महिन्यात ८,४२५ झाली व कार दहाव्या स्थानी राहिली.