६९ टक्के भारतीयांची भावना; ‘वे२ऑनलाइन’चे सर्वेक्षण

६९ टक्के भारतीयांना १,००० रुपयांची नोट पुन्हा चलनात हवी असल्याचे ‘वे२ऑनलाइन’ या इंग्रजी व प्रादेशिक भारतीय माध्यम क्षेत्रातील ‘मीडिया ऑन मोबाइल’ कंपनीच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

निश्चिलनीकरणानंतर भारतीय चलनाच्या वापराबाबत  केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब निदर्शनास आली आहे. चलनाच्या देवाणघेवाणीचा दर निश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या सखोल सर्वेक्षणात १,००० रुपयांची नोट परत येणे आवश्यक असल्याचे अध्र्याहून अधिक भारतीय जनतेला वाटत आहे. सरकारने गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी ५०० आणि १.००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करत असल्याचे जाहीर केले. नोटबंदीनंतर लगेचच रिझव्‍‌र्ह बँकेने २,००० रुपयांच्या नोटा चलनात आणल्या आणि काही कालावधीतच ५०० रुपयांच्या नोटादेखील व्यवहारात आणल्या. परंतु १,००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्यास मात्र रिझव्‍‌र्ह बँकेने अजूनही संमती दर्शवलेली नाही.

५०० आणि २,००० रुपयांच्या नोटांमध्ये खूपच अंतर असल्यामुळे सुट्टय़ा पैशांची चणचण भासू लागल्याचे लोकांनी सर्वेक्षणा दरम्यान सांगितले. सर्वेक्षणात ६२ टक्के लोकांनी त्यांना मोठय़ा रकमेच्या नोटेमुळे व्यवहार करताना खूपच अडचणींचा सामना करावा लागला. व्यवहारात सुलभता आणण्यासाठी रिजव्‍‌र्ह बँकेने २०० रुपयांची नोट बाजारात आणीत असल्याचे जाहीर केले असले तरी अजूनही तिची उपलब्धता पूर्णत: झालेली नाही. सर्वेक्षणात ६२ टक्के लोकांनी २०० रुपयांचीही नोट आल्यावर व्यवहारात सुलभता येईल असे मान्य केले तर १७ टक्के लोकांनी यामुळे काहीच फरक पडणार नसल्याचे सांगितले. सुट्टय़ा पैशांचा सामना करावा लागणाऱ्या केवळ ४४ टक्के लोकांना वाटते की २०० रुपयांच्या नोटेमुळे अडचणी दूर होतील.

‘वे२ऑनलाइन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक राजू वनापाला यांनी सांगितले की, नवीन बँक नोटेच्या अनावरणानंतर वे २ ऑनलाइनने २ लाख लोकांसह एका सर्वेक्षणाचे आयोजन केले आणि २०० रुपयांच्या नोटेबद्दल तसेच नवीन चलनी नोटेमुळे मोठय़ा रकमेसाठी सुट्टे पैसे मिळण्याची समस्या सुटेल का याबाबत त्यांची मते घेतली.