दूरसंचार क्षेत्रात मोबाइल क्रमांक कायम ठेवून सेवा प्रदाता बदलण्याचा पर्याय असलेल्या ‘एमएनपी’ अर्थात ‘मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी’चा सर्वाधिक फटका रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा टेलिसव्र्हिसेसला झाला आहे. या सुविधेनुसार उभय कंपन्यांची सेवा नाकारण्याचे प्रमाण गेल्या महिनाअखेपर्यंत सर्वाधिक राहिले आहे.
उलट या पर्यायाचा सर्वाधिक लाभ मात्र आयडिया सेल्युलर, एअरटेल, व्होडाफोन यांना झाला आहे. आयडिया सेल्युलरने ऑक्टोबरमध्ये सर्वाधिक १.२५ कोटी ग्राहक नोंदविले आहेत. तर एअरटेल व व्होडाफोनची गेल्या महिन्यातील वाढीव मोबाइलधारक संख्या अनुक्रमे ५० लाख व १.०४ कोटी आहे.
तुलनेत अनिल धीरुभाई अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्सचे ऑक्टोबर २०१४ मध्ये ७८ लाख, टाटा समूहातील टाटा टेलिसव्र्हिसेसचे ५३ लाख मोबाइलधारक कमी झाले आहेत. त्याचबरोबर ‘एमएनपी’ अंतर्गत एअरसेलनेही ३६ लाख मोबाइलधारक गमावले आहेत.
केंद्रीय दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद यांनी लोकसभेत एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात याबाबतची माहिती दिली. सार्वजनिक क्षेत्रातील भारत संचार निगम लिमिटेड (-२२ लाख) व महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (-२.७ लाख) यांच्या तुलनेत रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा टेलिसव्र्हिसेस व एअरसेल या कंपन्यांचे मोबाइलधारक कमी होण्याची संख्या अधिक असल्याचेही त्यांनी सांगितले. २९ नोव्हेंबरअखेर सेवा संपुष्टात येणाऱ्या मुंबईस्थित लूप मोबाइलचे किती ग्राहक अन्य कंपन्यांकडे वळले हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे. तब्बल नऊ महिन्यांच्या चर्चेनंतर कंपनीचे भारती एअरटेलबरोबरचे विलीनीकरण नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच रद्द झाले. सर्वाधिक मोबाइल ग्राहक संख्येसह एअरटेल ही सध्या क्रमांक एकची कंपनी आहे.
गमावलेले..
० रिलायन्स कम्युनिकेशन्स ७८ लाख
० टाटा टेलिसव्र्हिसेस ५३ लाख
० एअरसेल ३६ लाख मिळविलेले..
० आयडिया सेल्युलर १.२५ कोटी
० व्होडाफोन १.०४ कोटी
० भारती एअरटेल ५० लाख