छोटय़ा शहरातील गुंतवणूकदारांचा प्रतिसाद
म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदार खात्यांची संख्या चालू आर्थिक वर्षांत ५४ लाखांनी वाढली असून त्यांनी ४.७० कोटींचा टप्पा पार केला आहे. या गुंतवणूक पर्यायातील निम शहरांतील गुंतवणूक खातेदारांचा प्रतिसाद वार्षिक तुलनेत वाढला आहे.
भांडवली बाजार नियामक – सेबीने प्रमुख १५ शहरां व्यतिरिक्त अन्य शहरांमधून फंड गुंतवणुकीकरिता ओघ वाढविण्यावर वेळोवेळी आवश्यकता मांडली आहे. त्यासाठी हा मंच इ-कॉमसकरिताही खुला करण्याविषयीची पावले उचलली आहेत.
२०१५-१६ या चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत (वर्ष संपण्यास पंधरवडा शिल्लक असताना) ५३ लाख गुंतवणूकदार खाती वाढली आहेत. त्यामुळे देशातील एकूण म्युच्युअल फंड गुंतवणूकदार संख्या आता ४.७० कोटींच्या वर गेली आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून दोन कोटींच्या पुढे ही संख्या जात नव्हती. यंदा प्रथमच त्यात घसघशीत ५३ लाख खात्यांची वाढ झाली आहे. पैकी २५ लाख खाती ही १५ शहरां व्यतिरिक्त भागातील आहेत.
छोटय़ा शहरातील गुंतवणूकदारांचा वाढता ओघ हा प्रामुख्याने समभागनिगडित म्युच्युअल फंड योजनांमध्ये वाढल्याचे यावरून दिसते. छोटय़ा शहरांमध्ये फंड गुंतवणूकदारांना सेबीद्वारे दिले जाणाऱ्या सूट सवलतींचाही लाभ पथ्यावर पडत आहे.
म्युच्युअल फंडतील ७५,००० कोटी रुपयांचा ओघ हा प्रामुख्याने समभाग निगडित योजनांमध्ये राहिला आहे.
गेल्या एकूण आर्थिक वर्षांत या पर्यायातील गुंतवणूक ७१,००० कोटी रुपये होती. त्यातील छोटय़ा शहरातील गुंतवणूकदार खात्यांचा हिस्सा ४४ टक्के आहे.
भांडवली बाजारातील गेल्या काही महिन्यातील निधी ऱ्हास गुंतवणूकदारांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी चालू आर्थिक वर्षांत आतापर्यंत भांडवली बाजारातून २७,००० कोटी रुपये काढून घेतले आहेत.
तुलनेत फंड पर्यायाला – समभाग निगडित गुंतवणूक पर्यायाला गुंतवणूकदारांनी पसंती दिली आहे.