विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या नक्त गुंतवणुकीचे सर्वोत्तम वर्ष ठरलेल्या २०१३-१४ आर्थिक वर्षांत देशी म्युच्युअल फंडांनी नेमके त्या उलट कृती करताना भांडवली बाजारातून तब्बल १४ हजार कोटी रुपये मूल्याच्या समभागांची विक्री केली आहे. सलग पाचव्या वर्षी म्युच्युअल फंडांनी खरेदीपेक्षा विक्री अधिक करून नक्त गुंतवणुकीची मात्रा उणे ठेवली आहे.
भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’कडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, २०१३-१४ मध्ये म्युच्युअल फंडांनी भांडवली बाजारात व्यवहार केलेल्या समभागांमधून १४,२०८ कोटी रुपये काढून घेतले आहेत. आधीच्या वर्षांतील २२,७४९ कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम निश्चितच कमी आहे.
४० हून अधिक संख्या असलेल्या भारतातील म्युच्युअल फंड कंपन्यांनी २००८-०९ च्या संकट वर्षांत ६९८५ कोटी रुपये भांडवली बाजारात ओतले होते. यानंतर सलग पाच वर्षे त्यांनी बाजारातील गुंतवणूक काढून घेण्याचा कित्ता गिरविला.
या पाच वर्षांतील त्यांच्यामार्फत काढून घेतलेली रक्कम ६८ हजार कोटी रुपये होते. तुलनेत २०१३-१४ मध्ये विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी भांडवली बाजारात केलेली गुंतवणूक ही ८० हजार कोटी रुपये आहे. मात्र कमकुवत चलनापोटी डेट बाजारातून त्यांनी या कालावधीत २८ हजार कोटी रुपये काढून घेतले आहेत.
गेल्या आर्थिक वर्षांतील १२ पैकी १० महिन्यांमध्ये फंडांची बाजारातील खरेदीपेक्षा विक्रीचे प्रमाण अधिक राहिले आहे. केवळ मे आणि ऑगस्ट २०१३ मध्ये तेवढा त्यांचा गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. फंडांनी मे आणि ऑगस्टमध्ये बाजारात अनुक्रमे ३५०८ व १६०७ कोटी रुपये गुंतविले आहेत.
सध्या कार्यरत ४० हून अधिक म्युच्युअल फंडांनी गुंतवणूकदारांसाठी १५४० योजना आणल्या आहेत. यापैकी ७१ टक्के योजना या इन्कम किंवा डेट अशा उत्पन्न वर्गातील, तर इक्विटी म्हणजे समभागांमध्ये गुंतवणुकीच्या ३५० योजना (२३ टक्के) आहेत.