येत्या सप्टेंबरपासून देशातील बँकांना महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी सुटी दिल्याने आरटीजीएस, एनईएफटी तसेच धनादेश वटणावळीचे व्यवहार आता या दिवशी होणार नाहीत. यामुळे प्रत्यक्ष निधी हस्तांतरण प्रक्रियेला विलंब लागण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरपासून बँका महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी पूर्ण बंद राहतील, असा निर्णय केंद्रीय अर्थमंत्रालयाने नुकताच अधिसूचित केला आहे. महिन्यातील अन्य शनिवारी मात्र बँकांमध्ये पूर्ण दिवसाचे  कामकाज सुरू राहणार आहे.
बँकांना दोन शनिवारी सुटी दिल्यामुळे आता आरटीजीएस, नेफ्ट, धनादेश वटणावळ आदी निधी हस्तांतरण व्यवहार बंदच्या दोन्ही शनिवारी होऊ शकणार नाहीत, असे रिझव्‍‌र्ह बँकेनेही स्पष्ट केले आहे. इतर शनिवारी मात्र पूर्ण दिवसात हे व्यवहार होऊ शकतील, असेही नमूद करण्यात आले आहे.
बँक कर्मचारी, अधिकारी संघटनेबरोबर झालेल्या वेतनवाढीच्या करारानुसार, बँकांना दोन शनिवारी सुटी देण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वीच झाला होता. त्याची अमलबजावणी पुढील महिन्यापासून होत आहे.
ओटीसी डेरिव्हेटिव्ह बाजार, सरकारी रोखे बाजार हे पूर्वीप्रमाणेच सर्व शनिवारी बंदच राहणार आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या विभागीय कार्यालयातील अन्य विभागही कामकाज चालणाऱ्या शनिवारी पूर्ण दिवस (महिन्यातील दुसरा व चौथा शनिवार वगळून) सुरू राहतील.