नोव्हेंबरच्या ३.१५ टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये ३.३९ टक्क्यांवरचढ !

फळे व भाज्यांच्या किमतीत घसरणीचा दिलासा असताना, पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीने डिसेंबरमधील घाऊक किमतीवर आधारित महागाई दर ३.३९ टक्के नोंदविला गेला. नोव्हेंबरमधील ३.१५ टक्क्यांच्या तुलनेत तो वाढण्यामागे एकंदर इंधन घटकांतील ८.६५ टक्क्यांची वाढ कारणीभूत ठरली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर खनिज तेलाच्या किमतीतील वाढीपायी, डिसेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सलग वाढल्या आहेत. परिणामी, पेट्रोलचे प्रति लिटर दर ५.२१ रुपयांनी, तर डिझेलचे दर ४.४५ रुपये प्रति लिटर असे या कालावधीत वाढले आहेत. डिसेंबरमधील महागाई निर्देशांकात यांचे प्रत्यंतर म्हणजे डिझेल घटक २०.२५ टक्के, तर पेट्रोलचा टक्का ८.५२ टक्के वधारला आहे. इंधन दरांबरोबरीनेच साखर, बटाटे, डाळी आणि गव्हाच्या वाढलेल्या किमतीतूनही महागाई दराला वाढीचे इंधन दिले.

गत आठवडय़ात गुरुवारी मुख्यत: भाज्या व अन्नधान्याच्या किमतीतील घसरणीने किरकोळ किमतीवर आधारित महागाई दर डिसेंबरमध्ये ३.४१ टक्क्यांवर स्थिरावताना  आढळला. गेल्या तीन वर्षांतील म्हणजे जानेवारी २०१४ नंतरचा किमान स्तर महागाईने गाठल्याचे यातून दिसले. निश्चलनीकरणातून नोटांच्या चणचणीमुळे एकंदर बाजार मागणीत घसरणीतून किमती ओसरल्याचा हा परिणाम होता. त्याउलट घाऊक किमतीवर महागाई दर वधारला असला तरी त्यातील अन्नधान्य घटकही नोव्हेंबरमधील १.५४ टक्क्यांच्या तुलनेत डिसेंबरमध्ये (-)०.७० टक्के नोंदविला गेला.

गेल्या दोन महिन्यांत तेल निर्यातदारांच्या ‘ओपेक’ संघटनेत उत्पादन कपातीबाबत सहमतीनंतर  खनिज तेलाच्या भडकलेल्या आंतरराष्ट्रीय किमती आणि बरोबरीने डॉलरच्या मजबुतीपायी घाऊक महागाई दर यंदा वाढला आहे. भाजीपाल्याच्या किमतीतील तीव्र स्वरूपाच्या उताराने महागाई निर्देशांकाचा पारा फार मोठय़ा प्रमाणात चढलेला नाही, परंतु भाज्या व फळांच्या किमतीही चढू लागल्यास महागाई निर्देशांकालाही धार चढू लागण्याची भीती ‘अ‍ॅसोचॅम’ या उद्योगक्षेत्राच्या संघटनेने व्यक्त केली आहे.

  • डिसेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अनुक्रमे ५.२१ रुपये आणि ४.४५ रुपये प्रति लिटर अशा वाढल्या. यातून डिसेंबरच्या घाऊक किंमत निर्देशांकातील इंधन घटकांतील ८.६५ टक्क्यांची वाढ कारणीभूत ठरली आहे.